नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ग्रहांच्या 'राजा'ला पत्रिकेतही मान; काय परिणाम करतं सूर्याचं 'स्थान'?

By देवेश फडके | Published: January 25, 2024 12:30 PM2024-01-25T12:30:34+5:302024-01-25T12:34:04+5:30

Navgrahanchi Kundali Katha: नवग्रहांचा राजा मानल्या गेलेल्या सूर्याची वैशिष्ट्ये, गुणधर्म आणि कुंडलीतील प्रभाव यांविषयी जाणून घ्या...

navgrahanchi kundali katha know about significance of sun in janm kundali and effect on janm patrika of navagraha raja surya | नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ग्रहांच्या 'राजा'ला पत्रिकेतही मान; काय परिणाम करतं सूर्याचं 'स्थान'?

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ग्रहांच्या 'राजा'ला पत्रिकेतही मान; काय परिणाम करतं सूर्याचं 'स्थान'?

- देवेश फडके.

वास्तविक खगोलाच्या दृष्टीने पाहता सूर्य हा एक सामान्य तारा. मात्र, या सामान्य ताऱ्याचे असामान्यत्व अगदी नावाप्रमाणे प्रखर, तेजस्वी, ओजस्वी असे आहे. ब्रह्मांडात अनेक सूर्यमाला असल्याचे सांगितले जाते. पैकी आपली एक सूर्यमाला आहे. आपल्या सूर्यमालेतील ग्रहांचा तो केंद्रबिंदू आहे. एक सामान्य तारा असूनही त्याचे असामान्यत्व अभ्यासण्यासाठी जगभरातील संशोधक झटताना दिसत आहेत. अलीकडे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आदित्य एल १ नामक यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवले आहे. खगोलशास्त्रीय सूर्याचे जसे वेगळे महत्त्व आहे, तसेच ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्याही सूर्याचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. ज्योतिषात सूर्याला नवग्रहांचा राजा मानले जाते. 

सूर्य हा पृथ्वीपासून ०९ कोटी ३० लक्ष मैल दूर आहे. तर पृथ्वीपेक्षा १३ लक्षपट मोठा आहे. सूर्याला ज्योतिषात रवि असे संबोधले जाते. सूर्याच्या येणाऱ्या प्रकाशापासून पृथ्वीवरील जीवनमान अविरत सुरू आहे. शेतीपासून ते शरीरशास्त्रापर्यंत सूर्याला अतिशय महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. नवग्रहातील महत्त्वाचा ग्रह म्हणजे सूर्य. रविउदय झाला की, सृष्टीतील प्राणी आपापल्या कामाला सुरुवात करतात. म्हणूनच रवि हा आत्मा आहे. रवि आशा, आकांक्षा यांचे प्रतिक असल्याचे म्हटले जाते. 

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ज्योतिषात ग्रहांचं स्थान किती महत्त्वाचं? काय अन् कसा होतो परिणाम?

रविचे गुणधर्म आणि स्वभाववैशिष्ट्ये

माणसामध्ये जसे गुण, स्वभाववैशिष्ट्ये असतात, तशीच ग्रहांचीही सांगण्यात आली आहेत.  मेष ही रविची उच्चराशी आहे. म्हणजेच उच्चीचा सूर्य सर्वोत्तम फळे देऊ शकतो. या राशीत सूर्य स्वराशीप्रमाणे अधिक शुभदाता, प्रभावी ठरू शकतो.  तर तूळ ही नीचराशी आहे. म्हणजेच नीचस्थानीचा सूर्य अपेक्षित फळे देईलच असे नाही. तो प्रभावहीन ठरू शकतो. कृत्तिका, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा ही रविची नक्षत्रे असून, रविचे रत्न माणिक आहे. रवि अग्नितत्त्वाचा ग्रह मानला जातो. रविचा अग्नि विधायक मानला जातो. जसे की, पणती वा निरांजनाचा दिवा, स्वयंपाकासाठी वापरला जाणारा अग्नी वगैरे.  सिंह राशीचा स्वामी रवि आहे. शुक्र, शनि आणि राहु हे रविचे शत्रू ग्रह मानले गेले आहेत. रवि हा प्रशासक मानला गेला आहे. तसेच मान-सन्मान, उदारता, दानशूरपणा, निस्वार्थीपणा, सात्विकता, तेज, नाव, प्रतिष्ठा, कीर्ती, प्रसिद्धी, तेज, दयाळूपणा, लोकप्रियता, विश्वासार्हता, परोपकारी, धार्मिक असे काही गुण किंवा कारत्व रविची सांगितली जातात. 

मानवी शरीर, निसर्ग आणि रवि

पित्त, डोकेदुखी, उजवा डोळा, हाडे, हृदयरोग, उष्णता, डोळ्यांचे विकार, तीव्र ताप, भूक यांवर रविचा अंमल असल्याचे म्हटले जाते. निसर्गाचा विचार केल्यास हरिण, बैल, हंस, सिंह, मोर, वाघ यांवर रविचा अंमल असल्याचे सांगितले जाते. तसेच बेलाचे झाड, रुद्राक्षाचे झाड, काटेरी झाडे, गहू यांच्यावर रविचा अंमल असतो, असे म्हणतात. वास्तुचा विचार केल्यास पूर्व दिशा, दिवे, उजवीकडे असलेली खिडकी यावर रविचा अंमल असतो. 

रविशी निगडीत नातेसंबंध, शिक्षण आणि व्यवसाय

पिता-पुत्र या नातेसंबंधांवर रविचा अधिक अंमल असतो. हस्तरेषाशास्त्रानुसार, यशरेषा, अनामिका आणि त्यावरील उंचवटा यावर रविचा अंमल असतो. राज्यशास्त्र आणि सामाजिक विज्ञान शाखांवर रविचा अंमल मानला गेला असून, उच्च पदे, सन्माननीय पदे, रत्न व्यापारी, सोन्याशी संबंधित नोकऱ्या, सरकार सेवा, डॉक्टर, राजकारणी, सार्वजनिक सेवा या क्षेत्रांवर रविचा अंमल असतो. संत, संस्कृत आणि मूळ भाषा, वर्तुळ, प्रकाशयुक्त ठिकाणे, खुली मैदाने, कैलाश, कमळ, शिव मंदिरे, कश्यप गोत्र, तिखट, अंगण, वाळवंट, जंगले, पूजेची/धार्मिक ठिकाणे, संविधान यांवरही रविचा अंमल असल्याचे सांगितले जाते. पहिल्या भागात कुंडलीतील एक ते सहा स्थानावर रवि असेल, तर त्याचे जातकावर कसा प्रभाव असू शकतो किंवा जातकाला त्याचे कसे परिणाम मिळू शकतात, हे पाहणार आहोत. तर दुसऱ्या भागात रविशी संबंधित आणखी काही मान्यता, उपाय आणि कुंडलीतील सात ते बारा या स्थानावर रवि असेल, तर त्याचा जातकावर कसा अंमल असतो, याची माहिती घेणारे आहोत.

रविचा कुंडलीतील एक ते सहा स्थानांवरील प्रभाव -

१) प्रथम स्थान: कुंडलीतील पहिल्या स्थानाला लग्न स्थान असे संबोधले जाते. यावरून व्यक्तिमत्व, रुप-रंग, शरीर, यशापयश, पूर्वज, सुख-दुःख, आत्मविश्वास, अभिमान अशा गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानी रवि असेल, तर जातकाला जावळ कमी असते. शरीरयष्टी बहुधा उंच असते. आळशी, स्वाभिमानी, स्वभावाने हट्टी, चुकीच्या गोष्टींवर अडून बसणारा असतो. स्वभावाने हट्टी पण आपल्या स्वार्थासाठी विचार बदलणारा असतो. घरातील व बाहेरील लोकांशी पटत नाही. जन्मस्थानापासून दूर रहावे लागते. जीवनात खूप उतार-चढाव, अपयश बघावे लागते. मितभाषी असतो. बुद्धी तीक्ष्ण असते. 

२) द्वितीय स्थान: कुंडलीतील दुसरे स्थान धनस्थान मानले जाते. यावरून आर्थिक स्थिती, कुटुंबसांख्य, घराणे, संपत्ती पाहिली जाते. या स्थानात रवि असेल आणि रवि स्वृगहीचा सिंह राशीचा, उच्चीचा - मेष राशीचा, वृश्चिक, कर्क, धनु, मीन या मित्र राशीचा असेल तर जातक भाग्यवान, धनवान, सुख, साधनांनी परिपूर्ण, तीव्र बुद्धीचा, सत्कार्यात खर्च करणारा, स्वभावाने नम्र असतो. मिथुन, कन्या या बुधाच्या राशीतील किंवा वृषभ या शुक्राच्या राशीतील तर शुभ फले देतो. परंतु तूळ-मकर कुंभ या असेल तर शुभफले कमी मिळतात. स्वभाव खर्चिक असतो. आर्थिक स्थिती चांगली असतेच असे नाही. असे असले तरी स्वाभिमानी असतो. कौटुंबिक सुख कमी मिळते. मित्रांची संख्या कमी असते. 

३) तृतीय स्थान: कुंडलीतील तिसरे स्थान मातृस्थान मानले जाते. यावरून भावंडे, शैली, जनसंपर्क, भावंडांकडून मिळणारे सुख अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानी रवि असेल तर, जातक, उत्साही, पराक्रमी व प्रतिभावंत असतो. जातकाला भावंडे कमी असतात. जातकाचे जीवन भटके असते. विरोधक व शत्रू त्याच्या कर्तृत्त्वामुळे बिचकून असतात. राजद्वारीसुद्धा त्याचे चांगले वजन असते. जीवन संपन्न असते. स्वभाव मृदू व राजसी असतो. २० व्या वर्षी किंवा त्यांनंतर धनलाभ होतो. दानशूर असतो. 

४) चतुर्थ स्थान: कुंडलीतील चौथे स्थान सुखस्थान मानले जाते. हे मनाचे कारक स्थानही मानले जाते. गृहसौख्य, सासर, वाहनसौख्य, घरातील वस्तु, घराभोवतालचा परिसर, पदवी, मालमत्ता अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. चतुर्थ स्थानी रवि असता जातकाचे स्वास्थ्य चांगले व शरीरयष्टी प्रभावशाली व आकर्षक असते. कठोर स्वभाव असल्याने कुटुंबियांशी याचे कमी पटते. विदेशयात्रा करून पैसा मिळवतो. बुद्धी मध्यम असूनही धाडस मोठे असल्याने विरोधक याला घाबरतात. संगीतकलेसारख्या ललित कलेत रुचि असते. विशेष संपन्नता नसतानाही जीवन सुखी असते. मानसिक सुख-शांती कमी मिळते. जन्मापासून ३२ वे वर्ष भाग्योदयकारक ठरते.

५) पंचम स्थान: कुंडलीतील पंचमस्थान संततीस्थान मानले जाते. यावरून संततीसुख, प्रेमातील यश, शिक्षण, कलेतील यश, आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. पंचम स्थानातील रवी जातकाच्या पित्याला मध्यम फले देतो. पित्याचे सुख जातकाला कमी प्रमाणात मिळते. जातकाला संततिसुख समान्य मिळते. लहानपणाचा काळ साधारण जातो.  बुद्धि चांगली असते. गुढ रहस्ये, गुप्त विद्या, गणित व यांत्रिक विद्येत रुचि असते. अतिशय चतुर अन् चलाख असतो. पुढारी, वकील म्हणून चांगले यश मिळवतात. 

६) षष्ठस्थान: कुंडलीतील षष्ठस्थान म्हणजेच सहावे स्थान शत्रूस्थान मानले जाते. यावरून शत्रू, गुप्त शत्रू, शारीरिक व्याधी, मामा, मावशीकडून मिळणारे सुख, नोकर-चाकर, मानसिक वा शारीरिक ताण अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानी रवि असेल तर, जातक शत्रूनाशक, योगाभ्यासी, भावंडांना सुख देणारा असतो. कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी येते. आईकडील परिवाराकडून सुख कमी मिळते. शरीरप्रकृति चांगली राहते. राज्यशासनाकडून सन्मान व अधिकार मिळतो. शासनाकडून दंड व शिक्षाही होण्याचा संभव असतो. प्रवासात किंवा प्रवासामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. शारीरिक त्रास भोगावा लागतो. 

रविचा कुंडलीतील सात ते बारा स्थानांवरील प्रभाव पाहण्यासाठी क्लिक करा...

- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: navgrahanchi kundali katha know about significance of sun in janm kundali and effect on janm patrika of navagraha raja surya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.