मुलांसाठी दिवाळीची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर पुण्याजवळील शिवसृष्टीची सैर करायलाच हवी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 10:51 AM2023-11-13T10:51:43+5:302023-11-13T10:53:23+5:30

पुण्याजवळची शिवसृष्टी पाहणे हा शिवकाळाचा प्रत्यक्ष अनुभव अनुभव घेण्यासारखेच आहे; सविस्तर माहिती जाणून घ्या. 

If you want to make the Diwali holiday unforgettable for children, you must visit the Shiv Srishti near Pune! | मुलांसाठी दिवाळीची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर पुण्याजवळील शिवसृष्टीची सैर करायलाच हवी!

मुलांसाठी दिवाळीची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर पुण्याजवळील शिवसृष्टीची सैर करायलाच हवी!

>> कौस्तुभ कस्तुरे 

शिवचरित्र हा मराठी माणसाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदू. महाराजांची आजवर अनेक चरित्र लिहिली गेली, अन त्याची सुरुवात महाराजांच्या निर्वाणानंतर अगदी पंधरा वर्षात लगेच झाली. कृष्णाजी अनंत सभासद लिखित महाराजांची बखर हे पहिलं संपूर्ण शिवचरित्रं. मी संपूर्ण अशासाठी म्हणतोय, की महाराजांच्या आयुष्यातच कवींद्र परमानंदांनी जे शिवचरित्र लिहायला घेतलेलं ते दुर्दैवाने पूर्णत्वास गेलं नाही. पण अगदी तेव्हापासून ते अगदी आत्ताआत्तापर्यंत अनेक लेखकांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी महाराजांची चरित्र लिहिली. या सगळ्यात एक नाव अग्रणी आहे ते म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं. बाबासाहेबांचं 'राजा शिवछत्रपति' महाराष्ट्राने अक्षरशः मस्तकी लावलं. बाबासाहेबांच्या आधीही अनेकांनी शिवचरित्रं लिहिली होती, पण आचार्य अत्रे म्हणाले तसं बाबासाहेबांचं हे शिवचरित्र 'महाराष्ट्ररसात' लिहिलेलं असल्याने साऱ्यांनाच भावलं. 

बाबासाहेबांना सरस्वती प्रसन्न होती. केवळ लेखणीचा नव्हे, तर आपल्या वाणीचा आणि कलात्मक दृष्टीचा उपयोग करून शिवचरित्र निरनिराळ्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं हे बाबासाहेबांच्या आयुष्याचं ध्येय होतं. केवळ राजा शिवछत्रपती लिहून ते थांबले नाहीत, तर खेडोपाडी जाऊन त्यांनी शिवचरित्रावर व्याख्यानं दिली, शिवचरित्र कथनाचे कार्यक्रम केले, अन याहूनही प्रचंड काम म्हणजे महाराजांच्या आयुष्यावर आधारित 'जाणता राजा' हे आशिया खंडातील सर्वात भव्य असं महानाट्य निर्माण केलं. या नाटकाची लेखन-दिग्दर्शनाची धुरा बाबासाहेबांनी एकहाती लीलया पेलली. त्या काळात, जिथे रंगभूमीवर नवे प्रयोग करायला कलाकार-निर्माते सहसा धजावत नसत अशा काळात बाबासाहेबांनी हलता, अन प्रचंड रंगमंच उभारून, दीडशे कलाकारांच्या अन हत्ती-घोड्यांच्या ताफ्यासह हे महानाट्य अजरामर करून दाखवलं. बाबासाहेब काळाच्या पुढे विचार करत याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण होतं. 

या त्यांच्या कालातीत विचारांनी आणखी एक गोष्ट फार आधीच मनाशी पक्की केली होती, ती म्हणजे एक कायमस्वरूपी शिवसृष्टी उभारण्याची. शिवरायांच्या तीनशेव्या राज्याभिषेकप्रसंगी दादरच्या शिवाजी पार्कवर एक तात्पुरती शिवसृष्टी उभारण्यात आली होती. या शिवसृष्टीला तेव्हाही प्रचंड प्रतिसाद लाभला होता, अन यातूनच बाबासाहेबांना ही कल्पना सुचली. अर्थात, ही कल्पना, त्यातही नवनवीन काय करता येईल या विचारांत बाबासाहेब कायमच बुडालेले असत. त्यांच्या व्याख्यानांमधून आणि इतर व्यस्त वेळापत्रकांतून उसंत मिळाली की ठिकठिकाणी जाऊन निरनिराळ्या नाविन्यपूर्ण कामांची ते पाहणी करत. दुर्दैव असं, की ही शिवसृष्टी पूर्ण झालेली मात्र त्यांना त्यांच्या आयुष्यात पाहता आलं नाही.

पण बाबासाहेबांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचं ठरलं, 'महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान'ने या कामाला गती दिली, आणि या वर्षीच, शिवछत्रपती महाराजांच्या आंग्ल जन्मदिनांकाचं निमित्त साधून शिवसृष्टीचा पहिला टप्पा लोकांसाठी खुला करण्यात आला. संपूर्ण शिवसृष्टी एका टप्प्यात पूर्ण होणं शक्यच नसल्याने विविध टप्प्यात ती लोकांसाठी खुली करण्याचं ठरलं. यात जो पहिला टप्पा झाला आहे तो मात्र बाबासाहेबांना जसा अपेक्षित होता तसाच झाला आहे यात काही वाद नाही.  

आंबेगावच्या एकवीस एकर जागेवर विस्तारलेली ही शिवसृष्टी पाहण्यासाठी आपण मुख्य इमारतीत प्रवेश करतो त्याला 'सरकारवाडा' अशी संज्ञा आहे. पुण्याच्या विश्रामबाग वाड्याची अक्षरशः प्रतिकृती वाटावी असा हा भव्य वाडा पाहताच आपण स्तिमित होतो. या वाड्याच्या दिंडी दरवाजातून आपण प्रवेश करतो ते थेट शिवकाळातच. सुंदर कलाकुसरीचं छत, भक्कम पथ्थरात घडवलेली ही इमारत आपल्याला आपण एकविसाव्या शतकात आहोत याची जाणीवही होऊ देत नाही. पण थांबा, आपण जरी सतराव्या शतकात प्रवेश करत असलो तरीही ते एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेच हे विसरून चालत नाही. याची प्रचिती पुढे आपल्याला पावला पावलावर येते.

शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यात अनेक दालनं आहेत. पैकी सगळ्यात सुरुवातीचं आणि मुख्य दालन आहे ते म्हणजे किल्ल्यांचं. महाराष्ट्रातील आठ प्रमुख किल्ले इथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर जसेच्या तसे उभारण्यात आले आहेत. स्केल मॉडेल्स स्पष्ट सांगायचं तर. या किल्ल्यांवर पूर्वी असलेल्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. या प्रत्येक मुख्य इमारतींची माहिती आपल्याला दृकश्राव्य माध्यमातून समजते. इतकंच नव्हे, तर अनेक ऐतिहासिक प्रसंग, तोफांचे भडीमार, सैन्याच्या हालचाली वगैरेही याच मॉडेल्सवर आपण पाहू शकतो. आहे की नाही गंमत? 

दुसरं दालन आहे ते म्हणजे शस्त्रांचं. शिवकाळातील अनेक अस्सल शस्त्रं आपल्याला इथे पाहता येतात. या शास्त्रांची माहितीही घेता येते. सगळयात महत्वाचं म्हणजे लंडनमध्ये असलेल्या महाराजांच्या 'जगदंबा' या तलवारीची प्रतिकृती आपल्याला इथे जशीच्या तशी पाहायला मिळते. तिसरं दालन आहे ते म्हणजे राज्याभिषेकाचं. महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगात हेन्री ऑक्सिन्डन इथे आला होता. त्याने जे काही लिहून ठेवलं त्याच्या रोजनिशीची मूळ पानं आणि माहिती आपल्याला इथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेता येते. शिवाय महाराजांची राजचिन्ह, रायगडच्या सिंहासनचौथऱ्यावरील इमारतीचं स्केल मॉडेल वगैरेही गोष्टी अत्यंत आकर्षक आहेत. तिसरं दालन आहे ते म्हणजे महाराजांच्या साऱ्या शत्रूंच्या लघुचित्रांचं. यातली बहुतांशी लघुचित्र समकालीन आहेत. महाराजांना त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या शत्रूंशी लढावं लागलं ते सारे आपल्याला इथे पाहता येतात. इतकंच नव्हे, त्या शत्रूंच्या घराण्यातील इतरही व्यक्ती आपल्याला दिसतात. 

या सगळ्यातून आपण बाहेर पडलो की प्रवेशतो ते शेवटच्या आणि चौथ्या दालनात. हे दालन पुन्हा तीन लहान दालनांत विभागलं आहे. एक उप-दालन आहे रायगडच्या हवाई सफरीचं. आपण स्वतः जणू काही हेलिकॉप्टरमधून रायगड पाहत आहोत असा भास व्हावा अशी इथली यंत्रणा आहे. रायगड, जो आपल्यापैकी बहुतेकांनी वेगळ्या दृष्टिकोनातून कधीही पाहिला, असा रायगड आपल्याला इथे नव्याने उमजतो. दुसरं उप-दालन आहे ते म्हणजे शिवरायांच्या आग्रा प्रसंगाचं. इथे आग्र्यातील या सगळ्या घटनांचा साक्षीदार परकालदास हा आपल्याला ही सारी घटना समजावून सांगतो. इथे आपल्याला पडद्यावर साऱ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात त्या वेगळ्याच. तिसरं अन शेवटचं जे उप-दालन आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. इथे साक्षात शिवछत्रपती महाराज आपल्या समोर येऊन आपल्याशी संवाद साधतात. होय, खरंय हे. पडद्यावर नव्हे! प्रत्यक्ष! समोर महाराज असतात, ते तुम्हाला उपदेश करत असतात. त्यांच्या चरित्रातून नेमकं काय घ्यायचं आणि आयुष्यात नेमकं काय करायचं याबद्दल मार्गदर्शन करत असतात. हे कल्पनातीत आहे मला माहितीय, पण असं होतं आहे, झालं आहे एवढं नक्की. बरं, मी हे सांगतोय तो शिवसृष्टीचा केवळ एकच टप्पा आहे. पुढचे टप्पे हळूहळू सर्वांसाठी खुले होतीलच. पण तोपर्यंत, आपण, विशेषतः आपल्या पाल्यांना घेऊन शिवसृष्टीची ही अद्भुत सफर करायलाच हवी. महाराजांचं चरित्र वाचणं आणि ते प्रत्यक्ष अनुभवणं यातला फरक आपल्याला ही शिवसृष्टी नक्कीच जाणवू देईल असा विश्वास आहे.    

इथे आवर्जून नमूद करावंसं वाटतं ते म्हणजे गार्डियन मीडिया अँड एंटरटेनमेंटच्या श्री, संजय दाबके आणि त्यांच्या टीमने अविरत कष्ट आणि मेहनत घेऊन हे अफाट काम आपल्यासमोर उभं केलं आहे. आपण, किमान महाराष्ट्रात ज्या गोष्टींची कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. तंत्रज्ञानाचा वापर इतिहास सांगण्यासाठी असाही होऊ शकतो ही गोष्ट आपल्याला नव्याने उमगते. मी वर म्हणालो की हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं तसंच झालं, त्याचं कारण इथे आहे. इथल्या लहानसहान गोष्टी करण्यापूर्वी दाबके सरांच्या बाबासाहेबांशी असंख्य वेळा चर्चा झाल्या आहेत. एखाद्या गोष्टीतले बारकावे कसे असावेत यासंबंधी बाबासाहेबांनी मार्गदर्शन केलं आहे. इतकंच नव्हे, अनेक प्रसंगात नवनवीन काय करता येईल यासाठी बाबासाहेब, दाबके सर अन टीम देशी-परदेशी जाऊन काही सापडतंय का, अन आपल्याला ते कसं आत्मसात करता येईल याचाही शोध घेऊन आलेली आहे. म्हणूनच, बाबासाहेब शरीराने इथे नसले तरी मनाने ते समाधानी असतील असं मला मनापासून वाटतं. शिवसृष्टीत आई जगदंबेचं एक भलं मोठं चित्र आहे. कधीकधी वाटतं, त्या चित्रासमोर उभं राहून ते अजूनही म्हणत असतील, "तृप्त मी शिवशक्तीच्या गानात झालो शारदे! हे अंबिके, हे चंडिके, हे शारदे वरदान दे.."
काय लिहू अजून? नक्की चांगला दोन-तीन तास वेळ काढून शिवसृष्टीला किमान एकदा भेट द्याच. 

कसं जाल? :  पुण्यातून आंबेगाव इथे जाण्यासाठी महापालिकेच्या बसेस स्टेशन/स्वारगेटहुन उपलब्ध आहेतच. खाजगी वाहनाने जात असल्यास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर, नवले पुलापासून डावीकडे वळल्यास पाच मिनिटांच्या अंतरावर शिवसृष्टी आहे. 

वेळ:
सोमवार ते शुक्रवार: सकाळी १० ते संध्याकाळी ५
शनिवार - रविवार: सकाळी १० ते संध्याकाळी ६
प्रवेशमूल्य:
प्रौढांसाठी: ₹२५०
शालेय विद्यार्थ्यांसाठी: ₹८०
१० जणांच्या समूहासाठी: प्रत्येकी ₹२००

अधिक माहितीसाठी संपर्क: 7820923737
Email: shivsrushti.media@gmail.com
Website: shivsrushtipune.com

Web Title: If you want to make the Diwali holiday unforgettable for children, you must visit the Shiv Srishti near Pune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.