Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:01 IST2025-05-14T13:00:22+5:302025-05-14T13:01:18+5:30

Guru Gochar 2025: गुरु गोचर दर वर्षी होते, मात्र आता गुरु प्रतिगामी असल्याने अनेक गोष्टींना वेग येईल, त्यात काही चांगल्या आहेत तर काही वाईट; त्याबद्दल माहिती!

Guru Gochar 2025: The face of the world will change in eight years due to Guru Gochar, fear of viruses too! | Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!

Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक

आपल्या पत्रिकेत १२ भाव असतात आणि गुरु महाराज प्रत्येक राशीतून साधारणतः १२-१३ महिने भ्रमण करत असतात. प्रत्येक वर्षी ते राशी बदल करतात. सोशल मिडिया प्रगत झाल्यामुळे आज आपण ह्या विषयावर असंख्य व्हिडिओ बघत असतो. अनेक अभ्यासक त्याबद्दल आपला अभ्यास आपल्यासमोर मांडत असतात. असाच एक गुरु बदल आज होत आहे, ज्याचा दीर्घकाळ परिणाम राहणार आहे. 

गुरु आज वृषभ ह्या शुक्राच्या राशीतून बौद्धिक अशा बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे . गुरु आता अतिचारी असल्यामुळे फक्त पाच महिन्यात पुन्हा राशी परिवर्तन करत कर्क ह्या राशीत उच्च सिंहासनावर विराजमान होणार आहे. गुरुचे पत्रिकेतील कारकत्व अत्यंत विशाल आहे. गुरु हा आकाश तत्वाचा ग्रह असून त्याच्याकडे पत्रिकेतील नवम, व्यय हे भाव येतात . गुरु पुढील ८ वर्ष अतिचारी म्हणजे नेहमीच्या गतीपेक्षा अधिक गतीने त्याच्या कक्षेतून मार्गक्रमण करणार आहे . ह्या काळात जगाचा चेहरा मोहरा बदलून जाईल आणि अनेक आव्हाने सुद्धा समोर उभी राहतील. या काळात कोरोनासदृश एखादा व्हायरस डोके वर काढण्याचीही शक्यता आहे. 

सोन्याचे भाव आजच आकाशाला भिडले आहेत ते अजून अधिक होत राहतील. बुधाकडे आकलन आहे तर गुरू म्हणजे ज्ञानाचा सागर . आकाशतत्व असल्यामुळे स्पेस म्हणजे अंतराळातसुद्धा काहीतरी प्रगती होईल आणि संपूर्ण जगाचे लक्ष्य तिथे वेधले जाईल. गुरु प्रसरण पावणाऱ्या मोठ्या गोष्टी करणार असल्यामुळे एकंदरीत जनमानसात अहंकार फुलेल आणि नेमके तिथेच मनुष्याचा घात होईल. गुरूला अहंकार आवडत नाही त्यापासून तो परे आहे. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त नियम लागू होतील, कायदे बदलतील, अधिक कडक होतील. न्यायव्यवस्था नवीन बदलांचे संकेत देईल. शनीही गुरुच्याच राशीत आहे. शिक्षण क्षेत्र नवीन रुपात बघायला मिळेल. बुधाच्या राशीतील गुरु कर्तृत्त्व विकसित करेल. 

गुरु कुठल्याही राशीतून भ्रमण करीत असला तरी गुरु तत्व बदलेल का? नाही. हाच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह असल्यामुळे वाईट करणार नाही. आई आपले कधी वाईट करते का? नाही. गुरु ज्या भावात असेल त्याप्रमाणे फळ बदलेल पण तत्व कायम राहील. 

गुरु बदल झाला म्हणून गावभर नुसती बोंबाबोंब चालली आहे तसेच शनी बदल झाला तेव्हाही असेच. अहो ते ग्रह त्यांच्या मार्गाने जाणारच! गुरु बदलून कुठल्या राशीत जाणार ह्यासाठी ज्योतिष कशाला हवे? तुम्ही स्वतःच ह्याचे उत्तर देऊ शकाल. गुरु शनी हे परमार्थाचे ग्रह आहेत , नीतीने आचरण करा हे सांगणारे , माणसातील देव ओळख आणि माणसाशी माणुसकीने वागा हेच सर्व ग्रंथाचे सार आहे. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी आज जसे वागाल तसेच तुमची मुले तुमच्याशी वागणार हे निश्चित, कारण हे कर्म तुम्हीच स्वतः तयार केले आहे.

गुरु मिथुन राशीत जाणार मग मुलाचा विवाह ठरणार. अगदी बरोबर, पण मुळात पत्रिकेत विवाहाचा योग असेल तर होणार ना? हा विचार कुणीही करत नाही. आज एकजण मला विचारत होते पुष्कराज घालू का ? बघा, हाही एक अहंकार आहे, जेव्हा सोने लक्ष किमतीत आहे. पण गुरूंचे नामस्मरण करू का ते नाही विचारणार कारण ते तितकेच अवघड आहे. रत्न घालायचे आहे ना? जरूर घाला, त्यातील तज्ञांचा सल्ला घेऊन घाला, पण आधी ह्या क्षणापासून नामस्मरण सुरु करा कारण तेच एकमेव जालीम औषध आहे .सब दुखोकी एक दवा. इतकेच म्हणावेसे वाटते.

ऋषीमुनी रत्न घालून फिरत होते का? रत्न म्हणजे खर्च आला त्यापेक्षा नाम घ्या कि ते फुकट आहे बिनखर्चिक आहे. पण ते इतके कठीण आहे आणि आपल्याला डोळ्याची पती लवते न लवते त्यात काम झालेले हवे आहे. कष्ट करायला नको. बरे रत्न घातले की मिरवता येईल का? दीड लाखाची अंगठी केली हे दिसेल , पण नाम घेतलेले नाही दिसणार . मी रत्नशास्त्राच्या विरोधात अजिबात नाही . प्रत्येक शास्त्र त्याच्या जागी श्रेष्ठ आहे पण नामस्मरण सहज करता येण्यासारखे असूनही रत्न घालू का हा प्रश्न विचारणारा स्वतः जेव्हा कर्जात असतो तेव्हा मात्र अचंबित व्हायला होते. 

गुरु आपल्याला आपल्या आतला आवाज ऐकायला शिकवतो मग तो कुठेही असो. खरतर गुरु शनी ह्यांची तुमच्या पत्रिकेतील ओळख म्हणजे तुमचे नित्य कर्म . कर्म श्रेष्ठ तर आयुष्य सन्मार्गावर आणि तसे असेल तर हीच गुरुकृपा म्हंटली पाहिजे. गुरु काहीही वेगळे करणार नाही . वेगळे करायचे आहे ते तुम्ही तुमच्या कृतीतून. गुरूचा वरदहस्त अर्थकारणावर असल्यामुळे शेअर मार्केट सारख्या पटकन लाभ देणाऱ्या गोष्टीकडे डोळस पणे पहिले पाहिजे. गुंतवणूक जपून करा, कारण गुरु अतिचारी आहे. 

मोठमोठ्या वल्गना न करणे बरे . थोडे लो प्रोफाईल राहणे गुरूला आवडेल. नित्याच्या कर्माला उपासनेची जोड हवी. जितक्या तत्परतेने मोबाईलचा स्क्रीन स्क्रोल करता त्याहीपेक्षा तत्परतेने मनापासून जपाच्या माळे वरून आपली बोटे फिरली पाहिजेत . बुध म्हणजे संवाद. आपण बोलण्याने माणसे तोडत जातो इतका माज आहे आपल्याला अगदी मला कुणाचीच गरज नाही. माणसे जपून  ठेवली पाहिजेत. माणूस म्हणजे गुरु आणि ते तत्व प्राणीमात्रात सुद्धा आहेच. गुरु म्हणजे ज्ञान म्हणून एखाद्याच्या शिक्षणाला हातभार लावणे, औषधांचा खर्च करणे ह्यासारखी मदत अनमोल फळे देईल. काहीतरी मिळवण्यासाठी प्रत्येक कृती नको तर त्यातून सामाजिक बांधिलकी माणुसकी आणि समाधान मिळाले पाहिजे. आपण केलेल्या कुठल्याही मदत किंवा कृतीचा उल्लेख सुद्धा नको हे सर्वात महत्वाचे नाहीतर कुणालातरी डझनभर वह्या देतानाचा फोटो सोशल मिडीयावर यायचा म्हणजे सगळे मुसळ केरात.

गुरु बदल झाला, हो गेल्या वर्षीही झाला, त्याच्या आदल्या वर्षीही झाला, पण माझ्यात किती बदल झाला. मी माझी व्यसने सोडली का? सोशल मिडीयावर तासंतास बसून काय केले मी? काय मिळवले आणि काय गमावले? ह्या सर्वाचा हिशोब केला तर माणसे दुरावली, सोडून गेली, अनाठायी पैसा खर्च झाला, किती वेळा शो ऑफ करण्यासाठी लक्ष्मी खर्च झाली, ही सर्व गणिते मनावर ओरखाडे काढतील. कुणाची स्तुती करायची एखाद्याच्या कामाची प्रशंसा करायची तर तेही आपल्याला जमत नाही, कारण मन मेले आहे आपले. उरले आहे ते फक्त मी मी आणि मी. त्या महाराजांना सुद्धा ह्या मी चा कंटाळा आला असेल. मी आणि माझे, ह्यापलीकडे जगच उरलेले नाही आपल्याला तिथे कुठले गुरुतत्व आणि कसले काय ? मनावर सतत दडपण घेवून गोळ्या घेवून झोपतो आपण. बघा पटेल विचार केला तर.
 
गुरुतत्व आपल्याला आपल्या आत बघायला शिकवते. पण बघणार कोण? कारण बाह्य सुखांची भुरळ इतकी जबरदस्त आहे कि आपल्याच आतील एका सुंदर व्यक्तीचा म्हणजेच आपला स्वतःचाच आवाज ऐकायला वेळ नाही आपल्याकडे . 

बुधाच्या ह्या राशीतील गुरु समंजस व्हा हेच सांगत आहे. बालीशपणा सोडून आचार विचारात प्रगल्भता आवश्यक आहे. आज एखाद्या चांगल्या विचारांना, चांगल्या पोस्टला सुद्धा पाठींबा देत नाही आपण. संकुचित विचारसरणी आणि स्वतः पुरतेच जगायची सवय . 

पूर्वीच्या काळी कुठे होते मधुमेह आणि बायपास ? पण आता परवलीचा शब्द झाल्यासारखे जीवनाचा भाग झाले आहेत . एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे नाही, मनात कुढत राहणे , जीवन जगायला लागते त्याहीपेक्षा कित्येक पटीने भौतिक सुखे हात जोडून आहेत पण गेली आहे ती रात्रीची शांत झोप आणि समाधान! अगदी लहान मुलांना सुद्धा डोळ्याला चष्मा , अनेक आजार विकलांग करत आहेत . आयुष्याचा भरवसा नाही की कुठल्याही आर्थिक गुंतवणुकीवर विश्वास नाही . माणूस माणसाला नको आहे.  

हे सर्व होत आहे कारण साधनेला आपण परान्मुख झालेले आहोत. स्वतःचा अहंकार जोपासत आपण काय केले आहे तर अनेक व्याधींनी आपलेच शरीर पोखरून घेतले आहे आणि माणसे तोडून एकटेपणा जवळ केला आहे. एक दिवस एका कागदावर आपले वय लिहा आणि आजवर काय कमावले आणि काय गमावले त्याची गोळा बेरीज करा उत्तर तुमचे तुम्हालाच मिळेल पण ते स्वीकारायचे धाडस मात्र हवे . साधने शिवाय जीवन नाही हेच हा गुरु सांगत आहे . ज्या ज्या गोष्टींवर आपण वेळ वाया घालवत आहोत त्या नाही उपयोगाला येणार! शेवटी येणार ती साधना आणि जोडलेली माणसे. 

आपले व्यक्तिमत्व “ गुरुतुल्य “ असावे हाच ह्या गुरु बदलाचा संकेत समजायला हरकत नाही . उगीचच ह्या राशीला काय मिळणार आणि त्या राशीला गुरु कसा ह्यामध्ये तासंतास वेळ घालवण्यापेक्षा माझ्या कडून गुरूला काय अपेक्षित आहे ? माझी कर्म मी कशी सुधारू आणि नामस्मरणाचा वेग कसा वाढवू . कुठे आणि किती कसे अन्नदान करू, घरातील लोकांची मने जपत घराला कसे अधिक चांगले घरपण देण्याचा प्रयत्न करू?  आजच्या पेक्षा उद्याचा दिवस कसा उत्तम करू ह्या विचारांचे खतपाणी आपणच घातले पाहिजे. 

गुरूबदल झाला पण गेल्या वर्षात माझ्यात काय बदल झाला ह्याचा विचार  कुणीच नाही करत . आपण घरात जसे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातो तसे गुरु ही त्याची राशी बदलत आहे. इतकी स्तोत्र वाचतो , इतकी देवदर्शने करतो , नामस्मरण प्रदक्षिणा काही ठेवत नाही पण तरीही आमचे प्रश्न सुटत नाहीत ह्याचे कारण जे करतो त्यात जीव ओतत नाही, किंबहुना जितके असायला पाहिजे तितके तर नाहीच नाही. सतत संभ्रम, कारण गुरुवर विश्वासच नाही . अध्यात्म जगण्याची कला आहे रोजच्या जीवनातील जगणे हाच गुरूबद्दल आहे.  मागील चुका सुधारणे , नवीन जीवनशैली स्वीकारणे , मदतीचा हात पुढे करणे आणि दुसऱ्यातील चांगले आत्मसात करणे.

गुरु आकाशतत्व आहे . आकाशासारखे मन मोठे करा, सर्वांना त्यात सामावून घ्या, कुणाची उणीदुणी नकोत ...एकमेकांच्या उपयोगी पडूया आणि शेवटचा क्षण आनंदाचा कसा करता येईल ते पाहूया. गुरूला हेच अभिप्रेत आहे. आपला उभा संसार , जे जे काही आहे ते सर्व गुरु चरणांवर समर्पित करूया ,त्यांच्या सेवेची मोहिनी पडू दे आपल्याला आणि त्यात इतके रममाण होऊया की  गुरु बदलला की शनी, साडेसाती सुरु झाली की पनवती संपली, कशाचाही फरक आणि भान राहणार नाही. कसलेही भय नाही आणि चिंता तर त्याहून नाही . काही मिळवायचे नाही आणि कुणाशी कसली स्पर्धाही नाही. अशी मनाची अवस्था हा खराखुरा गुरु बदल असेल. 

संपर्क : 8104639230

Web Title: Guru Gochar 2025: The face of the world will change in eight years due to Guru Gochar, fear of viruses too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.