इंदोरचे पितरेश्वर हनुमान मंदिर; ७१ फूट उंच मूर्ती आणि पितृ पर्वतावर १ लाख झाडांची लागवड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:55 IST2025-03-21T11:54:12+5:302025-03-21T11:55:09+5:30
आज जागतिक वन दिवस; त्यानिमित्ताने इंदोरच्या पितृ पर्वतावर एक लाख झाडांच्या परिसरात वसलेल्या १०७ टन वजनाच्या हनुमान मंदिराबद्दल जाणून घेऊया.

इंदोरचे पितरेश्वर हनुमान मंदिर; ७१ फूट उंच मूर्ती आणि पितृ पर्वतावर १ लाख झाडांची लागवड!
>> ज्योत्स्ना गाडगीळ पंचमुखी
'स्वच्छ भारत अभियान' सुरु झाल्यापासून इंदोर हे शहर आजतागायत सलग ७ वेळा भारतात प्रथम क्रमांकावर आले आहे. तेथील शहरंच नाही तर ग्रामीण भाग, गल्ली, बोळ, बाजारपेठ, ऐतिहासिक वास्तू आणि तीर्थस्थान याबाबतीत कमालीची स्वच्छता बघायला मिळते. त्यामुळेच की काय तिथले स्ट्रीट फूड खातानाही मनात किंतु परंतु येत नाही. हे केवळ शासनाचे यश नाही तर नागरिकांच्या प्रयत्नातून साकार झालेले स्वप्न आहे. आणि तसे होण्यामागे पूर्वसंस्कार आहेत पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांचे! सुंदर नगररचना, रोजगार, चोख न्यायव्यवस्था, सुसज्ज बाजारपेठा आणि स्वच्छता यावर अहिल्याबाईंचा कटाक्ष होता. त्यांनी मध्य प्रदेशातच नाही तर आसेतुहिमाचल अनेक तीर्थक्षेत्रांचा, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अन्नछत्र उभारले, शिष्यवृत्ती सुरू केल्या. तो नेम आजवर सुरु आहे. त्याचाच पडसाद म्हणजे इंदोरच्या पितृ पर्वतावर (Pitru Parvat, Indore) वसलेले हे सुंदर हनुमान मंदिर(Pitareshwar Hanuman Mandir, Indore)!
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे शहराच्या जवळच असूनही या परिसरात कमालीची शांतता आहे. मोकळे वातावरण, स्वच्छ परिसर आणि जवळपास १ लाखाहून अधिक वृक्षांची लागवड, त्यामुळे या परिसरात फेरफटका मारतानाही तना-मनाला तजेला मिळतो. हा पर्वत पितृ पर्वत म्हणून ओळखला जातो, कारण मंदिर निर्मितीच्या वेळेस त्या परिसरात आपल्या पितरांच्या स्मरणार्थ वृक्षांची लागवड करण्याचे जनतेला आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि लोकसहभागातून एक लाखाहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. आजही अनेक पर्यावरण स्नेही मिळून या परिसराचा सांभाळ करत आहेत. तसेच शासनाचाही त्याला हातभार आहे.
आता हनुमान मंदिराबद्दल जाणून घेऊ. पितरेश्वर हनुमान मंदिर (Pitareshwar Hanuman Mandir, Indore) असे नामकरण होण्यामागे त्याचा पूर्वइतिहास म्हणजे तिथे एक प्राचीन शिवमंदिर आहेते म्हणजे सिद्ध भैरव महादेवाचे! त्याचा जीर्णोद्धार केल्यावर या मंदिराची रचना करण्यात आली. या प्रसन्न वास्तूमध्ये हनुमानाच्या दोन मूर्ती बघायला मिळतात. एक पूजेसाठी आणि दुसरी दर्शनासाठी! अंजनी मातेने कवेत घेतलेल्या हनुमंताची मूर्ती पूजेत ठेवली आहे. (असे म्हणतात, की हनुमंत रात्री आपल्या आईच्या कुशीत येऊन विश्रांती घेतात.) तिथेच द्रोणागिरी हातात घेतलेल्या हनुमंताचेही दर्शन घडते. तर दुसरे हनुमंताचे विशाल रूप आहे. १०८ टन वजनाची मूर्ती ७१ फूट उंच आणि ५४ फूट रुंद आहे. बाजूला भली मोठी गदा आणि हनुमंताचे चिंतन स्वरूप बघायला मिळते. रामभजनात रंगलेली हनुमंताची ही जगातील सर्वात मोठी मूर्ती आहे. ही मूर्ती अष्टधातूची बनवली आहे. ती बनवण्यासाठी १२५ कारागीर ७ वर्षं मेहनत घेत होते.
असे म्हणतात, की या मंदिरात बोललेला नवस पूर्ण होतो. त्यामुळेही तिथे भक्तांची रीघ पाहायला मिळत असावी.
समर्थ रामदास स्वामींनी हनुमान स्तोत्रात वर्णन केल्याप्रमाणे 'वाढता वाढता वाढे, भेदिले शून्य मंडळा' असे विशाल स्वरूप बघायचे असेल, तर इंदोरला गेल्यावर पितृपर्वतावर विराजमान झालेल्या पितरेश्वर हनुमान मंदिराचे दर्शन घ्यायलाच हवे.