महाशिवरात्री: रुद्राक्ष धारण करायचाय? खरा की खोटा हे कसे ओळखाल? ‘अशी’ करा अस्सलतेची पारख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 11:16 AM2024-03-03T11:16:05+5:302024-03-03T11:17:16+5:30

Mahashivratri 2024 How To Identify A Real Rudraksha: रुद्राक्ष धारणासाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. खरा रुद्राक्ष धारण करण्याची एक विशिष्ट पद्धत असून, ती आचरणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते.

mahashivratri 2024 know about how to identify a real rudraksha and exact process to wear | महाशिवरात्री: रुद्राक्ष धारण करायचाय? खरा की खोटा हे कसे ओळखाल? ‘अशी’ करा अस्सलतेची पारख

महाशिवरात्री: रुद्राक्ष धारण करायचाय? खरा की खोटा हे कसे ओळखाल? ‘अशी’ करा अस्सलतेची पारख

Mahashivratri 2024 How To Identify A Real Rudraksha: ०८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री आहे. मराठी वर्षात श्रावण महिन्यानंतर महाशिवरात्रीचा दिवस शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो. देशभरातील हजारो शिवमंदिरांमध्ये लाखो भाविक शिवचरणी नतमस्तक होतात. रुद्राभिषेक, जलाभिषेक करतात. शिवाचे व्रताचरण, पूजन मंत्रपठण, जप करतात. महादेवांची विविध प्रतीके अत्यंत महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण मानली जातात. महादेवांच्या अनेकविध प्रतीकांपैकी एक म्हणजे रुद्राक्ष. रुद्राक्षाचे आध्यात्मिक महत्त्व जेवढे अद्भूत आहे, तेवढेच अनेक रोगांवर आणि आजारांवर रुद्राक्ष अत्यंत गुणकारी व विशेष वैशिष्ट्यपूर्ण मानला गेला आहे. 

महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले गेले आहे. मात्र, रुद्राक्ष खरा आहे की नाही, याची खात्री करून मगच तो धारण करावा, असा सल्ला प्रामुख्याने दिला जातो. रुद्राक्ष खरा नसेल, तर तो धारण करून त्याचे लाभ मिळत नाहीत. त्यामुळे खात्री केल्याशिवाय रुद्राक्ष धारण करू नये. खरा रुद्राक्ष कसा ओळखावा? रुद्राक्षाचे गुणधर्म, वैशिष्ट्ये काय आहेत? कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणता रुद्राक्ष घालावा? याबाबत माहिती जाणून घेऊया...

रुद्राक्ष वृक्ष आणि औषधी गुणधर्म

रुद्राक्षाच्या वृक्षालाच रुधिरवृक्ष असे म्हणतात. त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव 'एलिओकार्पस स्फेरिकस' असे आहे. हा सदाहरित वृक्ष हिमलयाच्या पायथ्याच्या डोंगराळ प्रदेशाच्या जंगलात आढळतो. या झाडाचे लाकूड, हलके, मजबूत व चिवट असते. पाने चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानासारखी पण टोकदार, थोडी, लांब असतात. या वृक्षाला पानांच्या बंगलेत लोंब्या येऊन पांढरीशुभ्र, मंद वासाची फुले येतात. एप्रिल ते जुलै या काळात या वृक्षाला बोराच्या आकाराची गोल, जांभळट रंगाची फळे येतात. मेंदुचे विकार व अपस्माराचे झटके या विकारावर तो औषध म्हणून उपयोगी आहे. ही फळे झाडावर पिकून थंडीत खाली पडतात. आतील बी रुद्राक्ष म्हणून ओळखली जाते. रुद्राक्षाचा रंग तांबूस असतो आणि तो पक्का असतो. उच्च रक्त दाब नियंत्रणासाठी व मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रुपात परिधान केला जातो. 

अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व

अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे. हिंदू, बौद्ध, शीख व मुस्लिम धर्मामध्येही रुद्राक्ष पवित्र मानतात. कोणत्याही देवतेचा जप करण्यासाठी रुद्राक्ष माळ वापरतात. तारकापुत्र अधर्माचरण करू लागल्याने विषादाने शंकराच्या नेत्रांतून पडलेल्या अश्रूंचे ‘रुद्राक्षवृक्ष’ होणे आणि शिवाने तारकापुत्रांचा नाश करणे. अक्ष म्हणजे डोळा. रुद्र ±अक्ष म्हणजे जो सर्व पाहू आणि करू शकतो तो रुद्राक्ष. अक्ष म्हणजे आस. डोळा एकाच अक्षाभोवती फिरतो; म्हणून त्यालाही अक्ष म्हणतात. देवीभागवत, शिवलीलामृत, शिवपुराण, स्कंदपुराण, पूरश्चरण-चंद्रिका, उमामहेश्वर तंत्र श्रीगुरुचारीत्र इत्यादी ग्रंथातून रुद्रक्षाचे विस्तृत वर्णन आढळते.

सप्तमुखी रुद्राक्षाच्या पूजनाने सर्व देवता प्रसन्न होतात

एकमुखी रुद्राक्ष दुर्मिळ असून, शिवाचे रूप समजला जातो. हा ज्याच्याजवळ असेल त्याला शत्रू असत नाहीत व त्याच्या घरात लक्ष्मी निरंतर वास करते, असे मानले जाते. दोनमुखी रुद्राक्ष म्हणजे शंकर पार्वतीचे एकत्र रूप समजले जाते. अग्निरुपात असलेला तीनमुखी रुद्राक्ष धारण केल्यास कोणताही विकार होत नाही, असे मानले जाते. चारमुखी रुद्राक्षाच्या पूजनाने धनप्राप्ती होते व असलेला पैसा अस्थानी खर्च होत नाही, अशी मान्यता आहे. पाचमुखी रुद्राक्ष काळाचा शत्रू असून, याच्या पूजनाने अकाली मृत्यू येत नाही, असे सांगितले जाते. सहामुखी रुद्राक्षाची कार्तिकेय स्वरूपात गणना केली जाते व तो शक्तीवर्धक समजला जातो. सप्तमुखी रुद्राक्षाच्या पूजनाने सर्व देवता प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे.

ब्रम्हा, विष्णू, महेश किंवा दत्तस्वरूप रुद्राक्ष

अष्टमुखी रुद्राक्षाला गणेश रूप मानून कार्यसिद्धीसाठी याची पूजा केली जाते. नऊमुखी रुद्राक्षाला काळभैरवाचे स्वरूप समजून बाधा, पीडा, टळावी म्हणून याचे पूजन केले जाते. दहामुखी रुद्राक्षाची जनार्दन स्वरूपात गणना केली जाते. अकरामुखी रुद्राक्षाच्या पूजनाने इंद्रदेवता व अकरा रूद्र प्रसन्न होतात. बारामुखी रुद्राक्षाला सूर्यस्वरूपी मानून, या रुद्राक्ष पूजनाने महाविष्णू प्रसन्न होतात, असे मानले जाते. तेरामुखी रुद्राक्षाच्या पूजनाने सिद्धी प्राप्त होते, असे सांगितले जाते. चौदामुखी रुद्राक्षाची रोगनिवारण होऊन इच्छा पूर्ती होण्यासाठी पूजा केली जाते. गौरीशंकर रुद्राक्षात एकाच देठावर दोन मणी काही वेळा आढळतात किंवा एकाच देठावर तीन रुद्राक्ष येतात. त्यांना ब्रम्हा, विष्णू, महेश किंवा दत्तस्वरूप समजले जाते.

खरा रुद्राक्ष नेमका कसा ओळखावा

रुद्राक्षाच्या अस्सलतेची ओळख करण्याच्या काही पद्धती सांगितल्या जातात. यामध्ये खरा रुद्राक्ष ओळखण्याची पद्धत तुलनेने सोपी आणि सरळ आहे. पूर्णपणे पिकलेले रुद्राक्ष कुठल्याही आकाराचे असले तरी पाण्यात टाकल्यावर बुडते. पाण्यामध्ये पटकन बुडणारे रुद्राक्ष हे अस्सल आहे, याची खात्री बाळगायला हरकत नाही. पाण्यात हळुवारपणे बुडेल ते खोटे, अथवा हलक्या दर्जाचे समजावे. रुद्राक्ष हे पाच-दहा मिनिटे तळहातात घट्ट दाबून धरले आणि नंतर हलवले तर त्यातून मंजुळ ध्वनी प्रतीत होतो, असे सांगितले जाते. तांब्याच्या २ भांड्यामध्ये व तांब्याच्या २ पटत्यांमध्ये रुद्राक्ष ठेवले असता अस्सल रुद्राक्ष लगेचच हालचाल दर्शवतो. खरा रुद्राक्ष जसा तरंगत नाही, तसा उकळत्या पाण्यात जर ६-८ तास ठेवला, तरी त्याचे विघटन होत नाही. रुद्राक्ष हे कुठल्याच बाजूने मोडत किंवा वाकत नाही. अस्सल रुद्राक्ष बराच वेळ दुधात ठेवला तर दूध नासत नाही. रुद्राक्ष हा प्रामुख्याने गोल असतो. तो दिसायला काटेरी असला तरी ते काटे बोथट, खडबडीत, त्याचे काठिण्य भरपूर असते. खऱ्या रुद्राक्षाला कीड लागत नाही, असे सांगितले जाते.

याला अमृतफळ असेही म्हणतात

अस्सल रुद्राक्ष जड, वजनदार आणि सतेज असतो. त्याची मुखे स्पष्ट असतात. ॐ, शिवलिंग, स्वस्तिक, अशी शुभचिन्हे असलेला रुद्राक्ष अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. पांढऱ्या रंगाचा रुद्राक्ष सर्वांत चांगला आणि अत्यंत शुभ मानला जातो. त्यापेक्षा कनिष्ठ रुद्राक्ष अनुक्रमे तांबडा, पिवळा आणि काळा रंग असलेले असतात. पांढरे आणि पिवळे रुद्राक्ष सहसा आढळत नाहीत. तांबडे आणि काळे रुद्राक्ष सर्वत्र आढळतात. रुद्राक्षाच्या झाडाला वर्षाला एक ते दोन सहस्र फळे लागतात, अशी मान्यता आहे. हिमालयातील यती केवळ रुद्राक्षफळ खातात. याला अमृतफळ असेही म्हटले जाते. ते खाल्ल्यास तहान लागत नाही, असे सांगितले जाते.

रुद्राक्ष धारण कसा करावा? विधिवत धारण करणे आवश्यक

रुद्राक्ष एक विशिष्ट पद्धत आहे. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी अभिमंत्रित करणे आवश्यक असते. रुद्राक्ष अभिमंत्रित करून विधिवत धारण केले नाही, तर त्याचा लाभ मिळत नाही, अशी मान्यता आहे. रुद्राक्ष अभिमंत्रित केल्याने मानवी शरीरातील प्राण तत्त्व आणि विद्युत शक्ती नियंत्रित होते. अभिमंत्रित केलेले रुद्राक्ष अत्यंत गुणकारी असतो, असे सांगितले जाते. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी सात दिवस ते मोहरीच्या तेलात भिजवावे. यानंतर लाल धागा, चांदीची माळ या माध्यमातून तो धारण करावा. रुद्राक्ष परिधान करण्यापूर्वी गंगाजलमिश्रित पंचामृत, पंचगव्य यांनी रुद्राक्षाला अभिषेक करावा. ते स्वच्छ करून घ्यावे. यानंतर 'ॐ नमः शिवाय' आणि 'ॐ तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात्' या दोन्ही मंत्रांचा १०८ वेळा जप करावा आणि रुद्राक्ष धारण करावे, असे सांगितले जाते. ज्या रुद्राक्ष माळेचा जपासाठी वापर केला जातो, ती माळ धारण करू नये. तसेच धारण केलेल्या माळेचा जपासाठी, नामस्मरणासाठी वापर करू नये, असे सांगितले जाते.
 

Web Title: mahashivratri 2024 know about how to identify a real rudraksha and exact process to wear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.