Janmashtami 2022: गोकुळाष्टमीनिमित्त करा काळ्या वाटण्याची आमटी आणि आंबोळीचा विशेष बेत; वाचा खास टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 14:08 IST2022-08-18T14:07:34+5:302022-08-18T14:08:19+5:30
Janmashtami 2022: उत्सवाचा काळ म्हणजे खाद्यपदार्थांची चंगळ. यात पारंपरिक पदार्थ ठरतात जिव्हाळ्याचा विषय. आज तुम्हीसुद्धा हा बेत करून बघा!

Janmashtami 2022: गोकुळाष्टमीनिमित्त करा काळ्या वाटण्याची आमटी आणि आंबोळीचा विशेष बेत; वाचा खास टिप्स!
गोकुळाष्टमीला तसेच गणेश चतुर्थीला अनेक` मालवणी घरांमध्ये काळ्या वाटाण्याची आमटी आणि आंबोळी करण्याचा प्रघात आहे. साधा सोपा तरी चविष्ट असणारा हा मेनू श्रीकृष्णालासुद्धा छप्पन भोग मिठाईवर उतारा ठरू शकेल. या आमटीला सांबार तसेच उसळ, कालवणही म्हणतात. हे सांबार झणझणीत आणि बेताने तिखट अशा दोन्ही प्रकारे करता येते. त्याच्या बरोबर पांढऱ्या शुभ्र आंबोळ्या म्हणजे स्वर्गसुखच! चला तर ही पाककृती जाणून घेऊ. त्यासाठी चकली. कॉम या पाककला विशेष संकेतस्थळाच्या वैदेही भावे यांनी दिल्या आहेत विशेष टिप्स!
काळ्या वाटण्याचे सांबार/ आमटी
साहित्य:
एक कप काळे वाटाणे
कांदा-नारळ पेस्टसाठी: १/४ कप खवलेला ओला नारळ, १/२ कप कांदा, उभा चिरून, १ टेस्पून तेल
फोडणीसाठी
२ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, ४ कढीपत्ता पाने
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
३ आमसुलं
१ टिस्पून गूळ
१ टेस्पून काळा मसाला
चवीपुरते मिठ
कृती:
१) काळे वाटाणे ८ ते १० तास भिजवावेत. नंतर पाणी काढून टाकावे आणि मोड येण्यासाठी सुती कापडात गच्चं बांधून ठेवावेत (कमीतकमी १० ते १२ तास).
२) पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करावे. कांदा नीट परतून घ्यावा. कांदा व्यवस्थित शिजला पाहिजे, कच्चा राहू देऊ नये. नंतर नारळ घालून परतून घ्यावे. (टीप) हे मिश्रण थोडे गार झाले कि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी.
३) लहान कूकरमध्ये २ टेस्पून तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात भिजवून मोड आलेले वाटाणे घालून एक मिनीटभर परतावे. नंतर त्यात धणेजिरेपूड घालून परतावे. गरजेपुरते पाणी घालावे (साधारण १ ते दिड कप). चवीपुरते मिठ, काळा मसाला आणि आमसुलं घालावीत. मिक्स करून कूकर बंद करावा आणि ५ ते ७ शिट्टया किंवा वाटाणे शिजेपर्यंत शिट्ट्या कराव्यात.
४) कूकर थंड झाला कि उघडावा त्यात कांदा-नारळ पेस्ट घालून उकळी काढावी. आता गुळ घालावा. गरजेनुसार पाणी वाढवावे. चव पाहून तिखट आणि मिठ अड्जस्ट करावे.
हि वाटाण्याची आमटी गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करावी.
टीप:
१) जर सुके खोबरे वापरायचा असेल तर कांदा परतायच्या आधी सुका नारळ परतावा नंतर कांदा घालावा.
२) काही जणांना कडधान्याची आमटी फोडणीला टाकून प्रेशर कूक करायला आवडत नाही. अशावेळी, आधी प्रेशरकूकरमध्ये फक्त वाटाणे मिठ घालून शिजवून घ्यावेत. आणि नेहमीच्या फोडणीसारखे, कढईत फोडणीस टाकावेत.
३) ताजा खोवलेला नारळ वापरत असाल तर आवडीनुसार जास्त घातला तरी चालेल.
४) सुके खोबरे तेलात चांगले भाजून घेतल्याने त्याचा खमंगपणा या आमटीला छान लागतो. मी ओला नारळ व सुके खोबरे वापरून दोन्ही पद्धतीने आमटी बनवली. ओल्या नारळापेक्षा सुके खोबरे या आमटीत जास्त चांगले लागते, फक्त खोबरे तेलात छान खमंग भाजले गेले पाहिले.