Hanuman Jayanti 2025: मंदिर रामाचे, हनुमानाचे, पण लक्ष्मण, भरत, शत्रूघ्नाचे नाही, असे का? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:15 IST2025-04-08T13:12:42+5:302025-04-08T13:15:43+5:30
Hanuman Jayanti 2025: रामायणात इतरही व्यक्तिरेखा असूनही मंदिरात मूर्तीपूजेचा मान फक्त हनुमानालाच का? हनुमान जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊ.

Hanuman Jayanti 2025: मंदिर रामाचे, हनुमानाचे, पण लक्ष्मण, भरत, शत्रूघ्नाचे नाही, असे का? वाचा!
महर्षी वाल्मिकींच्य रामायणात श्रीरामाच्या नंतर हनुमंताचेच व्यक्तिमत्त्व आपले चित्त वेधून घेते. जन्मत: सूर्यबिंबाकडे गरुडझेप घेणारा बाल हनुमान हा एक `न भूतो न भविष्यति' असा चमत्कार आहे. असा आगळा पराक्रम केवळ महाकपि हनुमंतच करू जाणे. पण हे देवत्व त्याला कसे प्राप्त झाले ते हनुमान जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया. यंदा १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती(Hanuman Jayanti 2025) आहे, त्यानिमित्त ही माहिती हनुमानाचे महत्त्व अधोरेखित करेल.
हनुमंत हा अंजनी नामक वानरीचा पुत्र, परंतु तो वायूच्या कृपा प्रसादाने झालेला असल्याने त्याच्या अंगी असा जगावेगळा पराक्रम करण्याचे सामर्थ्य निर्माण झाले. या हनुमंताला त्याच्या बालपणी अनेक देवदेवतांनी वेगवेगळे वर दिले. त्यामुळे तो सर्वांनाच अजिंक्य झाला. परंतु पुढे आपल्या बालभावानुसार तो ऋषींच्या आश्रमात जाऊन नाना प्रकारची दांडगाई करू लागला.
शेवटी ऋषींनी आपले नेहमीचे हत्यार बाहेर काढले. त्यांनी हनुमंताला शाप दिला, की `तुझ्या बलाची कुणीतरी आठवण करून देईपर्यंत आपल्या बलाचे ज्ञान तुला मुळीच होणार नाही!'
या शापामुळे हनुमंताला आपल्या बलाचा विसर पडला आणि इकडे ऋषींची तपश्चर्याही निर्वेधपणे सुरू झाली. परंतु पुढे समुद्र उल्लंघनाच्या वेळी जांबुवंताने हनुमंताला त्याच्या बलाची आठवण करून दिली.
Hanuman Jayanti 2025: कोणत्याही प्रकारच्या संकट निवारणासाठी मंगळवारपासून ११ दिवस करा 'हा' उपाय!
हा प्रसंग `किष्किंधाकांडात' वर्णन केला असून इथूनच पुढे हनुमंताच्या बलदंड व्यक्तिमत्त्वाचा फुलोरा खऱ्या अर्थाने फुलू लागतो. त्याच्या अंगाचे एक एक गुण प्रकट होऊ लागतात आणि पाहता पाहता त्याची व्यक्तिरेखा हिमालयाच्या उत्तुंग शिखराप्रमाणे भव्य दिव्य बनते आणि रामायणाच्या अखेरीस तर त्याला `देवत्त्व' प्राप्त होते.
श्रीरामाच्या परिवारात लक्ष्मण आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहे, जांबुवान, सुग्रीव, बिभीषण यासारखी कितीतरी पराक्रमी आणि गुणी मंडळी आहेत, परंतु श्रीरामाप्रमाणे देवत्त्व प्राप्त झाले, ते हनुमंताला! त्यामुळे श्रीरामाची मंदिरे आपल्याला आढळतात, तशीच हनुमंताचीही आढळतात. श्रीरामाच्या परिवारातील अन्य कुणाचीही आढळत नाहीत, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.
Hanuman Jayanti 2025: रामभक्त हनुमान चिरंजीवी आहेतच, पण अन्य ६ चिरंजीवी कोण? चला जाणून घेऊ!