पुण्यस्मरण विशेष: नियमित उपासना, नामस्मरण, भजनाचे महत्त्व समाजात रुजवणाऱ्या कलावती आई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:12 IST2025-01-29T16:07:44+5:302025-01-29T16:12:18+5:30

Kalavati Aai Devi Punyatithi 2025: आई कलावती देवीचे खरे नाव काय? कोणी अनुग्रह दिला? जाणून घ्या, पुण्यस्मरण दिनानिमित्त अद्भूत चरित्राचा अगदी थोडक्यात परिचय...

kalavati aai devi punyatithi 2025 know about amazing charitra and timeless teachings of namasmaran and upasana | पुण्यस्मरण विशेष: नियमित उपासना, नामस्मरण, भजनाचे महत्त्व समाजात रुजवणाऱ्या कलावती आई!

पुण्यस्मरण विशेष: नियमित उपासना, नामस्मरण, भजनाचे महत्त्व समाजात रुजवणाऱ्या कलावती आई!

Kalavati Aai Devi Punyatithi 2025: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये संस्कार, उपासना, नामस्मरण, भजन-कीर्तन, कथा, सेवा यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. आता सुरू असणाऱ्या कलियुगात नामस्मरणाला अत्याधिक महत्त्व आहे. यापूर्वी जी युगे होऊन गेली, त्या-त्या वेळेच्या उपासना पद्धती वेगवेगळ्या होत्या. जशी युगे पुढे सरकत गेली, तशा उपासना पद्धतीत अमूलाग्र बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रात संत-महंतांची एक मोठी परंपरा आहे. सर्वच संतांनी समाजातील चुकीच्या गोष्टींना विरोध करत आपापल्या परिने नामस्मरण, उपासना, सन्मार्ग, भक्तिभाव याची रुजवण समाजात केल्याचे पाहायला मिळते. या परंपरेतील एक थोर व्यक्तिमत्व म्हणजे आई कलावती देवी. सन २०२५ मध्ये ३० जानेवारी रोजी परमपूज्य कलावती आई यांचे पुण्यस्मरण आहे. यानिमित्ताने आई कलावती देवी यांच्या चरित्राचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया...

कलावतीदेवी यांचा जन्म ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर धर्मपरायण अशा कल्याणपूरकर घराण्यात, गोकर्ण, महाबळेश्वर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाबूराव व आईचे नाव सीताबाई होते. बाबूराव हे वनौषधी तज्ज्ञ होते व त्यांची कारवार व गोकर्ण येथे औषधांची दुकाने होती. कल्याणपूरकर घराण्यात परमहंस शिवरामस्वामी हे बालसंन्यासी होऊन गेलेले होते. कलावती हे त्यांचे आध्यात्मिक साधक नाम आहे. ते त्यांचे गुरू सिद्धारूढ स्वामी यांनी ठेवले. लहानपणी आई-वडिलांनी आपल्या मुलीचे नाव ‘रक्मा’ ठेवले व लाडाने ‘बाळ’ असेच नाव रूढ होते. कारवार मधील मंजनाथ भट्ट या प्रसिद्ध ज्योतिषाने ही पत्रिका दुर्लभात दुर्लभ असून ही व्यक्ती बोलेल ते खरे होईल, लक्ष्मी व सरस्वती या दोघी आशीर्वाद देऊन हिच्या पाठीशी उभ्या राहतील असे भविष्य वर्तवविले होते.

वयाच्या १४ वर्षांपर्यंतचा काळ हरिसेवेत अन् ‘ॐ’ उच्चाराचा नाद

कलावती आईंचे वेगळेपण हे इतरांना त्यांच्या लहानपणापासूनच जाणवू लागले. वयाच्या पाचव्या वर्षापासून बाळ मराठी, हिंदी, कानडी, गुजराथी भाषेतील भजने म्हणत असे. देवपूजेची, लहानपणापासूनच आवड होती. म्हणून कीर्तन भजन करुन देवाचे गुणगान करत असे. त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणे, नदीकाठी वाळूची पिंड तयार करुन त्याचे पूजन करणे तिला आवडत असे. वयाच्या सातव्या वर्षी बाळला पूर्णानंद यतिराज भेटले आणि प्रसादरुपात कृष्ण दिला आणि तेव्हापासून बाळ हरीभजनात तल्लीन होत असे. झोपतानाही उशीजवळ कृष्णाची मूर्ती पाहिजे, उठताना प्रथम श्रीकृष्णाची मूर्ती दिसली पाहिजे, असा तिचा बालहट्ट असे. वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंतचा काळ हरीसेवेत, मनन अभ्यासात घालवला. एकदा दारावर आलेल्या बैराग्याकडून तिने ‘ॐ’चा नाद ऐकला व पुढे सतत ‘ओम्-ओम्’ असा उच्चार करण्याचा तिला नाद लागला. श्रीगुरू सिद्धारूढ स्वामी यांनी अनुग्रह देईपर्यंत तिचा हा ओंकार चालू राहिला.

आलीस! ये, मी तुझीच वाट पाहत होतो!

वयाच्या पंधराव्या वर्षी आई-वडिलांनी योग्य स्थळ पाहून लग्न लावले. सासरचे सर्व वातावरणही धर्मपरायण होते. त्यामुळे मोठी अनुकूलता लाभली. आनंदात संसार सुरू झाला. त्यानंतर दोन पुत्ररत्ने प्राप्त झाली. परंतु, पुढे पती एम. राजगोपाल यांचे अकाली निधन झाले. पुढे वडील व सासऱ्यांचेही निधन झाले. त्यामुळे एकदम विरक्ती आली अन् संसार सुखाचा त्याग केला. एका साधूने त्यांना हुबळीला सिद्धारूढ स्वामींकडे जा, ते तुझी वाट पाहत आहेत, असा उपदेश केला. गोकर्णहून चालत हुबळी येथे गेल्या. सिद्धारूढ स्वामींच्या मठात प्रवेश करताच, त्यांना पाहताच स्वामी म्हणाले, आलीस! ये, मी तुझीच वाट पाहत होतो!

कलावती देवी नाव कसे पडले? कोणी अनुग्रह दिला?

सन १९२८ साली दसऱ्याच्या मुहूर्तावर सिद्धारूढस्वामींनी अनुग्रह दिला. तिचे नाव ‘कलावतीदेवी’ असे ठेवले व त्यांना प्रवचन करण्यास सांगितले. कलावतीचा साधनाकाळ पूर्ण होताच स्वामींनी कलावतीदेवींच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्या आठ तास समाधिवस्थेतच राहिल्या. यानंतर त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या. गुरु आज्ञेने व मदतीने बेळगावजवळ ‘अनगोळ’ येथे परमार्थ निकेतन हा त्यांचा आश्रम तयार झाला. तेथून त्यांचे कार्य सुरू झाले. गावोगावी उपासना केंद्रांची सुरुवात झाली. त्यांचा भक्तवर्ग वाढत गेला. परमार्थात आईंनी नियमित उपासनेला महत्त्व दिले आहे. 

नामस्मरण करण्यासह कलियुगात भजन मार्ग सोपा

आपला आपला जठराग्नी विशिष्ट वेळेला जेवणाची वाट बघतो. निद्रादेवी जशी विशिष्ट वेळेला येते त्याप्रमाणे श्री हरी देखील आपली वाट बघत असतो म्हणून नियमित आणि विशिष्ट वेळेच्या उपासनेचे आणि सामुहिक उपासनेचे महत्त्व विशेष असते हे पटवून दिले. कलियुगात सुलभ व श्रेष्ठ आहे म्हणून नामस्मरणाचा मार्ग दाखविला. नाम घेतांना परमेश्वराचे स्मरण केल्यास ते त्याच्यापर्यंत पोहचते असे सांगितले आहे. नामस्मरण करण्यासह कलियुगात भजन मार्ग हा सोपा आहे, भजनाच्या माध्यमातून आपण लवकर तल्लीन होतो आणि ईश्वराशी समरुप होणे सोपे जाते म्हणून त्यांनी सातही वारांची आणि विविध उत्सवांची भजने तयार केली. यातील काही भजने सर्व संतांची असून काही रचना आईंनी स्वतः केल्या आहेत. सर्व भजनांना त्यांनी स्वतः चाली दिल्या आहेत. 

बेळगाव येथे समाधी घेऊन अवतार कार्य संपविले

मुलांसाठी बालोपासना, प्रवासात देखील ईश्वराचे स्मरण व्हावे म्हणून नित्योपासना तयार केली. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून गोपाळकाला, सत्वशीलराजे, संतमेळा, सुबोधभान, त्रिवेणीसंगम अशी गोष्टीरुप पुस्तके लिहून प्रत्येक गोष्टीतून एक संस्कार, उपदेश दिला. मनाला बोध करणारा, विषयासक्त मनाला अंतिम सत्य काय आहे, मनाने कसे वागावे हे सांगण्यासाठी आईंनी 'बोधामृत' हा ग्रंथ लिहून जनमुढांना खरे अमृत दिले आहे. श्रीकृष्णप्रताप, कथासुमनहार ही पुस्तके लिहली, सर्व संतांच्या आणि आपले गुरू श्री सिध्दारुढ स्वामी यांचे चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे उद्देश लोकांना समजण्यासाठी 'सिध्दारुढवैभव' हा ग्रंथ लिहिला. आईंनी जी भजने लिहली, हरिस्तुती, नमस्काराष्टक, गुरुस्तुति, उपकाराष्टक लिहिली, त्याच्या मुद्रिका लिहिताना कला, कलावंत, कलिमलदहन, रुक्मिणीरमणा अशा दिल्या आहेत. पुढे ८ फेब्रुवारी १९७८ रोजी बेळगाव येथे समाधी घेतली व आपले अवतार कार्य संपविले.
 

Web Title: kalavati aai devi punyatithi 2025 know about amazing charitra and timeless teachings of namasmaran and upasana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.