Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे का म्हणतात? व्यासपीठालाही त्यांचेच नाव का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:42 IST2025-07-08T16:41:24+5:302025-07-08T16:42:13+5:30
Guru Purnima 2025: यंदा गुरुवारी १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे, त्या दिवशी महर्षि व्यासांचे पूजन का केले जाते, यामागील कारण जाणून घेऊ.

Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे का म्हणतात? व्यासपीठालाही त्यांचेच नाव का?
आषाढ पौर्णिमेला(Ashadh Purnima 2025) महर्षी व्यासांनी पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतला म्हणून या तिथीला गुरुपौर्णिमा(Guru Purnima 2025) म्हटले जाते. कारण महर्षि व्यास हे सर्वच विषयात गुरुस्थानी ठेवावेत असेच आहेत. त्यांच्या कृपेने कला सादर करण्यासाठी मिळालेले पीठ व्यासपीठ म्हणून ओळखले जाते, म्हणून त्याचेही पूजन केले जाते.
Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेपासून चातुर्मासात दर गुरुवारी करा 'हे' उपाय; धनसंपत्ती मिळेल अपार!
त्यामुळे संन्यासी मंडळी या दिवशी व्यासांची पूजा करतात. त्यासाठी स्नानदी नित्यकर्मानंतर संकल्पपूर्वक एक सुती धूतवस्त्र अंथरतात. त्याच्यावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेषा काढतात. हेच व्यासपीठ! त्यावर ब्रह्मा, विष्णू, वसिष्ठ, पराशर, शक्ती, व्यास, शुक्रदेव, गौडपाद, गोविंदस्वामी आणि शंकराचार्य यांना आवाहन केले जाते. त्यानंतर त्यांची विधीवत कृतज्ञतापूर्वक पूजा करतात. दक्षिणेकडील शंकरपीठांमध्ये या दिवशी महोत्सवच असतो.
ही विधीवत पद्धत आज अनेकांना माहित नसली, तरीदेखील कलासादरीकरणाला वाव देणाऱ्या व्यासांना स्मरून सादरीकरण मंचाला व्यासपीठ हे नाव दिले गेले. आजही कलाकार, वक्ते, व्याख्याते, कीर्तनकार, प्रवचनकार, त्या व्यासपीठाला वंदन करून मगच सादरीकरणाला सुरुवात करतात.
व्यास हे अखिल जगाचे गुरु आहेत. आपल्या संस्कृतीची मूळ संकल्पना ही व्यासांचीच आहे. त्यांनीच तिची जोपासना केली. व्यास आपले धर्म अध्यात्म वाङमय अशा सर्व विषयातील गुरु आहेत. त्यामुळे संस्कृती व्यासांचे असे कृतज्ञतापूर्वक स्मरण करते. याच दिवशी आपल्या मातापित्यांची आणि गुरुंची पूजा करण्याची प्रथा ओ. निष्ठावान शिष्य आणि आदर्श गुरु यांचे परस्परांशी असलेले नाते अन्य मंडळींना कळणारे नसते. शिष्याला आपला गुरु हा देवाहूनही श्रेष्ठ असतो. तर शिष्याला भवसागरातं पैलपार नेण्याची शक्ती केवळ गुरुंपाशीच असते.
आजच्या काळात आदर्श गुरु आणि आदर्श शिष्य मिळणे कठीण आहे. गुरुंकडे ज्ञान असले तरी शिष्याकडे शिकण्याची ओढ नसते किंवा शिष्याची शिकायची तयारी असली, तरी त्याला योग्य गुरुंची साथ लाभत नाही. आजचे गुरु शिष्य व्यवहारी जगात अडकले आहेत. परंतु ज्ञानाची, अध्यात्माची, परमेश्वर प्राप्तीची तळमळ फारच कमी गुरुशिष्यांमध्ये आढळते.
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
तरीही अजूनही काही गुरुशिष्यांची जोडी अशी आहे, ज्यांनी अजूनपर्यंत या नात्याचे पावित्र्य जपत गुरुशिष्य परंपरा अबाधित ठेवली आहे. व्यासपीठाचा मान राखला आहे. या निमित्ताने आपणही आपल्या आयुष्याला वळण देणाऱ्या गुरुंचा मान राखुया. त्यांना गुरुदक्षिण देऊया आणि दत्त गुरुंचे दर्शन घेऊन गुरुपौर्णिमा साजरी करूया.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!