Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 17:58 IST2025-09-19T17:56:06+5:302025-09-19T17:58:19+5:30
Navratri 2025: २२ सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होत आहे, घरोघरी देवीचे घट बसवले जातील, पण प्रताप गडावर दोन घट बसवण्याची परंपरा का? ते जाणून घेऊ.

Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
>> सचिन काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगड अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. या किल्ल्यावर असलेले भवानी मातेचे मंदिर, देवीची मूर्ती अन् मंदिरात बसविले जाणारे दोन घट या मागेही रंजक इतिहास लपला आहे. नवरात्रोत्सवात आदिशक्तीचा जागर होत असताना हा इतिहासही उजेडात येणे महत्त्वाचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर प्रतापगडावर भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्याचे ठरविले. त्यानुसार मंबाजी नाईक पानसरे हे हिमालयातील राजे लीलासेन यांच्या राज्यात गेले. त्यांच्या सहकार्याने त्यांनी हिमालयातील त्रिशूलगंडकी, श्वेतगंडकी व सरस्वती या नद्यांच्या संगमातून शाळीग्रामची उत्तम शिळा मिळवली. त्याच प्रांतातील कुशल शिल्पकारांकडून त्यांनी भवानी मातेची मूर्ती घडवून घेतली. भवानीमातेची ही मूर्ती अष्टभुजा महिषासूरमर्दिनी रूपातील आहे. ही मूर्ती प्रथम राजगडावर व तेथून प्रतापगडावर आणण्यात आली. १६६१ साली या मूर्तीची प्रतापगडावर प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर किल्ल्यावर नवरात्रोत्सवात घटस्थापनेची परंपरा सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम महाराज यांनी ‘हे हिंदवी स्वराज्य असेच अबाधित राहू दे’ असा नवस भवानी मातेला केला होता. त्यामुळे भवानी मातेच्या मंदिरात ३६२ वर्षांपासून दोन घट बसविले जात आहेत. एक घट देवीच्या नावाने तर दुसरा राजाराम महाराज यांनी केलेल्या नवसामुळे. मंदिरात दोन घट बसविणारे हे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे.
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
धार्मिक कार्यक्रमांची परंपरा कायम
प्रतापगडावरील भवानी माता ही साताऱ्याच्या राजघराण्याचे कुलदैवत आहे. नवरात्रोत्सवास मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. चौथ्या माळेला मशाल महोत्सव तर पाचव्या माळेला शिवमूर्तीची मिरवणूक काढली जाते. अष्टमीला घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होतो तर नवमीला पालखी मिरवणुकीच्या उत्सवाची सांगता होते.
याबाबत प्रतापगडाचे किल्लेदार अभय हवलदार सांगतात, 'प्रतापगडावरील घटस्थापनेला परंपरेची किनार असून, मंदिरात दरवर्षी दाेन घट बसविले जातात. साडेतीनशे वर्षांपासून या परंपरेचं जतन करणारं महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे.'