२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 10:04 IST2025-12-31T10:00:54+5:302025-12-31T10:04:37+5:30
First Pradosh Vrat January 2026: २०२६ या इंग्रजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रदोष व्रत आहे. महादेवांच्या उपासनेने नववर्षाची सुरुवात करण्याची सुवर्णसंधी आहे. सविस्तर जाणून घ्या...

२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
First Pradosh Vrat January 2026: इंग्रजी नववर्ष २०२६ चा पहिलाच दिवस अतिशय खास ठरणार आहे. कारण पहिल्याच दिवशी कोट्यवधी भाविकांचे आराध्य असणाऱ्या महादेव शिवशंकराची उपासना करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. वर्षभरात अनेक प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये केली जातात. २०२६ या नववर्षाची सुरुवात प्रदोष व्रताने होणार आहे. कसे करावे प्रदोष व्रत? गुरु प्रदोष म्हणजे काय? महादेवांचे पूजन करायची सोपी पद्धत आणि शिवाचे काही प्रभावी मंत्र जाणून घेऊया...
प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला प्रदोष असतो. प्रदोषाचे व्रत हे महादेव शिवशंकराचे शुभाशिर्वाद मिळण्यासाठी केले जाते. या तिथीला केलेली महादेवांची उपासना, पूजन अत्यंत शुभ मानले जाते. अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेल्या पूजनामुळे मान, सन्मान, धन आणि वैभव प्राप्त होते. सर्व प्रकारचे दोष दूर होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.
गुरु प्रदोष म्हणजे काय?
गुरुवार, ०१ जानेवारी २०२६ रोजी प्रदोष व्रत आहे. गुरुवारी प्रदोष येत असल्यामुळे याला गुरुप्रदोष असे संबोधले जाते. शिवभक्तांसाठी प्रदोष व्रत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. या व्रतामुळे एक सहस्र यज्ञाचे पुण्य लाभते. आर्थिक आघाडी उत्तम होते, असे सांगितले जाते. व्रताचे आचरण करणाऱ्यांना आणि त्यांच्या वारसांना दीर्घायुष्य प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जात आहे. प्रदोषव्रत प्रदोषकाळी म्हणजेच सायंकाळी करावयाचे असते.
प्रदोष व्रतात शिवपूजन कसे करावे?
प्रदोष व्रत प्रामुख्याने तिन्हीसांजेला दिवेलागणीला केले जाते. सूर्यास्तानंतर स्नानादी कार्ये उरकून प्रदोषाचे व्रताचरण करावे. षोडषोपचार पद्धतीने शिवपूजन करावे. षोडषोपचार पद्धतीने शक्य नसेल, तर पंचोपचाने महादेव पूजन करावी. महादेवांवर पंचामृताचा अभिषेक करावा. त्यानंतर जलाभिषेक, शक्य असेल तर रुद्राभिषेक करावा. व्रत-पूजनावेळी अन्य काही नसल्यास बेलपत्र आवर्जून अर्पण करावे. त्यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. महादेवांची आरती करावी आणि या व्रताची कहाणी ऐकावी किंवा त्याचे पठण करावे, असे सांगितले जाते. प्रसादाचे वाटप करून मनापासून शंकराला नमस्कार करावा. शिव पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते. भगवान शंकराची कृपा प्राप्त होते, असे म्हटले जाते.
गुरु प्रदोष व्रताचे महत्त्व
गुरुवारी प्रदोष येत असल्यामुळे याला गुरुप्रदोष असे संबोधले जाते. गुरुवार या दिवसावर गुरु ग्रहाचा अंमल असतो. नवग्रहांमध्ये बृहस्पति म्हणजे गुरु ग्रह देवांचा गुरु मानला गेला आहे. गुरुप्रदोषाच्या दिवशी महादेवांसोबत गुरुदेवांचे स्मरण करावे. गुरुचा मंत्र किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती म्हणावा. देवानांच ऋषीणांच गुरुं कान्चनसन्निभम। बुद्धि भूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पितम्॥, हा नवग्रह स्तोत्रातील गुरुचा मंत्र आहे. ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः॥, ॐ बृं बृहस्पतये नम:॥, हा गुरुचा बीज मंत्र आहे. तर, ॐ गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरु: प्रचोदयात॥, हा गुरुचा गायत्री मंत्र आहे. कुंडलीतील गुरुची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर गुरुवारी विशेष व्रत करावे. गुरुशी संबंधित वस्तू, पिवळ्या वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. गुरुच्या नक्षत्रात केलेले हे दान अधिक शुभफलदायी मानले जाते. गुरुचे रत्न पुष्कराज शास्त्रशुद्ध पद्धतीने धारण करावे. रुद्राक्षही धारण करता येऊ शकेल. गुरु ग्रहाशी संबंधित गोष्टींचे यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते.
प्रदोष व्रतात आवर्जून करा शिव मंत्राचे जप
प्रदोष व्रत काळात महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते. 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥