Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:04 IST2025-07-28T13:03:13+5:302025-07-28T13:04:13+5:30
Nag Panchami 2025 Rituals: २९ जुलै रोजी नागपंचमी आहे, त्यादिवशी नागपूजेबरोबरच लेखात दिलेल्या आठ नागांचे स्मरणही आवश्यक आहे.

Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
हिंदू धर्मात सापांना पूजनीय मानले गेले आहे. भगवान शिवाने गळ्यात नाग धारण केला आहे. ज्यामध्ये भगवान विष्णू शेष शय्येवर विसावले आहेत. कृष्ण अवतारात या शेषाने बलरामाचे रूप घेतले आहे आणि मोठा भाऊ म्हणून कृष्णाचे संगोपन केले आहे. अशी विविध भूमिका बजावणारे शेष नाग यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो. तसेच नाग हे भगवान शंकरांना प्रिय असल्यामुळे श्रावण मासात पंचमीला हा उत्सव केला जातो. यंदा २९ जुलै रोजी हा सण साजरा केला जाईल.
नागपंचमीला नागांचे स्मरण केल्याने होणारे लाभ
यावर्षी नागपंचमी(Nag Panchami 2025) २९ जुलै २०२५ रोजी येत आहे. श्रावण मास भगवान शिवाला समर्पित आहे. भगवान शिवाने सर्पहार गळ्यात घातले आहेत. त्यामुळे नगांची केलेली पुजा त्यांनाही प्रसन्न करते. नागपंचमीच्या दिवशी आठ नाग देवतांची पूजा केली जाते. हिंदू धर्मात ८ सर्प देवता आहेत. या सर्पदेवतांची पूजा केल्याने सर्पदंश, अकाली मृत्यू, भय, संपत्तीची हानी आणि दुःखापासून मुक्ती मिळते. नागदेवतेची पूजा केल्याने अपार सुख, समृद्धी, संपत्ती मिळते.
हे ही वाचा : Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
या नाग देवतांची पूजा करा
हिंदू धर्मात ८ सर्प देवतांचा उल्लेख आहे आणि त्या सर्वांचे वेगळे महत्त्व आहे.
वासुकी नाग : वासुकी नाग हा भोलेनाथांच्या गळ्यातला शोभा मानला जातो. शेषनागाचा भाऊ मानला जातो. असे मानले जाते की जेव्हा देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा दोरीऐवजी वासुकी नागाचा वापर केला गेला. वासुकी नाग हा तोच नाग आहे ज्याने लहानपणी वासुदेवांनी नदी ओलांडताना भगवान श्रीकृष्णाचे रक्षण केले होते.
अनंत नाग : अनंत नाग हे भगवान श्रीहरींचे सेवक मानले गेले आहेत. अनंत नाग यांना शेषनाग असेही म्हणतात. अनंत नागाच्या फण्यावर पृथ्वी वसलेली आहे असे मानले जाते.
पद्म नाग : पद्म नागाला महासर्प म्हणतात. असे मानले जाते की गोमती नदीजवळ पद्म नाग राज्य करत असे. पुढे हे साप मणिपूरमध्ये स्थायिक झाले. म्हणूनच त्यांना नागवंशी म्हणतात.
महापद्म नाग : महापद्म नागाचे नाव देखील शंखपद्म आहे. महापद्म नागाच्या कुशीवर त्रिशूलाची खूण आहे. महापद्म नागाचे वर्णन विष्णु पुराणातही आढळते.
हे ही वाचा : Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
तक्षक नाग : तक्षक नाग हा क्रोधित नाग मानला जातो. पाताळ येथे तक्षक नाग राहतो असे मानले जाते. तक्षक नागाचे वर्णनही महाभारतात आले आहे.
कुलीर नाग : कुलीर नाग हा ब्राह्मण कुळातील मानला जातो आणि जगत्पिता ब्रह्माजींशी त्यांचा संबंध सांगितला जातो.
कर्कट नाग : कर्कट नाग हे महादेवाचे गण मानले गेले आहे. हे साप अतिशय घातक असून त्यांच्या प्रतिमेची पूजा केल्याने कालीच्या शापापासून मुक्ती मिळते.
शंख नाग : शंख साप हा सर्वात बुद्धिमान साप मानला जातो.
या सर्व नागांचे वैशिष्ट्य वेगवेगळे असले तरी आपण विष्णू आणि शिवाचे आवडते प्रतीक म्हणून या सर्व नागांचे स्मरण करून नागपंचमी साजरी केली पाहिजे.