सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:56 IST2025-12-24T12:51:48+5:302025-12-24T12:56:29+5:30
Ayodhya Ram Mandir News: सोने-चांदी-हिरे तसेच अन्य मौल्यवान रत्ने वापरून साकारलेली भव्य राममूर्ती अद्भूत आहे.

सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
Ayodhya Ram Mandir News: अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन २७ डिसेंबर २०२५ ते ०२ जानेवारी २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. याची तयारी श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टने सुरू केली आहे. पाच दिवसांत धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या कालावधीत लाखो भाविक अयोध्येत येणार आहेत. तत्पूर्वी, कर्नाटकातील अज्ञात भाविकांनी अयोध्येतील राम मंदिराला सोने-चांदी-हिरे रत्नजडीत राममूर्ती अर्पण केली आहे. ही मूर्ती घडवायला ३० कोटी रुपये लागल्याचे म्हटले जात आहे.
अयोध्येतील राम मंदिरातील रामललाच्या मूर्तीची ही प्रतिकृती आहे. परंतु, ही मूर्ती संपूर्ण सोन्यात घडवलेली आहे. तसेच संपूर्ण मूर्तीवर विविध प्रकारची उंची रत्ने लावण्यात आली आहेत. अयोध्येतील राम मंदिर संकुलात लवकरच ही भव्य आणि अमूल्य मूर्ती स्थापित केली जाणार आहे. ही सोनेरी मूर्ती हिरे, पाचू आणि इतर असंख्य मौल्यवान रत्नांनी साकारली आहे. कर्नाटकातील एका अज्ञात भाविकाने ही मूर्ती राम मंदिराला दान केली होती. ही मूर्ती १० फूट उंच आणि ८ फूट रुंद आहे. त्याची अंदाजे किंमत ₹२५-३० कोटी आहे. दक्षिण भारतीय पद्धतीने ही राममूर्ती साकारण्यात आली आहे.
देशभरातील संत आणि महंतांना आमंत्रित केले जाणार
सोने-चांदी-हिरे रत्नजडीत या राममूर्तीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या राममूर्तीची भव्यता थक्क करणारी आहे. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले की, राममूर्ती पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप कळलेली नाही. या मूर्तीचे वजन केले जात आहे. सर्व माहिती लवकरच दिली जाईल. काही मिडिया वृत्तानुसार, संत तुलसीदास मंदिराजवळील अंगद टीला येथे या सोन्याच्या हिरे रत्नजडीत राममूर्तीची स्थापना करण्याचा विचार केला जात आहे. अनावरण समारंभ होईल. त्यानंतर प्राण प्रतिष्ठापना होईल. देशभरातील संत आणि महंतांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाणार आहे.
दरम्यान, कर्नाटक ते अयोध्या ही राममूर्ती एका खास व्हॅनमधून आणण्यात आली. मंगळवारी दुपारी ही मूर्ती राम मंदिर संकुलात आणण्यात आली. ही मूर्ती कर्नाटकातील काही भाविकांनी संयुक्तपणे तयार केली होती. बांधकामात तंजावर येथील कुशल आणि अनुभवी कारागिरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या मूर्तीला अतिशय कलात्मक आणि आकर्षक स्वरूप देण्यात आले आहे.