कोणी तुमच्या सरळ स्वभावाचा फायदा घेत असेल तर त्याच्याशी कसे वागावे, हे 'या' श्लोकातून शिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 08:00 AM2022-01-15T08:00:00+5:302022-01-15T08:00:07+5:30

जशास तसे वागलो तरच या जगात आपला निभाव लागेल अन्यथा...

If someone is taking advantage of your straightforward nature, learn how to deal with him from this verse! | कोणी तुमच्या सरळ स्वभावाचा फायदा घेत असेल तर त्याच्याशी कसे वागावे, हे 'या' श्लोकातून शिका!

कोणी तुमच्या सरळ स्वभावाचा फायदा घेत असेल तर त्याच्याशी कसे वागावे, हे 'या' श्लोकातून शिका!

googlenewsNext

बालपणी आपण खेळ खेळायचो तो आठवतो का? 'कुणीही यावे टपली मारून जावे...' ज्याच्यावर राज्य, त्याचे डोळे रुमालाने बंद असत आणि बाकीचे गडी येऊन टपली मारून जात असत. मारणाऱ्याच्या आवाजाने, स्पर्शाने, हसण्याने तो कोण आहे, हे ओळखायचे. या खेळात राज्य घेणारा खेळाडू रडकुंडीला येत आणि बाकीचे खेळाडू हात धुवून घेत असत. बालपण संपले, पण आजही आपल्याशी हा खेळ अनेकदा खेळला जातो. कोणीही येतो, आपल्याला अपशब्द बोलून जातो, दोषी ठरवतो, सल्ले देतो, अपमान करतो, फसवतो. हे आपल्याशी का घडते? याचे एका श्लोकात वर्णन केले आहे... 

नात्यन्तं सरलै: भाव्यं, पश्य गत्वा वनस्थलीम
छिद्यन्ते सरला: तत्र, कुब्जा तिष्ठन्ति पङगुवत।।

फार सरळपणाने कुणी वागू नये. वनातून फेरफटका मारून पाहा. सरळसोट झाडांना कापून नेतात. वेडीवाकडी झाडे तशीच ठेवतात. असा या श्लोकाचा मतितार्थ आहे. अत्यंत सरळ वृत्ती म्हणजेच भोळीसांब वृत्ती कधीही नसावी. अशा लेकांना जग फसवते. ठकासी असावे ठक, उद्धटासी उद्धट! असाच व्यवहार ठेवावा.

वास्को द गामा पोर्तुगालहून भारतात आला. कालिकतचा राजा झामोरीन याने त्याचे स्वागत केले. पुढल्या वारीला वास्को द गामाने  बंदुका आणल्या. झामोरीनला पकडून त्याने त्याच्या मुस्काटीत मारली. पोर्तुगिजांनी भारतात पहिले पाऊल टाकले, ते असे! 

आपण गुलामीत १००० वर्षे काढली याला कारणही आपली  कमालीची सरळ वृत्ती! त्याचे फलित म्हणजे वर्षानुवर्षे पत्करलेली गुलामगिरी! स्वातंत्र्य मिळाले, परंतु अजुनही आपली पारतंत्र्याकडे वाटचाल सुरू आहे. संस्कृतीचे अतिक्रमण असो किंवा आचार विचारांचे! अशामुळे दडपशाहीचे साम्राज्य सुरू होते. 

याबाबतीत लोकमान्य टिळकांचा शाळेतला प्रसंग आठवतो. वर्गातल्या मुलांनी शेंगा खाऊन टरफले टाकली. शिक्षकांनी एकेकाला कान धरून जाब विचारला. कोणीच कबुली देत नाही म्हटल्यावर सरळ स्वभावाच्या लोकमान्य टिळकांना उभे केले. त्यांच्याकडूनही उत्तर येत नाही म्हटल्यावर टरफले उचलण्याची शिक्षा सुनावली. बाकीचे वर्गमित्र गालातल्या गालात हसू लागले. तेव्हा लोकमान्यांनी बाणेदारपणे उत्तर दिले, `मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचणार नाही.' शिक्षकांच्या दृष्टीने तो उर्मटपणा ठरला असेल, परंतु हा स्वाभिमान त्यांनी स्वराज्याच्या वेळेस दाखवत ब्रिटीशांना खडसावून सांगितले, 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!'

सत्याला स्वाभिमानाची जोड मिळाली की त्याचे तेज आपोआप झळकू लागते. यासाठी सत्याची कास धरावी, म्हणजे निर्भिडपणा आपोआप अंगी बाणला जातो. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही सत्याचा मार्ग अनुसरूया. स्वभावात सरळपणा असला तरी हरकत नाही, परंतु त्याचा गैरफायदा कोणी घेणार नाही, याबद्दल सजग राहूया. 

Web Title: If someone is taking advantage of your straightforward nature, learn how to deal with him from this verse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.