Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:06 IST2025-07-29T11:04:09+5:302025-07-29T11:06:15+5:30

Nag Panchami 2025: आपल्या सण उत्सवांचा संबंध शास्त्र आणि विज्ञानाशी आहे आणि ते समजावून सांगण्यासाठी बोधपर कथाही आहेत, नागपंचमीची कथाही त्यापैकीच एक!

Nag Panchami 2025: Why is Nag Panchami celebrated, have you read the mythology behind it? | Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?

Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?

चातुर्मासात येणारे सगळेच सण वैशिष्ट्य पूर्ण असतात. त्यामागे कथाही रोचक असतात. श्रावण वद्य पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. आज २९ जुलै रोजी नागपंचमी(Nag Panchami 2025) आहे. नागपंचमीला चिरणे, तळणे, भाजणे इ. क्रिया टाळण्यामागे काय आहे मूळ संकल्पना? सांगताहेत रवींद्र वा.गाडगीळ!

Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

नागपंचमीला नाग, साप यांची ओळख व्हावी, या उद्देशाने गावाबाहेर जाऊन, वारुळ शोधून त्यांचे रूप, रंग, जात, कात, अंडी, पिल्ले, विष, आकार इ. कळावे यासाठी पूर्वजांनी काही एक मनात ठेवून हे सणवार ठेवलेले दिसतात. 

तत्कालीन प्राणीमित्र या नात्याने निसर्गाची जवळून ओळख होण्याबरोबरच नेहमी चूल,मूल यात रमणाऱ्या स्त्रियांना हवापालटासाठी ही योजना केली होती. यातून एकमेकांशी ओळख, सुसंवाद, सुख दु:ख वाटणी, अनेक माहितीची देवाण घेवाण होत असे. नागोबाशी मनातच शब्देवीण संवाद साधण्याची सोय म्हणजे ही पूजा.

पूर्वी गारुडी लोक नागांना पुंगी वाजवून, पोतड्यात घेऊन गावात घेऊन येत. त्यांना सापांना पकडणं, जात ओळखणं, विष काढणं ही कला अवगत असे, त्यामुळे त्यांनाही या साप-नाग पालनाचे व पकडण्याचे श्रेय म्हणून अल्प-स्वल्प स्वरूपात धन, धान्य, पैसे इ. दिले जाई. दरवर्षी एकदातरी या साप, नाग, प्राणी आणि गारुडी यांची व्यवस्था पाहता यावी, समाजाने यांना काही मदत करता यावी, यांची काही जोपासना करता यावी, यासाठी  हा कृतज्ञता दिवस. 

Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!

त्यांच्यासाठी अनेक कथा, कहाण्या प्रचलित आहेत. खरं तर, भारतापुरते पाहिल्यास पूर्वेकडील नाग लोकांना आर्यांनी आपल्यात सामावून घेतले आणि सन्मान केला, म्हणूनही हा प्रतिक पूजनाचा दिवस. ती कथा पुढीलप्रमाणे आहे -

एकदा एक शेतकरी जमीन नांगरीत असतना त्याच्या नांगराचा  फाळ नागाच्या बिळात घुसला. त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेरून आलेल्या नागिणीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला. त्या रागाच्या भरात तिने शेतकऱ्याला त्याच्या बायकोमुलांसह दंश करून मारले. त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती. शेवटी तिलादेखील दंश करून मारण्यासाठी नागीण तिच्या गावी, तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती. मनोभावे पूजा करून तिने दूधलाह्यांचा नैवेद्य पूजेतल्या नागाला दाखवला. तिची ती भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला. ती स्वत: ते दूध प्यायली. तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले.

दुसऱ्या कथेनुसार एका सावकाराला सात मुलगे होते. त्यापैकी धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता. एकदा तिने एका सापाला मरताना वाचवले. त्यावेळी त्या सापाने तिला तिने मागितले तेवढे धन दिले. त्यामुळे ती अधिक सुखी समृद्ध जीवन जगू लागली. 

या कथांवरून कळते, की आपली संस्कृती प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवते. यासाठीच नागपंचमीच्या दिवशी चिरणे, भाजणे, तळणे, खोदणे इ. कामे टाळली जातात. तरीदेखील हा सण असल्यामुळे मोदक, पुरणपोळी, दिंड , पातोळ्या यांसारखे पदार्थ त्यादिवशी किंवा आदल्या दिवशी करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो.

सापांना ठार मारून त्यांची जमात नष्ट केली जाऊ नये, म्हणून पूर्वजांनी किती विचारपूर्वक सांगितलं आहे. कारण, हा महिना त्यांचा प्रसुती काळाचा असतो. त्यादिवशी कोणतेही तळणे, भाजणे, खणणे, कुटणे, कांडणे इ. बलप्रयोग कुठेही करायचे नाही. कारण, जमिनीत पावसाळ्यात पाणी शिरल्यामुळे, तसेच पेरणी, वखरणी, नांगरणी यामुळे त्यांच्या वस्तीवर आपल्याकडून अतिक्रमण होतो. त्यामुळे ते आसरा ईतस्त: शोधत असतात. म्हणून या सर्व कृत्यांवर बंधन.

सहसा हे प्राणी कोणाच्या वाट्याला जात नाहीत. उंदराच्या शोधात कधी कधी घरातही अडगळीत, अंधारात, दमट अशा जागी येऊन बसतात. परंतु, म्हणून दिसला की चाव, अशी त्यांची प्रवृत्ती मुळीच नसते.

Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!

पूर्वी कुंभार मातीचे नाग करून विकत. त्यांनाही एक जोडधंदा! आपला देश शेतीप्रधान आहे. अजूनही ६७ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहे. साप शेतीचे संरक्षण करतो म्हणजे तो क्षेत्रपाल आहे. 

ईश्वराने या विश्वातील प्रत्येक जीवसृष्टी अत्यंत विचारपूर्वक निर्माण केली आहे. त्यामुळे त्याला मारण्याचा अधिकार आपल्याला नाही, हे ही पूजा आपल्याला सांगते. जे आपण जन्माला घालू शकत नाही, त्याला मारण्याचा अधिकार आपल्याला नाही, जर तो आपल्याला उपद्रव करत असेल, जीवावर उठत असेल, तरच आपल्या संरक्षणासाठी त्याला मारता येईल, असे भगवान बुद्ध सांगतात.

नागोबाची दूध आणि लाह्या, दूर्वा वाहून पूजा होते. देवपूजेच्या जागी किंवा अंगणात सारवलेल्या जागी पाटावर किंवा केळीच्या पानावर गंधाचे नाग काढून किंवा मातीच्या नागमूर्तीची पूजा करतात. दुसऱ्या दिवशी कर्दळीच्या किंवा अळूच्या वनात ठेवून देतात. 

माहेरवाशिणी, सासुरवाशिणी फुगडी , झिम्मा इ. खेळ खेळतात. उखाणे, म्हणी, टोमणे, फिरक्या, विनोद याला रात्रभर ऊत येतो. 

'दिंड' हा पदार्थ पोळीच्या पिठात पुरण घालून, उकडवून त्यादिवशी खास नैवेद्य दाखवला जातो. त्यावर तूप घालून तो खाल्ला जातो.

हाफकिन इन्स्टिट्यूट, परळ येथे दर गुरुवारी साप, नाग दर्शन व मार्गदर्शन मुक्त आणि मुफ्त होत असे. त्यांच्या जहरी विषातून संजीवर देणारी औषधे तेथे निर्माण होतात. म्हणून त्यांची जवळून ओळख आणि माहिती होण्यासाठी हे प्रदर्शन भरते. आपणही या संस्थेला भेट देऊन आपल्या ज्ञानात भर घालू आणि आर्थिक मदत करू. 

Web Title: Nag Panchami 2025: Why is Nag Panchami celebrated, have you read the mythology behind it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.