नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘हिरा’ ज्याचं रत्न, तो ग्रह ‘लय भारी’; ‘शुक्र’ असेल स्वामी, तर रसिकतेची हमी

By देवेश फडके | Published: July 9, 2024 06:45 PM2024-07-09T18:45:05+5:302024-07-09T18:47:30+5:30

Navgrahanchi Kundali Katha: शुक्र ग्रहामुळे कोणते राजयोग निर्माण होतात? कुंडलीवर शुक्राचा प्रभाव कसा असतो? जाणून घ्या...

navgrahanchi kundali katha know about significance of venus planet in astrology and shukra graha impact on janm patrika | नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘हिरा’ ज्याचं रत्न, तो ग्रह ‘लय भारी’; ‘शुक्र’ असेल स्वामी, तर रसिकतेची हमी

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘हिरा’ ज्याचं रत्न, तो ग्रह ‘लय भारी’; ‘शुक्र’ असेल स्वामी, तर रसिकतेची हमी

Navgrahanchi Kundali Katha:  शुक्रतारा मंदवारा..., घनतमी शुक्र बघ राज्य करी..., उगवली शुक्राची चांदणी, असा काही गीतांमधून शुक्र आपल्या परिचयाचा झाला आहे. अंतराळातील अनेक मोहिमा लिलया पेलणारी 'इस्रो' चंद्र, मंगळ, सूर्य या ग्रहांनंतर शुक्र ग्रहावर लक्ष केंद्रीत करणार आहे. आगामी काळात शुक्राशी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी उपग्रह सोडण्यात येणार आहे.

सूर्यमालेमध्ये शुक्र हा सूर्यापासून बुधानंतर आणि पृथ्वीच्या अगोदर येणारा ग्रह आहे. शुक्र हा तेजस्वी ग्रह आहे. सूर्यापासून याचे अंतर १० कोटी ७२ लक्ष किलोमीटर इतके आहे. तर पृथ्वीपासून शुक्र ग्रह ०४ कोटी १४ लक्ष किलोमीटर अंतरावर आहे. शुक्र हा चंद्रापेक्षा जास्त तेजस्वी आहे. सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास शुक्राला २२५ दिवस लागतात. ब्रह्मदेवाचा मुलगा भृगू याचा मुलगा म्हणून याला 'भार्गव' असे म्हणतात. याशिवाय शुचि, सित, भृगूसुत, अस्फुजित, एकाक्ष, दानवेज्य, दैत्यगुरु, अच्छ, काव्य, कवि अशी नावे शुक्राला आहेत. पारशीत याला नाहीद फलक, अरबीत जुहर आणि रक्कास फलक तर इंग्रजीत व्हिनस असे म्हणतात. 

संजीवनी मंत्र जपणारा दैत्यगुरु 

शुक्र ग्रह संजीवनी मंत्र जपणारा दैत्यगुरु मानला जातो. शुक्र हा मदन-काम व कान्तीचा कारक, शुभ ग्रह आहे. शुक्र ग्रह जलतत्वाचा आग्नेय दिशेचा स्वामी आहे. राशीचक्रातील वृषभ व तूळ या दोन राशींचे अधिपत्य शुक्राकडे आहे. शुक्र हा मीन राशीत उच्च होतो, तर कन्या राशीत नीच होतो. म्हणजेच मीन राशीत उच्च फले देऊ शकतो, तर कन्या राशीत कमी फले देऊ शकतो. मात्र, अन्य ग्रहांशी संबंध आणि युती पाहणे आवश्यक ठरते. कुंडलीत चतुर्थस्थानी, उत्तर दिशेस बलवान होतो. अंकशास्त्रात मूलांक ६ चा स्वामी शुक्र आहे. हिरा हे शुक्राचे रत्न आहे. हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे अंगठा व अंगठ्याखालील मनगटापर्यंतचा उंचवटा यांवर शुक्राचे स्थान मानले जाते. आठवड्यातील शुक्रवार या दिवसावर शुक्राचा अंमल आहे. नैसर्गिक दशा ३२ वर्षे असून हा सप्तम भावाचा कारक आहे. भरणी, पूर्वाफाल्गुनी व पूर्वाषाढा या तीन नक्षत्रांचे स्वामित्व शुक्राकडे आहे. शुक्राची देवता शची असून उपास्यदेवता देवी आहे. 

शुक्र ग्रहाचे कारकत्व, गुणधर्म आणि महत्त्वाचे योग

शुक्र हा स्त्री, विवाह, सौंदर्य, प्रेमप्रकरण, शयनगृह, जलाशय, काव्य, नृत्य-गायन, तारुण्य, सुगंधी तेले-अत्तरे, फुले, कला-कौशल्य, वाहन, कीर्ती, रतिसुख या गोष्टींचा कारक आहे. तसेच सुख, सौंदर्य, विलास, उपभोग, कोमल मनोभावना, प्रेम-प्रणय, ममता, शांत, आल्हाददायक, पोषक, संरक्षक, कला-कौशल्याची आवड, गायन-वादन, निरनिराळ्या प्रकारचे कपडे, दागदागिने, फुले, अत्तरे यांची आवड, नाटक-सिनेमा इ. करमणुकीची आवड हे शुक्राचे मुख्य गुणधर्म आहेत. जेथे बुधाची अतितर्कशक्ती व शनीचे डावपेच उपयोगी पडत नाहीत, तेथे शुक्राचा गोड स्वभाव व आकर्षक वागणुकीने सहज कामे होतात. शुक्राची कामत्रिकोणावर सत्ता आहे. शुक्रामुळे पंचमहापुरुषातील मालव्ययोग होतो. शुक्राचे सहाय्य गुरुला लाभते, तेव्हा कलानिधीयोग तेजस्वी होतो. हा योग बुध, गुरू आणि शुक्र यांच्या संयोगाने निर्माण होतो. या योगाचे महत्त्व २-५-९ स्थानात जास्त आहे. शुक्र हा लाभदायक ग्रह मानला गेला आहे. पहिल्या भागात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील एक ते सहा स्थानावर शुक्र असेल, तर त्याचे जातकावर कसा प्रभाव असू शकतो किंवा जातकाला त्याचे कसे परिणाम मिळू शकतात, हे पाहणार आहोत. तर दुसऱ्या भागात शुक्र ग्रहाशी संबंधित आणखी काही मान्यता, उपाय आणि कुंडलीतील सात ते बारा या स्थानावर शुक्र असेल, तर त्याचा जातकावर कसा प्रभाव असतो, याची थोडक्यात माहिती घेणार आहोत.

१) प्रथम स्थान: कुंडलीतील पहिल्या स्थानाला लग्न स्थान असे संबोधले जाते. यावरून व्यक्तिमत्व, रुप-रंग, शरीर, यशापयश, पूर्वज, सुख-दुःख, आत्मविश्वास, अभिमान अशा गोष्टी पाहिल्या जातात. प्रथमस्थानी म्हणजे लग्न स्थानी शुक्र ग्रह असेल तर जातक सौंदर्यवान, आकर्षक, व्यक्तिमत्त्वाचा, असतो. रसिक, राजसी स्वभावाचा, विलासप्रिय, संगीतकाव्य, ललित कलामध्ये प्रवीण, वाचाळ पण भित्रा असतो. आर्थिक दृष्टीने संपन्न, राजमान्य, चारित्र्यसंपन्न व विद्वान असतो. आंबट व खारट पदार्थांची आवड असते. उमद्या व्यक्तिमत्त्वामुळे स्त्रिया चटकन भुलतात, अशी मान्यता आहे. पाश्चात्त्यांच्या मते, या स्थानाचा शुक्र शुभ मानला आहे. परंतु आरोग्याच्या दृष्टीने हा शुक्र चांगला नसतो, असे त्यांचा दावा आहे. 

२) द्वितीय स्थान: कुंडलीतील दुसरे स्थान धनस्थान मानले जाते. यावरून आर्थिक स्थिती, कुटुंबसौख्य, घराणे, संपत्ती पाहिली जाते. द्वितीय स्थानातील शुक्र सुंदर व प्रभावी वाणी देतो. जातक बोलण्यात तर चतुर असतोच, पण त्या बरोबरच कवी किंवा लेखकही असतो. आर्थिक संपन्नता मिळते. जातक भोगी, विलासी व बादशाही स्वभावाचा असतो. काही जातक कलाकारही असतात. आपल्या वक्तृत्त्वाने सभा-संमेलने गाजवतात. परंपरागत रूढीचे पालन करतात. कुळात परंपरेनुसार कुलदेवतेची पूजा असते. ही पूजा भाग्योदयास सहाय्य करते. काही आचार्यांच्या मते धनस्थानातील शुक्र परकीय धन मिळवून देतो. समाजात कीर्ति, राजमान्यता व बांधवांकडून सन्मान मिळतो. अशा जातकाने व्यापार केल्यास त्याला त्यात खूप फायदा होतो. चांदी किंवा शिशाच्या व्यापारात विशेष लाभ होतो. पाश्चात्त्य विद्वानांच्या मते द्वितीयस्थानचा शुक्र विजय मिळवून देतो. जातक खूपच विलासी, श्रृंगारप्रिय असतो. व्यापारात यशस्वी होतो, समाजात प्रतिष्ठा मिळते. धनस्थानच्या शुक्रावर शनिची दृष्टी लाभदायक व यशदायक असते. परंतु धनस्थानात शुक्र-शनि युती चांगली नसते. अन्य ज्योतिर्विदांनीही धनस्थानातील शुक्राची शुभ फले सांगितली आहेत.  

३) तृतीय स्थान: कुंडलीतील तिसरे स्थान मातृस्थान मानले जाते. यावरून भावंडे, शैली, जनसंपर्क, भावंडांकडून मिळणारे सुख अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. तृतीयस्थानी शुक्र असेल तर जातक आळशी, कमी उत्साही, अधिक शत्रू व मोठे कुटुंब असलेला असतो. जातक स्वभावाने तापट, भित्रा व कंजूष असतो. आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. राजसी स्वभाव, विलासी वृत्ती व नेहमी थाटामाटात-टापटिपीत राहतो. जातक गोडबोल्या असतो. काहींच्या मते, जातक समाजप्रतिष्ठारहित, दुर्जन, दुर्बल, दुराग्रही, लबाड, अनैतिक मार्गांनी सुख भोगणारा असतो. पाश्चात्त्यांच्या मते, या स्थानातील शुक्राची फले त्याच्या अन्य ग्रहांशी होणाऱ्या योगावर व दृष्टीवर अवलंबून असतात. 

४) चतुर्थ स्थान: कुंडलीतील चौथे स्थान सुखस्थान मानले जाते. हे मनाचे कारक स्थानही मानले जाते. गृहसौख्य, सासर, वाहनसौख्य, घरातील वस्तु, घराभोवतालचा परिसर, पदवी, मालमत्ता अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. चतुर्थस्थानी शुक्र असेल तर जातक इष्टमित्र, बंधुबांधव व कुटुंबियजनांकडून सुखी असतो. जातक यशस्वी, संपन्न, सुखी, विद्वान, संभाषणचतुर, समाजप्रसिद्ध, प्रतिष्ठित, राजमान्य व पराक्रमी असतो. स्थावरसंपत्ती भरपूर असते. मित्रपरिवार मोठा असतो. चतुर्थस्थानी पूर्ण बलवान शुक्र असेल तर त्याची शुभ फले अधिक प्रमाणात मिळतात. सुखी जीवन, संपत्तीसुख, वडिलोपार्जित संपत्तीची प्राप्ती अशी शुभ फले पाश्चात्त्य विद्वानांनी सांगितली आहेत. 

५) पंचम स्थान: कुंडलीतील पंचमस्थान संततीस्थान मानले जाते. यावरून संततीसुख, प्रेमातील यश, शिक्षण, कलेतील यश, आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. पंचमस्थानी शुक्र असेल तर संततिसुख चांगले मिळते, अशी मान्यता आहे. मित्रांचे सुख मोठ्या प्रमाणात मिळते. आर्थिक स्थिती चांगली असते. जातक विद्वान, देखणा, राजद्वारी प्रतिष्ठित व अधिकारसंपन्न असतो. पण कीर्ती विशेष मिळत नाही. काव्य-संगीत इत्यादींचा कलारसिक असतो. शुक्र बलवान असेल तर चांगला कवि होतो. पंचमातील शुक्र थोड्या प्रयासाने भरपूर पैसा देतो. वाहन व स्थावर संपत्तीचे सुख उत्तम मिळते. पाश्चात्त्यांच्या मते, असा जातक राजसी स्वभावाचा, विलासी असतो. सांसारिक घटनांचा प्रभाव मनावर पडत नाही. जातक 'स्थितप्रज्ञ' असतो. विद्वान व संपन्नही असतो.

६) षष्ठस्थान: कुंडलीतील षष्ठस्थान म्हणजेच सहावे स्थान शत्रूस्थान मानले जाते. यावरून शत्रू, गुप्त शत्रू, शारीरिक व्याधी, मामा, मावशीकडून मिळणारे सुख, नोकर-चाकर, मानसिक वा शारीरिक ताण अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. ज्योतिषाचार्यांनी षष्ठस्थानी असलेल्या शुक्राची फले अशुभ सांगितलेली आहेत. जातकाला शत्रू फार असतात. पत्नी सुख मिळत नाही. आर्थिक स्थिती साधारण असते, जीवन सुख-वैभवयुक्त नसते. शुक्र नीचीचा किंवा शत्रूक्षेत्रीचा असेल तर अशुभ फले अधिक मिळतात. याविरुद्ध उच्च किंवा स्वक्षेत्रीचा शुक्र ग्रह असेल तर शुभ फले अधिक प्रमाणात मिळतात. सातत्याने विघ्न येते. गुप्त शत्रू फार असतात, ते मित्र बनून नुकसान करतात. जातक फार शंकेखोर असतो. त्याच्या हिताचेही तो ऐकत नाही. पाश्चात्त्यांच्या मते, बौद्धिक कार्य मानवते. नोकरीत यशस्वी व व्यापारात अयशस्वी होतो. जातक अभिमानी असतो.

- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

- देवेश फडके.

Web Title: navgrahanchi kundali katha know about significance of venus planet in astrology and shukra graha impact on janm patrika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.