Maha Shivratri Katha Vrat Importance: शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो । हे गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो ॥ प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते; परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात आहे. महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे. शंकर हा महायोगी, अतुल पराक्रमी असूनही त्यागी, विरागी असा आहे. तो स्मशानात राहतो. पार्वतीसारख्या लोकोत्तर विश्वसुंदरीबरोबर जगावेगळा संसार करतो. जीवनाच्या दोन्ही बाजूकडे सारख्याच दृष्टीने पाहावे आणि त्यात रस घेण्याची परंपरा अखंडित राहावी, अशा दूरदृष्टीने अशा देवांचे माहात्म्य आपल्या पूर्वजांनी परंपरेने जागृत ठेवले आहे. यंदा २०२६ मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी आहे? महत्त्व, मान्यता सविस्तर जाणून घेऊया...
महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष इ. फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल, ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्व आहे, हे स्पष्ट होते. भारतात शिवपूजन आसेतुहिमाचल सर्वत्र रूढ आहे. शिवोपासना सर्व राज्यांमध्ये केली जाते. अगदी प्राचीन काळी म्हणजे वैदिक काळापासून शिवाचे माहात्म्य वर्णिले गेले आहे. वेगवेगळ्या काळी शिवशंकराला भिन्न नावांनी संबोधिले असले तरी या देवतेचे स्वरूप आणि महत्त्व चिरंतन राहिलेले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवशंकर म्हणजे महादेव हे ग्रामदैवत आहे. त्याला त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरतात.
‘श्रीशिवलीलामृत’ ग्रंथात महाशिवरात्रीचे महात्म्य
‘श्रीशिवलीलामृत’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. शिवलीलामृतातील अकरावा अध्याय विशेष प्रभावी असल्याचा जनमनाचा अनुभव आहे. शैव मताच्या अनुयायी भाविकांमध्ये शिवलीलामृताला बरेच महत्त्व आहे. हा ग्रंथ परंपरागत श्रद्धाधिष्ठित आहे हे खरेच. ग्रंथाची भाषा सुबोध आहे. त्यात दिलेल्या कथा मनोरंजक आहेत आणि या कथा आपल्याकडे बऱ्याच काळापासून रूढ आहेत. महाशिवरात्रीचे माहात्म्य सांगताना शिवलीलामृताच्या दुसऱ्या अध्यायात सर्व प्रकारचे मोठमोठे पर्वणीकाळ शिवरात्रीवरून ओवाळून टाकावेत. या दिवशी त्रिकाल पूजा, मंत्र- स्तोत्रपठण तसेच शिवनामाचा जप केला असता तो अपार पुण्यकारक ठरतो. गंधर्व, ऋषिमुनी हे सर्व शिवरात्रीव्रत करतात, असा निर्वाळा दिला आहे. शंकर ही देवता सर्व प्रकारच्या लोकांना आकर्षित करणारी आहे. या देवतेकडे अधिकाधिक भक्तांचे लक्ष जावे, शंकराची उपासना सर्वत्र वाढावी, अशा सद्हेतूने हे महिमान सांगितले जाते.
महाशिवरात्रीचे प्रकार किती सांगितले गेले आहेत?
महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांतून आढळते. नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार आहेत. पैकी महाशिवरात्री ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. दररोजची रात्र ही नित्यशिवरात्र, शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्षशिवरात्र, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मासशिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योगशिवरात्र मानली जाते.
महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे?
माघ वद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून रहावे, चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प केला जातो. स्नान, शिवपूजन द्वारे व्रत पूर्ण करावे. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत. रात्रीच्या ४ प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते. तिला यामपूजा असे म्हटले जाते. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल, आंबा वगैरेंची पाने वाहिली जातात. विशिष्ट वर्षे व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन करता येते. या काळात उपवास, जागरण वगैरे गोष्टी नकळत घडल्या तरी व्यक्तीचा उद्धार होतो, अशी लोकांची श्रद्धा असून ती सूचित करणाऱ्या अनेक कथाही प्रचलित आहेत.
२०२६ मध्ये महाशिवरात्री कधी आहे?
यंदा रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री आहे. अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. परंतु, महाशिवरात्री व्रतात निशीथकालाला महत्त्व असून, या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते. रात्रीचे समान पंधरा भाग केल्यानंतर त्यांपैकी आठवा भाग तो निशीथकाळ होय. जेव्हा निशीथकाळी कृष्ण चतुर्दशी म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याची चौदावी तिथी असेल तिला शिवरात्री असे म्हणतात. माघ महिन्यात या शिवरात्रीस विशेष महत्त्व असल्याने तिला महाशिवरात्री असे म्हणतात. यंदा २०२६ मध्ये १५ फेब्रुवारीच्या उत्तररात्री १२ वाजून २८ मिनिटे ते ०१ वाजून १८ मिनिटे या कालावधीत निशीथकाल आहे.
महाशिवरात्रीच्या विविध कथा अन् मान्यता
महाशिवरात्रीला जलाभिषेक, रुद्राभिषेकाला अनन्य साधारण महत्त्व आहे. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी भक्तीभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. काही कथांनुसार, समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले. हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर काही कथांनुसार, या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. काही ठिकाणी या दिवसाला ‘जलरात्री’ असे संबोधले जाते. महाशिवरात्रीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते. शिवतत्त्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो, असेही म्हटले जाते.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥
Web Summary : Maha Shivratri 2026 falls on February 15th. The night holds immense significance for devotees of Lord Shiva. It's observed with fasting, prayers, and night-long vigils. The festival celebrates Shiva's divine power and union with Parvati, offering blessings and spiritual purification to those who observe it with devotion.
Web Summary : महा शिवरात्रि 2026 15 फरवरी को है। यह रात भगवान शिव के भक्तों के लिए बहुत महत्वपूर्ण है। इसे उपवास, प्रार्थना और रात भर के जागरण के साथ मनाया जाता है। यह त्योहार शिव की दिव्य शक्ति और पार्वती के साथ मिलन का प्रतीक है, जो भक्ति के साथ इसे मनाने वालों को आशीर्वाद और आध्यात्मिक शुद्धि प्रदान करता है।