Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:16 IST2025-07-02T11:15:44+5:302025-07-02T11:16:11+5:30
How to Find a Guru: आपल्या आयुष्याला योग्य वळण देण्यासाठी गुरु मिळावे लागतात; मुख्य म्हणजे त्यांना शोधावे लागत नाही तर ते आपणहून येतात...पण कधी ते जाणून घ्या!

Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
Guru Purnima 2025: 'समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिलने वाला' हे वाक्य तुम्ही वाचले असेल. गुरु कृपा होण्यासाठीदेखील योग्य वेळ यावी लागते. ती कधी येते? कशी येते आणि आलेली वेळ, त्याबरोबर गुरु म्हणून आपल्या आयुष्यात आलेली व्यक्ती कशी ओळखावी ते येत्या गुरु पौर्णिमेनिमित्त(Guru Purnima 2025) जाणून घेऊ.
आपण गुरु म्हणून दत्त गुरु, स्वामी समर्थ, गजानन महाराज, गगनगिरी महाराज, शंकर महाराज, गोंदवलेकर महाराज अशा दैवी गुरूंची उपासना करतोच. ते आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवतात, अध्यात्माचा मार्ग दाखवतात आणि जीवन मृत्यूच्या पलीकडच्या प्रवासाला घेऊन जातात. त्यांची उपासना केल्यामुळे न सुटणारे प्रश्नही आपोआप सुटत जातात. मात्र ही गुरुकृपा होण्यासाठी वेळ लागू शकतो. मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे गुरु मदत करतात ते आपल्या आयुष्यात कधी येतात? तर त्याची सुंदर व्याख्या वाचायला मिळते...
गुरू केव्हा भेटतो?
शिष्याची अध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरूच त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतो. रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत, कमळ फुलले की भुग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही. पाणी शंभर अंश तापले की त्याची आपोआप वाफ होतेच. हा नियम जितका खरा तितकाच हाही नियम खरा : आहे, परंतु कोणताही संत आपला गुरू होऊ शकत नाही. गुरू शिष्य हे ही ठरलेले असतात. इतर मार्गदर्शन करतील, सूचना करतील; पण त्यांचे गुरू होऊ शंकणार नाहीत. कारण प्रत्येकाचाच गुरू ठरलेला असतो. शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरूच त्याचा शोध घेत येतो. जोपर्यंत मानवी गुरू भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपले गुरू मानावे.
संत कबीर म्हणतात -
गुरु गोविंद दोऊ खडे, का के लागो पाय?
बलिहारी गुरु आपने गोविंद धियो बताय!
अर्थ : आपल्यासमोर देव येऊन उभा राहिला तरी त्याला ओळखण्याची आपल्याकडे पात्रता नाही, कारण आपण आपल्या आयुष्यात देव प्रत्यक्ष पाहिलेलाच नाही. म्हणून कबीर म्हणतात, आधी गुरूंना वंदन करा, कारण त्यांनी देव पाहिला आहे आणि ते आपल्याला त्याची ओळख करणार आहेत. म्हणून देवाआधी जवळ कोण तर गुरु! जे आपल्याला सन्मार्ग दाखवतात, ध्येयाचा मार्ग दाखवतात आणि आपल्या आयुष्याला वळण देतात. म्हणून गुरूंचा शोध घ्यायला जाऊ नका, तेच तुमच्या भेटीला येतील, फक्त ते आपल्या आयुष्यात येण्याइतकी स्वतःची पात्रता तयार करा.