Mahakumbh 2025: यावेळी कुंभस्नानाची संधी हुकली? जाणून घ्या पुढचे कुंभपर्व कुठे आणि कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 11:55 IST2025-02-25T11:54:35+5:302025-02-25T11:55:33+5:30
Mahakumbh 2025: महाशिवरात्रीला महाकुंभमेळ्याची सांगता होईल, त्यामुळे साहजिकच पुढचा कुंभमेळा कधी व कुठे याची उत्सुकता निर्माण झाली आहे, त्याची माहिती.

Mahakumbh 2025: यावेळी कुंभस्नानाची संधी हुकली? जाणून घ्या पुढचे कुंभपर्व कुठे आणि कधी?
सध्या प्रयागराज येथे महाकुंभ (Mahakumbh 2025) सुरू आहे आणि त्याच्या बातम्या रोजच चर्चेत असतात. जगभरातून लोक मोठ्या संख्येने प्रयागला पोहोचून त्रिवेणी स्नानाचा लाभ घेत आहेत. कारण यंदाचा महाकुंभ योग तब्ब्ल १४४ वर्षांनी जुळून आला आहे. त्यामुळे त्याचे महत्त्वही वाढले आहे. या महाकुंभ पर्वात देशभरातीलच नाही तर जगभरातील कोट्यवधी भाविकांनी कुंभ स्नानाचा लाभ घेतला. हे पर्व महाशिवरात्रीला (Maha Shivratri 2025) अर्थात २६ फेब्रुवारीला संपणार आहे, त्यामुळे पुढचा कुंभमेळा कधी व कुठे याबद्दल उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्याबद्दल जाणून घेऊ.
प्रयागराजमध्ये १२ वर्षांतून एकदा महाकुंभ आयोजित केला जातो, तर हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकमध्ये दर ६ वर्षांनी सामान्य कुंभ आयोजित केला जातो. पुढील कुंभ २०२७ (Kumbhmela 2027) मध्ये नाशिक येथे होणार आहे. यापूर्वी २०१५ मध्ये नाशिक येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. महाकुंभ च्या हा कार्यक्रम प्रयागराजमध्ये १२ वर्षांतून एकदा होतो, तर सामान्य कुंभ हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकमध्ये दर ६ वर्षांनी होतो. महाकुंभातील स्नान हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. महाकुंभात स्नान केल्याने पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते, असा समज आहे. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या कुंभ मेळ्यात सहभागी होण्याची तयारी आतापासूनच करून ठेवा.
नाशिकमध्ये भरणार पुढचा कुंभमेळा :
महाकुंभाचा संबंध समुद्रमंथनाशी आहे. पुराणांमध्ये आढळलेल्या वर्णनानुसार, समुद्रमंथनातून निघालेल्या अमृत पात्रातील थेंब ४ ठिकाणी सांडले. पृथ्वीवरील ही चार ठिकाणे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. अमृत कलशातून सांडलेले थेंब प्रयागराजमधील गंगा, यमुना आणि सरस्वती नदी, उज्जैनमधील शिप्रा नदी, हरिद्वारमधील गंगा नदी आणि नाशिकमधील गोदावरी नदीच्या संगमात पडले. हे कारण आहे या नद्यांच्या काठावर दर १२ वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. कुंभाचे ठिकाण ज्योतिष गणनेच्या आधारे ठरवले जाते. ग्रहगणनेच्या आधारे पुढील कुंभ नाशिक येथे होणार आहे.