अनेक साधू भस्मलेपन करतात, त्याने काय साध्य होते? आपणही भस्मलेपन करू शकतो का? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 14:35 IST2022-01-15T14:35:11+5:302022-01-15T14:35:29+5:30
भस्म हे प्रभावी असल्यामुळे शरीरातील सांधे, कपाळ, छाती, पाठ इत्यादींवर नियमित भस्मलेपन केल्याने संधिवातादी रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.

अनेक साधू भस्मलेपन करतात, त्याने काय साध्य होते? आपणही भस्मलेपन करू शकतो का? जाणून घ्या!
भक्तीमार्गातले अनेक जण, विशेषत: साधू संन्यासी भस्मलेपन केलेले आढळतात. ही केवळ त्यांची धार्मिक ओळख नसून भस्मलेपन विधीचे फायदे त्यांना मिळतात. त्यांच्याप्रमाणे आपणही भस्मलेपनाचा लाभ घेऊ शकतो का, हे 'शास्त्र असे सांगते' या पुस्तकाच्या आधारे सविस्तर जाणून घेऊ.
गायींच्या रानशेणीपासून केलेले भस्म हे सर्वोत्कृष्ट होय. अग्निहोत्राच्या होमकुंडातील भस्मदेखील उत्कृष्ट भस्म होय. तथापि, काही ठिकानी नैसर्गिक प्रक्रियेने भस्म तयार होते हे भस्मदेखील भस्मधारणास वापरतात.
भस्मामध्ये दुर्गंधनाशक व मनास उत्तेजक अशी विविध संप्रेरक द्रव्ये आणि विविध रासायनिक घटक असतात असे सिद्ध झालेले आहे. भस्मलेपनामुळे अंगावरील रंध्रे बुजून जातात असा गैरसमज आहे. पण परिस्थिती नेमकी उलट असते. भस्मामध्ये शरीरातील कर्बद्विप्राणिल द्रव्ये शोषून घेण्याची शक्ती असते. इतकेच नव्हे तर भस्म हे प्रभावी जंतुघ्न व शोथघ्न असल्यामुळे शरीरातील सांधे, कपाळ, छाती, पाठ इत्यादींवर नियमित भस्मलेपन केल्याने संधिवातादी रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. तसेच अंगातील तेज व ओज यांचेही रक्षण होते. यासाठीच विशेषत: साधू संन्यासी भस्मलेपन करतात.
शरीरशुद्धी हा भस्मधारण विधीचा मुख्य हेतू आहे. त्यानुसार कोणत्याही वयोगटातील स्त्रीपुरुषांनी स्नानानंतर भस्मधारण विधी करण्यास हरकत नसते. कपाळाला भस्म लावून झाल्यावर पुरुषांनी चंदनाचा टिळा तर स्त्रियांनी कुंकू लावावे. देहाची शुद्धता, पवित्रता स्त्री पुरुष दोघांनी राखावी.
अंगठा व त्याच्या बाजूचे बोट सोडता तर्जनी, मध्यमा आणि अनामिका या शेवटच्या तीन बोटांच्या पेरांनी भस्मलेपन केले जाते. ही तिनही बोटे पितृ, आत्म आणि देव तीर्थांची प्रतिके मानली जातात. भस्मलेपन करताना आधी दोन्ही तळहातांना, नंतर दोन्ही हात तसेच कपाळावर लावतात. त्याला त्रिपुंड्र असे म्हणतात.
छाती, नाभि, कंठ, खांदे, कोपर, मनगटे, पाठ, शिर या स्थानी भस्म लावावे. शरीराच्या उजव्या बाजूला डाव्या हाताने तर डाव्या बाजूला उजव्या हाताने भस्मलेपन करता येते. भस्मलेपन करताना प्रत्येकवेळी ऊँ नम: शिवाय हा मंत्र अवश्य जपावा. सेच गायत्री मंत्र किंवा ऊँकार मंत्र उच्चारत भस्मलेपन केले जाते.