बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार नावाच्या उमेदवाराला किती मतं पडली?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 09:25 PM2024-06-06T21:25:49+5:302024-06-06T21:27:48+5:30

बारामतीचा बालेकिल्ला राखण्यात सुप्रिया सुळे यांना यश मिळालं असून त्यांचा तब्बल १ लाख ५८ हजार मतांनी विजय झाला आहे.

How many votes did the candidate named Sharad Pawar who contested the election from Baramati get | बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार नावाच्या उमेदवाराला किती मतं पडली?

बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार नावाच्या उमेदवाराला किती मतं पडली?

Baramati Election Result ( Marathi News ) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाची चांगलीच चर्चा झाली. या मतदारसंघात तीन टर्मपासून खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. बारामती आणि आसपासच्या तालुक्यांवर वर्चस्व असणाऱ्या अजित पवार यांच्या या निर्णयामुळे बारामतीत राजकीय उलथापालथ होणार का, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र बारामतीचा बालेकिल्ला राखण्यात सुप्रिया सुळे यांना यश मिळालं असून त्यांचा तब्बल १ लाख ५८ हजार मतांनी विजय झाला आहे. बारामतीच्या या लढतीत आणखी एका उमेदवाराची चांगलीच चर्चा झाली होती आणि त्या उमेदवाराचं नाव होतं शरद राम पवार.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या शरद राम पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. "रिक्षावाल्यांच्या समस्या, वाहनचालकांना मिळणारे कमी दर, पुण्यातील वाहतूक कोंडी यासह इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. माझं मूळ गाव धोंडराई, बीड जिल्ह्यात आहे. परंतु गेल्या १५ वर्षापासून मी आंबेगावात राहायला आहे. घराणेशाहीचे राजकारण सध्या इथे सुरू आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. आम्हाला आश्वासन नको, मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत," अशी भूमिका निवडणूक अर्ज भरताना शरद राम पवार यांनी मांडली होती. त्यामुळे बारामतीचा मतदार या उमेदवाराला कितपत प्रतिसाद देणार, याबाबत औत्सुक्य निर्माण झालं होतं. मात्र प्रत्यक्ष निकालात शरद राम पवार या उमेदवाराला अवघी ७३१ मतं पडली आहे.
 
बारामतीत नेमकं काय घडलं?

सुरुवातीपासून अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी मोठा विजय संपादन करत चौथ्यांदा विजय साधला. सुळे यांनी १ लाख ५८ हजार मतांनी विजय मिळवित त्यांची भावजय सुनेत्रा पवार यांचा दणदणीत पराभव केला. केवळ एका फेरीचा आघाडीचा अपवाद वगळता सुळे यांनी सर्वच फेऱ्यांमध्ये आघाडी कायम ठेवली. त्यात बारामती विधानसभा मतदारसंघात तब्बल ४८ हजार मतांची आघाडी मिळाली.

दरम्यान, बारामतीवर थोरले की धाकटे पवार वर्चस्व राखणार याकडे दिल्लीपासून गल्लीचे लक्ष लागले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान आहे. वेळोवेळी मिळालेल्या राजकीय यशाचे हे स्थान नेहमीच अधोरेखित झाले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यासह ‘साहेब’ आणि ‘दादां’च्या राजकारणाचेच एका अर्थाने आज भवितव्य ठरणार होते. मतदारसंघात यंदा ६९.४८ टक्के मतदान झाले. हेच मतदान २०१९ मध्ये ७०.२४ टक्के झाले होते. त्यामुळे यंदा बारामतीच्या मतदानात ०.७६ टक्के घट झाली. भावनिकतेचा मुद्दा आणि विकासकामांच्या मुद्यासह पवार कुटुंबीयांनी एकमेकांवर केलेले आरोप यंदाच्या लोकसभेत चर्चेचा विषय ठरले.

Web Title: How many votes did the candidate named Sharad Pawar who contested the election from Baramati get

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.