कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 10:47 IST2025-10-24T10:41:43+5:302025-10-24T10:47:19+5:30
Kartiki Ekadashi 2025 Date: यावर्षी कार्तिकी एकादशी दोन तारखेत विभागून आल्यामुळे व्रताचरणाबाबत भाविकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे; त्यासाठी ही सविस्तर माहिती.

कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
Prabodhini Ekadashi 2025 Date: हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. वर्षातून येणाऱ्या २४ एकादशींपैकी, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला 'कार्तिकी एकादशी' किंवा प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi 2025) असे म्हणतात. या एकादशीचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व सर्वाधिक आहे. याच दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि चातुर्मास(Chaturmas 2025) समाप्त होतो.
या शुभ दिनाचे व्रत (उपवास) कसे करावे, त्याचे महत्त्व काय आहे आणि पारणे (उपवास सोडणे) कधी करावे, याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. त्याआधी हे व्रत नेमके कधी करावे ते जाणून घेऊ.
दिनदर्शिकेवर पाहिले असता १ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी आहे आणि २ नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी आहे. त्यामुळे व्रताचरण कधी करावे याबाबत भाविकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. त्यासाठी स्मार्त आणि भागवत यातील फरक जाणून घेऊ.
स्मार्त एकादशी म्हणजे काय?
दशमी संपून एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही पण तो दिवस नव्या तिथीच्या नावे सुरू झाला असेल तर त्याला स्मार्त तसेच दर्श असा उल्लेख केला जातो. म्हणजे तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदय पाहिलेल्या दिवशीच करायचे यासंबंधी ती सूचना असते. म्हणून ती स्मार्त एकादशी! शैव पंथीय स्मार्त तिथी पालन करतात तर वैष्णव भागवत तिथी पालन करतात.
भागवत एकादशी :
जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते. म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असली तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाळली जाते आणि दिन दर्शिकेवर देखील सूर्योदय पाहिलेल्या तिथीवर भागवत धर्माचे ध्वजचिन्ह दिसून येते. भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी म्हणतात. वैष्णव उदय तिथी मानतात. स्मार्त वाले जिथून तिथी सुरू झाली ती तिथी मानतात आणि व्रत सुरु करतात. हा तो फरक.
स्मार्त म्हणजे जे लोक वेंदांवर, श्रुती स्मृती, पुराण यांना प्रमाण मानतात, ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे, ते स्मार्त एकादशी पाळतात. थोडक्यात ऋषी, मुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात. तर वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत, संसारी आहेत, जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात ते भागवत एकादशीचे व्रत करतात. म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी मात्र एकादशी व्रताचे पालन भागवत एकादशीला करावे असे शास्त्र सांगते.
त्यानुसार २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी तथा प्रबोधिनी(Prabodhini Ekadashi 2025 Date) एकादशीचे व्रताचरण केले पाहिजे असे शास्त्र सांगते. याच तारखेपासून तुलसी विवाहास आणि घरोघरी साखरपुडा, लग्न, मुंज यांसारख्या शुभ कार्यास सुरुवात होते. यंदा २ ते ५ नोव्हेंबर अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत(Tripuri Purnima 2025) तुलसी विवाह(Tulasi Vivah Date 2025) करता येईल.
कार्तिकी एकादशी व्रत करण्याची पद्धत : एकादशीचे व्रत करण्याचे नियम दशमी तिथीपासून (एक दिवस आधी) सुरू होतात आणि द्वादशी तिथीला (दुसऱ्या दिवशी) पारण केल्यानंतर पूर्ण होतात.
१. दशमी तिथीचे नियम (एक दिवस आधी) :
सात्विकता: दशमी तिथीच्या संध्याकाळपासूनच तामसिक भोजन (लसूण, कांदा, मांसाहार) वर्जित असते.
जेवण: दशमीला सूर्यास्तापूर्वी भोजन करावे. रात्री भोजन करू नये.
ब्रह्मचर्य: एकादशीच्या व्रताचे पालन करणाऱ्यांनी दशमी तिथीपासूनच ब्रह्मचर्याचे पालन करावे.
२. एकादशी तिथीचे नियम (व्रत दिनी) :
सकाळची तयारी: ब्रह्म मुहूर्तावर (सकाळच्या वेळी) उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
संकल्प: हातात पाणी आणि अक्षता घेऊन 'मी हे व्रत पूर्ण श्रद्धेने करत आहे, ते निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे' असा संकल्प करावा.
पूजा:
- घरात किंवा मंदिरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करावी.
- देवाला पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) आणि गंगाजलाने स्नान घालावे.
- देवाला चंदन, हळद, कुंकू, तुळशीची पाने अर्पण करावीत. तुळशीची पाने अर्पण करणे अनिवार्य मानले जाते.
- 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा.
- कार्तिकी एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी.
- संध्याकाळी पुन्हा देवाची पूजा करावी आणि तुपाचा दिवा लावावा. तुळशी विवाहाचा कार्यक्रम करावा.
उपवास (आहार नियम):
- या दिवशी पाणी पिऊन किंवा फलाहार करून उपवास केला जातो.
- अन्नधान्य (भात, गहू, डाळी) आणि मीठ (साधे मीठ) पूर्णपणे वर्जित असते.
- उपवासाच्या आहारात साबुदाणा, राजगिरा, शेंगदाणे, बटाटे, रताळे, फळे, दूध, दही आणि शेंदा मीठ (सेंधा नमक) वापरू शकता.
- दिवसभर भगवत चिंतन करावे.
३. द्वादशी तिथीला पारण (उपवास सोडणे)
- एकादशीचे व्रत द्वादशी तिथीला 'पारण' केल्यानंतरच पूर्ण मानले जाते.
- पारण वेळ: पारण नेहमी द्वादशी तिथी संपण्यापूर्वी आणि एकादशी पारण वेळेत (ज्योतिषांनी दिलेल्या वेळेत) करावे लागते.
- दान: पारण करण्यापूर्वी एखाद्या गरजूंना किंवा ब्राह्मणाला अन्न (धान्य) आणि दक्षिणा दान करावी.
- पारण भोजन: पारण नेहमी धान्याचे (गहू किंवा तांदूळ) एक कण खाऊन करावे. प्रथम तुलसीचे पान खाऊन नंतर साधे भोजन (भात किंवा पोळी, भाजी) करून उपवास सोडावा. हे व्रत पूर्ण करून द्वादशीला उपवास सोडावा, अन्यथा व्रताचे पुण्य मिळत नाही, असे शास्त्र सांगते.
या विधीनुसार कार्तिकी एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी तुमच्यावर राहते.