Jivati Puja 2025 : जिवतीचा कागद अमावस्येला लावावा की श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी? वाचा व्रतविधी आणि माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:55 IST2025-07-24T11:54:28+5:302025-07-24T11:55:23+5:30

Jivati Puja 2025: यंदा श्रावणाची सुरुवात शुक्रवारी जिवती पूजनाने होत आहे आणि पाच श्रावणी शुक्रवार पूजेसाठी मिळणार आहे, त्यानिमित्ताने हे व्रत कसे करावे ते वाचा. 

Jivati Puja 2025: Should Jivati's paper be applied on Amavasya or on the first Friday of Shravan? Read the fasting rituals and information! | Jivati Puja 2025 : जिवतीचा कागद अमावस्येला लावावा की श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी? वाचा व्रतविधी आणि माहिती!

Jivati Puja 2025 : जिवतीचा कागद अमावस्येला लावावा की श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी? वाचा व्रतविधी आणि माहिती!

२५ जुलै रोजी श्रावणमास(Shravan 2025) सुरु होत आहे आणि यंदा शुक्रवारी(Shravan Shukravar 2025) जिवती पूजनाने ही मंगलमय सुरुवात होत आहे. तसेच जिवती पूजनासाठी(Jivati Puja 2025) पाच शुक्रवार मिळणार आहेत. हे व्रत का केले जाते, याने काय लाभ मिळतो, जिवतीच्या कागदावरील चित्रांचा अर्थ काय, तिची कशी केली जाते पूजा, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. 

Shravan 2025: श्रावणातले सण, पूजाविधी, कुलधर्म कुळाचार आणि त्याचे फळ; सविस्तर माहिती वाचा!

पूर्वी आषाढ संपता संपताच देवघराच्या भिंतीवर जिवतीचा कागद चिकटवला जात असे. घरातली आत्या, मावशी, आई, आजी कापसाची वस्त्रे तयार करून त्याला हळद कुंकवाची बोटं लावून त्या माळा आणि गोडधोडाचा नैवेद्य जिवतीला दाखवत असे. श्रावण शुक्रवारी सुवासिनीला हळद कुंकू आणि ओटी भरणे तसेच जिवतीची आरती म्हणणे हे व्रत पूर्ण श्रावण मास पाळले जात असत व श्रावण अमावस्येला जिवतीचा कागद निर्माल्यात सोडून दिला जात असे. धार्मिक वातावरण असलेल्या प्रत्येक घरात हे चित्र दिसत असे. 

मात्र अलीकडे जिवतीचे पूजन का करतात याची पुरेशी माहिती नसल्याने ती प्रथा टाळली जाते. मात्र, दहा रुपयांचा जिवतीचा कागद, कापसाची वस्त्र, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य याहून अधिक जिवतीला काहीही लागत नाही. मात्र एवढ्या अल्प सेवेवर समाधान मानून ती भरभरून आशीर्वाद देऊन जाते, म्हणून तिचे व्रत! जिवती पूजनाबद्दल सविस्तर माहिती देत आहेत, हिंदू संस्कृती अभ्यासक हृषीकेश श्रीकांत वैद्य!

आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगतेच प्रतीक आहे. ज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन!

दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती! जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?

जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध - बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण मिमांसा...

प्रथम भगवान नरसिंहचं का? तर भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट  झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात. म्हणजेच...घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह, बाळाचा बचाव करतात. जसे की, उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी... 

त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण! -  यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन  करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, तसेच महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळत बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो. म्हणजेच...कालियामर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून रक्षण करतो. जसे की, खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान. 

नंतर येतात त्या जरा व जिवंतिका - जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट  करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो. त्याचप्रमाणे जरादेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी ही जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवत असल्याच्या रूपात दाखवतात. 

प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती - बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती - हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ - हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध - बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं. 

एकूणच क्रम लक्षात घेतला, तर प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता, आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम! एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जिवती पुजन! 

तुम्हीदेखील जिवतीचे पूजन करा,गंध-पुष्प-धूप-दीप- दुधसाखरेचा नैवेद्य दाखवा. घरातील मुला बाळांना नमस्कार करायला सांगा त्यांना दुधसाखरेचे तीर्थ द्या व श्रावण संपल्यावर याचे विसर्जन करा. श्रावण अमावास्येला हा कागद उपडा करून ठेवायची व दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे, श्रावणा नंतर मुलांना दिसता कामा नये!

Web Title: Jivati Puja 2025: Should Jivati's paper be applied on Amavasya or on the first Friday of Shravan? Read the fasting rituals and information!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.