No attention in worship? Then do the remedy suggested by Swami Samarth! | पूजेत लक्ष लागत नाही? मग स्वामी समर्थांनी सांगितलेला उपाय करा!

पूजेत लक्ष लागत नाही? मग स्वामी समर्थांनी सांगितलेला उपाय करा!

संत नामदेव महाराजांचा एक प्रख्यात अभंग आहे, 'अमृताहुनी गोड  नाम तुझे देवा...' यात संत नामदेव देवाचे नाव किती गोड आहे हे सांगताना अमृताशी तुलना करतात. नामदेवांचे म्हणणे योग्य असले, तरी तुमचा आमचा अनुभव असा, की नामाची गोडी चाखता चाखता आम्हाला लगेच ग्लानी येते. जसे गोडाचे जेवण झाल्यावर येते, अगदी तशीच! ही अवस्था जाणूनच संत नामदेव या अभंगात म्हणतात, 

कीर्तनी बैसता निद्रे नागविले,
मन माझे गुंतले विषयसुख।

देवा, नेमके भजन कीर्तनाच्या वेळी मनात शेकडो विचार येतात. संसाराचे विषय मनात घोळत राहतात, काहीच नाही तर क्षणार्धात झोप येते. अशी माझी अवस्था होत असेल, तर तुझे गोड नाम आम्ही कसे घेऊ? 

हाच प्रश्न एका स्वामी भक्ताने स्वामींजवळ उपस्थित केला. तो म्हणाला, 'स्वामी देवाचे नाव घेताक्षणी मनात विचारचक्र सुरू होतं. जपाची माळ ओढावी, तर प्रत्येक मन्यागणिक एक एक विचार पुढे ढकलला जातो. मग माझ्याकडून भक्ती घडेल तरी कशी? आपणच उपाय सांगा.'

यावर स्वामी म्हणाले, 'तुझ्या मालकीची दोन घरे आहेत ना? एकात तू राहतोस आणि दुसऱ्यात तुझा भाडेकरू! बरोबर ना? तुला तुझ्या हक्काच्या घरातून कोणी बाहेर काढू शकत नाही, पण तू उद्या एकएक तुझ्या भाडेकरूला घराबाहेर निघ म्हटलं, तर तो तुझे ऐकेल का? नाही ना? तो रागवेल, भांडेल, बरीच कटकट करेल आणि त्याची मुदत संपली की तिथून निघून जाईल. मग तुझे दुसरे घरही मोकळे होईल. त्याचप्रमाणे तुझे एक मन देवाला समर्पित आहे. परंतु मनाच्या दुसऱ्या कप्प्यात अजूनही षड्विकार वास करत आहेत. त्यांना घालवणे सोपे नाही. त्यासाठी नामःस्मरण हाच उपाय आहे. नामःस्मरणाचा धोशा सुरू ठेव. त्यांना तिथून पळ काढावाच लागेल. म्हणून पूजेत, नामःस्मरणात मन रमले नाही, तरी नामःस्मरण सुरू ठेव. तू तुझे कर्म करत राहा. एक ना एक दिवस मनापासून नामस्मरण नक्की घडेल.' 

स्वामींनी दिलेला उपाय आपणही अमलात आणूया आणि निःशंक आणि निर्भय मनाने स्वामींना शरण जाऊया. स्वामी होsss!

Web Title: No attention in worship? Then do the remedy suggested by Swami Samarth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.