गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुपूजन, गुरुमहती, गुरुतत्त्व कालातीत; आजही आहे गुरुला महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 15:04 IST2025-07-08T15:01:11+5:302025-07-08T15:04:02+5:30

Guru Purnima 2025: काळ कोणताही असो, गुरुचे महत्त्व आणि महात्म्य अखंड अबाधित आहे. जीवनात गुरु असणे किती आवश्यक आहे? जाणून घ्या...

guru purnima 2025 know about guru puja guru mahati timeless significance of guru and how guru is still important today | गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुपूजन, गुरुमहती, गुरुतत्त्व कालातीत; आजही आहे गुरुला महत्त्व

गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुपूजन, गुरुमहती, गुरुतत्त्व कालातीत; आजही आहे गुरुला महत्त्व

Guru Purnima 2025: गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती. आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. यंदा गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा गुरुवारी आल्याने या दिवसाचे महत्त्व आणि महात्म्य वाढल्याचे म्हटले जात आहे. 

गुरूपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरूपौर्णिमेला गुरूपूजनही केले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. पूर्वी गुरुकूल पद्धत रुढ होती. गुरुकडून ज्ञानप्राप्ती केल्यानंतर स्वगृही परतण्यापूर्वी गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे, असे सांगितले जाते. भारतात पुराण काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असत. ज्ञानसंपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे. आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे. मात्र गुरुकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे. जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आपल्या गुरुकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शिष्य आपल्या गुरुंची भेट घेतात.

आई माझा गुरु, आई माझा कल्पतरु, सौख्याचा सागरु, आई माझी

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा पहिला गुरु त्याची आई असते. अगदी चालण्या-बोलण्यापासून ते संस्कार करेपर्यंत अनेक गोष्टी आई शिकवत असते. म्हणूनच 'आई माझा गुरु, आई माझा कल्पतरु, सौख्याचा सागरु, आई माझी', असे म्हटले जाते. आईसोबत वडीलही अनेक गोष्टी शिकवत असतात. त्यामुळे 'मातृदेवो भव:, पितृदेवो भव:', असेही म्हटले जाते. घरातून बाहेर पडल्यानंतर शिक्षक, वडील मंडळी, मित्रमंडळी, तज्ज्ञ मंडळी असे अनेक जण आपल्याला गुरु, मार्गदर्शक म्हणून लाभतात. 

आयुष्यात चांगला गुरु मिळणे भाग्याचे लक्षण 

आयुष्यात चांगला गुरु मिळणे भाग्याचे लक्षण समजले जाते. कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला की, 'ग' कार म्हणजे सिद्ध होय. 'र' कार म्हणजे पापाचे दहन करणारा. 'उ' कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रह्म तत्त्व आहे, ते जाणण्यासाठी गुरुंचा आश्रय घ्यावा लागतो. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु स्वत: प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो, असे मानले जाते. 

जीवनात गुरु असणे किती आवश्यक आहे?

गुरुचे कार्य महान कार्य आहे. आपल्या शिष्यांच्या चांगल्याचा विचार करून त्यांना आपल्याजवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणे हे गुरुचे खरे कार्य असते. गुरु त्यांच्याजवळील ज्ञान आणि अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात. जीवन जगत असताना या ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते. स्वानुभवातून शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातीस समस्या लवकर सोडवता येतात आणि जीवन सुखी-समाधानी होते. जीवनात गुरुशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सद्गुरु असोत, शिष्याला गुरुप्रती कृतज्ञता आणि श्रद्धा असणे गरजेचे आहे.

गुरु आणि शिष्य कसे असावेत?

ज्ञान देताना गुरूची भावना ही अहंकाराची नसावी. गुरुने दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते, तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरुला आनंद आणि समाधान झाले, तरच तो खरा गुरु जाणावा. गुरुकडून मिळालेले ज्ञान नम्रपणे स्विकारतो, त्या शिष्याला गुरुकडून मिळालेले ज्ञान जसेच्या तसे मिळते. कारण ज्ञान ग्रहण करताना शिष्याकडे नम्रपणा नसेल, तर गुरुकडे शिष्याबद्दल प्रेम आणि आपलेपणा असूनही शिष्याला समजावणे गुरुला कठीण जाते. कारण ज्ञानप्राप्तीमध्ये शिष्याचा अंहकार अडथळा निर्माण करत असतो. यासाठीच शिष्याची गुरुवर मनापासून श्रद्धा असणे गरजेचे आहे. त्याचसोबत गुरुकडून मिळालेले ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा शिष्याने तंतोतंत प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे केल्यास शिष्याच्या पाठी गुरुच्या ज्ञानाचे बळ आणि साधना निर्माण होते आणि त्याची आयुष्यात प्रगती होत जाते.

गुरुपौर्णिमा आणि गुरुपूजनाचे महत्त्व

गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करण्याची पद्धत आहे. गुरुपूजन म्हणजे केवळ गुरुची पाद्यपूजा करणे अथवा गुरुला वाकून नमस्कार करणे, असे मूळीच नाही. खऱ्या गुरुला अशा दिखाव्यांची गरज नसते. गुरुपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरूने दिलेले ज्ञान आत्मसात करणे. गुरुंकडून मिळवलेले ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे. गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे आपले जीवन यशस्वी झाले यासाठी सतत गुरुबद्दल कृतज्ञ असणे. या कृतज्ञतेपोटी गुरुंची सेवा आणि आदर करणे म्हणजे खरे गुरुपूजन. अशा प्रकारच्या गुरुपूजनातून गुरुला खरी गुरूदक्षिणा मिळत असते. कारण जेव्हा शिष्याची प्रगती होते, तेव्हा ती पाहून गुरुला खरा आनंद होत असतो. खऱ्या गुरुसाठी हा एक प्रकारचा सन्मानच असतो.

गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात

'समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिलने वाला' हे वाक्य तुम्ही वाचले असेल. गुरु कृपा होण्यासाठीदेखील योग्य वेळ यावी लागते, असे म्हटले जाते. आपण गुरु म्हणून दत्त गुरु, स्वामी समर्थ, गजानन महाराज, गगनगिरी महाराज, शंकर महाराज, गोंदवलेकर महाराज अशा दैवी गुरूंची उपासना करतोच. ते आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवतात, अध्यात्माचा मार्ग दाखवतात आणि जीवन मृत्यूच्या पलीकडच्या प्रवासाला घेऊन जातात. त्यांची उपासना केल्यामुळे न सुटणारे प्रश्नही आपोआप सुटत जातात. शिष्याची अध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरूच त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतो. प्रत्येकाचाच गुरू ठरलेला असतो. शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरूच त्याचा शोध घेत येतो. जोपर्यंत मानवी गुरू भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपले गुरू मानावे, असे म्हटले जाते. सद्विचार, सत्संगति आणि नामस्मरण या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. 

 

Web Title: guru purnima 2025 know about guru puja guru mahati timeless significance of guru and how guru is still important today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.