चंपाषष्ठीला खंडोबाचे षडरात्रोत्सव संपते; त्याआधी करा या उत्सवाचा यथोचित कुळाचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 01:00 PM2022-11-28T13:00:49+5:302022-11-28T13:01:18+5:30

यंदा मंगळवार २९ नोव्हेंबर रोजी चंपाषष्ठी आहे. त्याआधी खंडोबाशी निगडित 'या' विधीला अतिशय महत्त्व आहे. 

Khandoba's six night festival ends on Champashashti; Before that, do the festival properly! | चंपाषष्ठीला खंडोबाचे षडरात्रोत्सव संपते; त्याआधी करा या उत्सवाचा यथोचित कुळाचार!

चंपाषष्ठीला खंडोबाचे षडरात्रोत्सव संपते; त्याआधी करा या उत्सवाचा यथोचित कुळाचार!

googlenewsNext

महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये खंडोबाचे षडरात्रोत्सव अर्थात खंडोबाचा सहा दिवसाचा उत्सव कुलधर्म कुलाचार म्हणून केला जातो. मार्गशीर्ष प्रतिपदेला हा उत्सव सुरू होऊन चंपाषष्ठीला तो संपतो. या निमित्ताने कोणता कुलाचार केला जातो ते जाणून घेऊ. 

पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूपच छळ केला. तेव्हा शंकरानी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्या दैत्यांशी मोठे युद्ध केले आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपक वनात मणी मल्ल दैत्याचा वध केला. तेव्हापासून ही षष्ठी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. मणिमल्ल दैत्याचा वध केला म्हणून शंकराला मल्लारी, मल्लारीमार्तंड, खंडोबा, खंडेराय असे नाव पडले. 

पूजेचा विधी : एका ताम्हनामध्ये किंवा ताटामध्ये श्रीफळ, सुपारी, विड्याची पाने, फळे आणि भंडारा ठेवतात. तेथे नजीकच एका कलशावर श्रीफळ ठेवून त्याची पूजा करतात. खंडोबाला आवाहन करतात. त्या कलशात खंडोबाचे तेज अवतरले असे समजून त्याची पूजा करतात. 

नंतर तुपाचे निरांजन लावून ते ताम्हनात ठेवतात व ते ताम्हण कलशाभोवती तीनदा ओवाळतात. मग कलशावरचे श्रीफळ उचलून कपाळाला लावतात. या वेळी सर्व जण 'येळकोट मल्हार- चांगभलं' असे म्हणत खंडोबाची करुणा भाकतात. खंडोबाला नैवेद्य दाखवून दुसरे दिवशी पूजेचे उद्यापन करतात. 

खंडोबाची अनेक नावे आणि अनेक रूपे आहेत. काही मुसलमान बांधव खंडोबाचे भक्त असतात. ते खंडोबाला मल्लुखान म्हणतात. कर्नाटक, आंध्र वगैरे भागात  मैलार- मैराळ म्हणजेच खंडोबा हे कुलदैवत आहे. मद्रासची उपनगरी मैलापुर हे मैलारचे मूळ गाव होय. 

जेजुरी, निमगाव, पाली पेम्बर, नळदुर्ग, शेंगुड, सातारे, मालेगाव (नांदेड), मैलापुर, मैलारसिंग, देवरगुड्डू, मणमैलार वगैरे खंडोबाची तीर्थक्षेत्रे आहेत. लग्न झालेली नवदाम्पत्ये जेजुरीला किंवा त्यांचे कुलदैवत खंडोबा ज्या गावी असेल त्या गावी जाऊन तळी आरती करतात. हा कुलाचार आहे. त्याला आहेर यात्रा म्हणतात. 

तर आपणही मणी मल्ल दैत्यांचा नाश करणाऱ्या शंकराच्या अवताराला अर्थात खंडोबाला चंपाषष्ठीच्या निमित्ताने स्मरण, पूजन करून भक्तिभावाने बेल भंडारा वाहूया. जय मल्हार!

Web Title: Khandoba's six night festival ends on Champashashti; Before that, do the festival properly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.