घोरकष्टोद्धारण स्तोत्र: कर्ज आणि संकटांनी वेढला आहात? मग 'हे' एक स्तोत्र तारेल तुमची जीवन नौका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 07:05 IST2026-01-08T07:00:01+5:302026-01-08T07:05:01+5:30
आज गुरुवार, त्यानिमित्ताने नित्य उपासनेत घोरकष्टोद्धारण स्तोत्राचा समावेश केल्यास काय लाभ होतो, हे सविस्तरपणे जाणून घेऊ.

घोरकष्टोद्धारण स्तोत्र: कर्ज आणि संकटांनी वेढला आहात? मग 'हे' एक स्तोत्र तारेल तुमची जीवन नौका!
श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज विरचित 'घोरकष्टोद्धारण स्तोत्र' हे दत्त भक्तांसाठी एक अमोघ वरदान आहे. संकटाच्या काळात धीर देणारे आणि अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारे हे स्तोत्र नेमके कसे निर्माण झाले आणि त्याचे महत्त्व काय, यावर आधारित हा सविस्तर लेख.
दत्त संप्रदायामध्ये श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक स्तोत्रांची रचना केली, परंतु त्यातील 'घोरकष्टोद्धारण स्तोत्र' हे अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय मानले जाते. विशेषतः गुरुग्रहाची पीडा दूर करण्यासाठी आणि जीवनातील घोर संकटांतून मुक्त होण्यासाठी या स्तोत्राचा पाठ केला जातो.
स्तोत्र निर्मितीची रंजक कथा
या स्तोत्राची निर्मिती केवळ एका भक्ताच्या वैयक्तिक कल्याणासाठी झाली नसून, ती संपूर्ण मानवजातीच्या सुखासाठी झाली आहे.
स्थळ आणि काळ: इ.स. १९११ (शके १८३३) मध्ये स्वामी महाराजांचा २१ वा चातुर्मास कुरुगड्डी (कुरवपूर) येथे सुरू होता.
भक्ताची हाक: कोल्हापूरचे श्री. शेषो कारदगेकर हे स्वामींचे निस्सीम भक्त आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी आले होते. त्यांच्या आयुष्यात दोन मोठी दुःखे होती— त्यांना अपत्य सुख नव्हते आणि त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. "आपली दुःखे आपल्या देवाजवळ नाही तर कोणाकडे सांगायची?" या श्रद्धेने त्यांनी आपली व्यथा स्वामींच्या चरणी मांडली.
स्वामींचा आशीर्वाद: स्वामी महाराजांनी त्यांच्या पत्नीच्या ओटीत प्रसादाचा नारळ दिला आणि आशीर्वाद दिला की, "संतती होईल आणि कर्जही फिटेल." स्वामींच्या शब्दांनुसार पुढे त्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली आणि त्यांचे सर्व कर्जही फिटले.
'घोरकष्टोद्धारण' स्तोत्राचा उगम
आपल्या अडचणी दूर झाल्यावर शेषो कारदगेकर यांच्या मनात एक उदात्त विचार आला. त्यांना वाटले की, ज्याप्रमाणे स्वामींनी माझे कष्ट दूर केले, तसेच जगातील सर्व लोकांचे कष्ट दूर व्हावेत. त्यांनी स्वामींना प्रार्थना केली, "महाराज, माझ्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट निवारण व्हावे, यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांचा धावा करता येईल असे एखादे स्तोत्र सर्वांसाठी तयार करून द्यावे."
भक्ताची ही कळकळ पाहून स्वामी महाराजांनी "घोरसंकटनिवारणपूर्वक श्रीदत्तप्रीतिकारकस्तोत्र" (ज्याला आपण घोरकष्टोद्धारण स्तोत्र म्हणतो) याची रचना केली.
स्तोत्राचे महत्त्व आणि लाभ
हे स्तोत्र श्रीक्षेत्र नरसोबाच्या वाडी येथे दररोज म्हटले जाते. याचे महत्त्व खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होते:
१. संकट निवारण: नावाप्रमाणेच जीवनातील घोर (भयानक) कष्टांचे निवारण करण्यासाठी हे स्तोत्र अमोघ आहे.
२. गुरुग्रह पीडा: ज्यांना पत्रिकेत गुरु ग्रहाची पीडा आहे किंवा गुरु प्रतिकूल आहेत, त्यांच्यासाठी हे स्तोत्र प्रभावी ठरते.
३. कल्याणकारी अनुभव: अनेक भक्त या स्तोत्राचे रोज १०८ पाठ करतात. यामुळे ऐहिक (सांसारिक) आणि पारलौकिक अशा दोन्ही पातळ्यांवर कल्याण झाल्याचे अनुभव भक्तांना आले आहेत.