Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:22 IST2025-07-29T13:21:41+5:302025-07-29T13:22:39+5:30
Nag Panchami 2025: नागपंचमीला महाकालेश्वर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागते, कारण श्रावण मास त्यात नागपंचमी हा दिवस मंदिराच्या दृष्टीने असतो खास!

Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
नुकताच श्रावण(Shravan 2025) महिना सुरु झाला, त्यातच आज नागपंचमीचा(Nag Panchami 2025) सण. आजच्या दिवशी महाकालेश्वर मंदिराचा तिसरा दरवाजा उघडला जातो. यामागे असणारे कारण आणि या ज्योतिर्लिंगाचे महत्त्व जाणून घेऊया. अनेकांना हे माहीत नाही की हे स्थान ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे.
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
उज्जयिनीचे महाकालेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्रिपुरासुर माजला होता. त्याचा वध शिवशंकरांनी या ठिकाणी केला. याचाच अर्थ त्रिपुरासुरावर विजय मिळवला. म्हणून या ठिकाणाचे नाव उज्जयिनी आहे. तिथे शिव शंकरांची आपल्या परिवारासह शेषावर विराजमान झालेली अद्भुत मूर्ती आहे. अशा मूर्तीचे दर्शन अन्यत्र कोठेही घडत नाही. हे मंदिर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे . परंतु या मंदिराच्या तीन भागांपैकी सर्वात वरचा भाग तो म्हणजे नाग चंद्रेश्वर मंदिराचा भाग हा केवळ नागपंचमीच्या (Nag Panchami 2025) दिवशी २४ तास खुला असतो आणि त्याच दिवशी या सुंदर मूर्तीचे दर्शन घेता येते.
महाकालेश्वर मंदिर तीन भागात विभागले आहे. गर्भगृहात अर्थात तळ घरात महाकालेश्वर विराजित आहेत. मधल्या भागात ओंकारेश्वर विराजित आहेत आणि वरच्या भागात नाग चंद्रेश्वर विराजित आहेत. गर्भ गृह आणि मध्य गृह दर्शनासाठी नेहमी खुले असतात, परंतु नाग चंद्रेश्वराचा भाग दर्शनासाठी केवळ नागपंचमीलाच खुला केला जातो.
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
नाग चंद्रेश्वर मंदिरात असलेली मूर्ती अकराव्या शतकातली आहे असे म्हटले जाते. ही मूर्ती नेपाळवरून आणली असल्याचे पुरावे आहेत. आपण नेहमी विष्णूंना शेष शय्येवर विराजमान झालेले पाहतो, परंतु याठिकाणी समस्त शंकर कुटुंबीय शेष शय्येवर विश्रांती घेत असलेले दिसतात. ही प्रतिमा केवळ अद्भुत आहे. या मंदिरात असलेल्या नागमूर्तींच्या दर्शनाने सर्व प्रकारचे सर्पदोष नष्ट होतात अशी श्रद्धा आहे, म्हणून नागपंचमीच्या दिवशी भाविक मोठ्या प्रमाणात तिथे दर्शनासाठी गर्दी करतात.
या परिसरात माता सतीचे कोपर गळून पडले होते म्हणून हे एकावन्न शक्तिपीठांपैकी एक मानले जाते व तिथे देवीच्या कोपराची पूजा केली जाते. त्यामुळे हे केवळ भगवान शिवाचेच नाही तर माता सतीचे देखील शक्तीपीठ आहे.
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
तिथल्या प्रथेमध्ये आजतागायत खंड पडलेला नाही. नागपंचमीच्या दिवशी तिथे त्रिकाल पूजा केली जाते. पहिली पूजा नागपंचमीची तिथी सुरु होते तेव्हा, दुसरी सूर्योदयाला आणि तिसरी सूर्यास्ताला केली जाते. आज नागपंचमीच्या निमित्ताने आणि श्रावण मासाच्या निमित्ताने आपणही नाग चंद्रेश्वराचे आणि महाकालेश्वर तसेच ओंकारेश्वराचे चित्रमय दर्शन घेऊन पावन होऊया. हर हर महादेव!