Bhagavad Gita Updesh In Marathi: कालातीत महत्त्व आणि आजही प्रेरणादायी ठरणारा ज्ञानाचा अखंड झरा म्हणजे श्रीमद् भगवद्गीता. कैक हजार वर्ष झाली तरी भगवद्गीता आजही मार्गदर्शक ठरते. भगवद्गीतेवर आजपर्यंत अनेक टीका लिहून झाल्या आहेत. आजही अनेक संशोधक यावर गहन विचार करत आहेत. भगवद्गीता अनेकार्थाने महत्त्वाची मानली जाते. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर भगवद्गीतेची शिकवण लाखमोलाची ठरू शकते. यातून श्रीकृष्णाने सांगितलेल्या अनेक नीति आजच्या काळातही चपखल लागू होणाऱ्या ठरू शकतात, असे सांगितले जाते.
श्रीमद् भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णाच्या मौल्यवान शिकवणींचा संग्रह आहे. गीतेतील श्रीकृष्णांची वचने आपल्याला जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा देत राहतात. गीतेतील उपदेश आजही आपल्याला जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्यात आणि योग्य मार्ग निवडण्यात मदत करतात. एखाद्या व्यक्तीने गीतेच्या या शिकवणींचे पालन केले तर त्याला त्याच्या कामात निश्चितच यश मिळू शकते, असे म्हटले जाते. हमखास यश मिळण्यासाठी गीतेतील नेमक्या कोणत्या कृष्णनीति आवर्जून ध्यानात ठेवाव्यात आणि आवर्जून अमलात आणाव्यात? पाहूया...
विनाकारण चिंता करत बसू नका
श्रीकृष्णांनी म्हटले आहे की, आत्मा अमर आहे, आत्मा जन्म घेत नाही आणि मरत नाही. शरीर नश्वर आहे आणि एक ना एक दिवस ते नष्ट होणारच आहे. आपण जन्म-मृत्यू किंवा इतर कशाचीही चिंता न करता आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विनाकारण चिंता करत बसू नये. आपण फक्त केवळ चिंता करत बसलो, तर हाती काहीच लागणार नाही आणि काही बदलही होणार नाही. त्याचा कामावरही परिणाम होतो. त्यामुळे व्यर्थ चिंता करत बसण्यापेक्षा काम करत राहावे. मेहनत आणि परिश्रमाची कास सोडू नये.
मनावर नियंत्रण ठेवा
गीतेत म्हटले आहे की, जो माणूस आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो तो कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो. आपले मन सतत भटकत राहिले तर आपण योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. म्हणून, मन शांत आणि खंबीर करणे तसेच त्याची दिशा योग्य असणे महत्त्वाचे आहे.
रागावर नियंत्रण ठेवा
श्रीकृष्णाने अर्जुनला समजावताना सांगितले की, क्रोध माणसाला विनाशाकडे घेऊन जातो. आपल्याला राग येतो तेव्हा आपण बरोबर आणि चूक, योग्य आणि अयोग्य यात फरक करायला विसरतो. त्याचा परिणाम म्हणजे शेवटी चुकीचे निर्णय घेतो. रागामुळे नातेसंबंध बिघडतात आणि आपले मन अस्वस्थ होते. म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
सतत कार्यरत राहा, फळाची अपेक्षा करू नका
श्रीकृष्ण सांगतात की, माणसाने फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे आणि त्याच्या परिणामांची चिंता करू नये. आपल्या कष्टाचे फळ आपोआप मिळेल, परंतु जर आपण परिणामांची काळजी केली तर आपले लक्ष कामावरून विचलित होईल. म्हणून माणसाने चांगली कृत्ये करत राहिले पाहिजे.
स्वतःवर विश्वास ठेवा
गीतेत म्हटले आहे की, स्वतःला समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपली ताकद आणि कमतरता ओळखणे सर्वांत महत्त्वाचे आहे. आपली ताकद आणि कमकुवतपणा ओळखतो, तेव्हा आपण आपले जीवन योग्य दिशेने नेऊ शकतो. आत्मसन्मान ठेवणे आणि स्वतःवर विश्वास असणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.