Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:56 IST2025-07-21T15:54:06+5:302025-07-21T15:56:22+5:30
Kamika Ekadashi 2025: मोक्ष हवा हे असे आपणा सर्वांना वाटते, पण तो का मिळत नाही, याचे कारण या चित्रात दडले आहे, कसे ते जाणून घ्या.

Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
सध्या चातुर्मास(Chaturmas 2025) सुरु आहे आणि त्यातच आज कामिका एकादशी(Kamika Ekadashi 2025). त्यानिमित्ताने आपण आज असे एक चित्र पाहणार आहोत, ज्यामुळे आपले जन्म मरणाचे गणित कायमचे सुटेल आणि श्रीहरी विष्णू यांच्या समक्ष जाण्याचा प्रवास सोपा होईल.
सदर चित्रात आपल्याला दिसते ती झाडाला लटकलेली व्यक्ती, ते झाड मुळापासून हलवणारा हत्ती, झाडाची फांदी पोखरणारे पांढरा-काळा उंदीर, वरच्या फांदीला लागलेले मधमाशांचे पोळे, माणसाच्या सभोवती घोंगावणाऱ्या मधमाशा, खाली असलेल्या सरोवरात लटकलेल्या माणसाकडे बघत फुत्कार टाकणारे साप आणि कोपऱ्यात मदतीचा हात पुढे करणारे भगवान विष्णू.
या चित्राचे नीट निरीक्षण केले तर आपल्याला एकूणच अडचणीत सापडलेला माणूस दिसेल. मात्र या चित्राचा आशय तसा नाही तर अध्यात्मिकदृष्ट्या भूत, भविष्य आणि वर्तमानाचा खुलासा करणारा आहे. कसा ते पाहू!
या चित्रात दिसणारा हत्ती हे आपला भूतकाळ आहे.
दंश करू पाहणारे साप आपले भविष्य आहे.
झाडाच्या फांद्या हे आपले वर्तमान आहे.
पांढरा आणि काळा उंदीर हे आपले दिवस-रात्र आहेत.
मधमाशांचं पोळं हे ही माया आणि भौतिक सुखं आहेत.
म्हणजेच भूतकाळ आपल्याला अनुभवातून शिक हे गदागदा हलवून सांगतोय. वर्तमानाच्या फांद्या आपल्याला आधार देत आहेत. तो आधार सोडला तर भविष्यरूपी साप आपल्याला दंश करायला बसले आहेत. अशा वेळी आपल्या मदतीला आलेले भगवान विष्णू यांचा मदतीचा हात धरण्यासाठी वर्तमानाची फांदी सोडून सगळा भार त्यांच्यावर टाकायचा, तर आपण त्याही मरणासन्न स्थितीत मधाच्या पोळ्यातून पडणारे मधाचे थेंब अर्थात मोह माया मिळवण्यासाठी काळ्या पांढऱ्या उंदरांप्रमाणे दिवस रात्र धडपडत आहोत. त्यामुळे विष्णूरुपी आलेले मोक्षाचे द्वार आपणहून बंद करत आहोत. किती सुंदर आहे ना या चित्राचे सार?
तर मग तुम्ही यातून काय बोध घेणार? विष्णूंवर भार टाकून मोकळे होणार की मधाच्या थेंबासाठी आयुष्यभर झुरणार आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून राहणार?