Navratri 2022: नवरात्रीत अखंड ज्योत का लावली जाते? त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 17:48 IST2022-09-20T17:48:41+5:302022-09-20T17:48:59+5:30
Navratri 2022: नवरात्रीत अखंड दिवा तेवत ठेवल्याने घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्ती होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यासाठी काय आवश्यक आहे तेही जाणून घ्या!

Navratri 2022: नवरात्रीत अखंड ज्योत का लावली जाते? त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घ्या!
नवरात्रोत्सव सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. यावेळी देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाईल. बरेच लोक या दरम्यान अखंड ज्योत लावतात, चला तर मग जाणून घेऊया त्याचे महत्त्व काय आहे.
सर्वसामान्यपणे आपण दररोज सकाळ-संध्याकाळ देवासमोर दिवे लावतो. तरीदेखील विशेषतः नवरात्रीच्या काळात अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. दिवा अखंड तेवत ठेवण्याला खूप महत्त्व आहे, ही गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे. पण ही प्रथा का आणि कशासाठी ते जाणून घेऊया!
Navratri 2022: नवरात्रीला वास्तुशास्त्रानुसार करा पूजेची तयारी, आई भगवती येईल तुमच्या घरी!
नवरात्रीत भक्तीचा, शक्तीचा जागर केला जातो. जागर करणे अर्थात जागृत राहणे. दिवा अखंड तेवत ठेवणे हे आत्मज्योत जागृत ठेवण्याचे प्रतीक आहे. जसा देव्हाऱ्यातील दिवा तेवत राहतो, तशी आपली जागृतावस्था कायम राहून आत्मज्योत तेवत राहो ही त्यामागील संकल्पना आहे. नव्हे तर ती जाणीव करून देणारे हे प्रतीक आहे.
कोणताही भक्त दिव्यात उपस्थित असलेल्या अग्नितत्त्वाद्वारे देवाशी संलग्न होण्याचा प्रयत्न करतो. ती केवळ दिव्याची ज्योत नसून ती आत्मज्योत मानली जाते. जिवा शिवाला जोडणारी ही वात अखंडित राहून ज्ञानदीप प्रकाशमान व्हावा ही त्यामागील मुख्य संकल्पना आहे.
कोणत्याही प्रकारच्या पूजेची सुरुवात दिवा प्रज्वलित करून केली जाते आणि पूजेच्या शेवटी आरती ओवाळून सांगता केली जाते. असे म्हणतात, की दिवा भक्ताचा दूत बनून आपल्या इष्ट देवापर्यंत आपल्या भावना पोचवतो, म्हणून असे म्हणतात की ज्या घरांमध्ये देवाची नित्य पूजा, दिवे लावणे, घंटा वाजवणे आणि शंख वाजवणे अशी परंपरा असते तिथे देवीदेवतांचा सदैव वास असतो.
दिवा अखंड तेवत राहावा म्हणून त्या भली मोठी वात लावली जाते. समईच्या काठोकाठ तेल भरले जाते. तेल संपत आले की त्यात भर घातली जाते आणि दिव्याची ज्योत मंद तेवत ठेवली जाते.
नवरात्रीत अखंड दिवा तेवत ठेवल्याने घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्ती होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. अर्थात हा दिवा तेलाचा हवा तसेच ज्ञानाचा आणि जागृतीचादेखील असायला हवा!
Navratri 2022: नवरात्रीत अखंड दिवा लावणार असाल तर जाणून घ्या हे महत्त्वाचे नियम!