Gauri Pujan 2025: गौराईला नैवेद्य अर्पण करण्याआधी ताटाखाली काढा पाण्याचे मंडल आणि म्हणा 'हा' मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 16:12 IST2025-08-31T16:11:39+5:302025-08-31T16:12:40+5:30

Jyeshtha Gauri Pujan 2025: घरोघरी गौराईचे आगमन झाले आहे, १ सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन आणि जेवण असेल, त्यावेळेस नैवेद्य अर्पण करताना कोणती काळजी घ्यावी ते जाणून घ्या. 

Gauri Pujan 2025: Before offering offerings to Gaurai, draw a water mandala under the plate and say 'Ha' mantra | Gauri Pujan 2025: गौराईला नैवेद्य अर्पण करण्याआधी ताटाखाली काढा पाण्याचे मंडल आणि म्हणा 'हा' मंत्र

Gauri Pujan 2025: गौराईला नैवेद्य अर्पण करण्याआधी ताटाखाली काढा पाण्याचे मंडल आणि म्हणा 'हा' मंत्र

यंदा ३१ ऑगस्ट रोजी गौराईचे आगमन झाले, आता १ सप्टेंबर रोजी गौरी पूजन(Gauri Pujan 2025) आणि २ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन(Gauri Visarjan 2025) आहे. गौरी ही माहेरवाशीण म्हणून संबोधली जाते. तिचा पाहुणचार करताना तिला नैवेद्य दाखवला जातो. पुरणा-वरणाचा स्वयंपाक केला जातो. गौरी आवाहन करण्याच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. काही जण चांदीच्या, पितळेच्या व मातीच्या मुखवट्यावर, काही जणी सुघटावर, काही जणी मूर्तीवर तर काही जणी वाहत्या पाण्याशेजारील खड्यांवर गौरीचे आवाहन करतात. त्यानंतर तिची यथाविधी पूजा करतात. हळदकुंकू, आघाडा, दूर्वा, फुले, कापसाची वस्त्रे अर्पण करतात. पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी, दुसऱ्या दिवशी पुरण, खीर, तर तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवले, दहीभात असा नैवेद्य करतात. इतरही स्वयंपाक असतोच. 

Jyeshtha Gauri Avahana 2025: गौरी आवाहन पासून विसर्जनापर्यंत सविस्तर माहिती; पूजा साहित्य आणि मुहूर्तही!

हा सगळा स्वयंपाक गौराईला नैवेद्य अर्पण करताना पुढील गोष्टी करा - 

सर्वप्रथम पाण्याने जमिनीवर छोटा चौकोन काढा, त्यालाच मंडल असे म्हणतात. हे मंडल म्हणजेच यज्ञ कुंडाचे प्रतीक आहे आणि त्यावर ठेवलेले नैवेद्याचे ताट म्हणजे आहुती असते. 

नैवेद्य समर्पण करण्याचा विधी व श्लोक :
नैवेद्याचे ताट वाढल्यावर तुलसीपत्र ताटातील पदार्थावर ठेवावीत व ताट दुसऱ्या ताटाने झाकावे. देवासमोर पाण्याने एक चौकोनी भरीव मंडल करावे व त्यावर एक पाट ठेवावा. त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे. डाव्या हातात पळी घेऊन, पळीतील पाण्याने  उजव्या हातात पाणी घेऊन ताटाभोवती शिंपडत फिरवावे. पाणी सिंचन करताना, 'सत्यं त्वर्तेन परिषिञ्चामि' हा मंत्र म्हणावा.  नंतर एक पळी ताम्हनात सोडावे आणि `अमृतोपस्तरणमसि' म्हणावे. त्यानंतर डाव्या हाताने नैवेद्याच्या ताटावरील झाकलेले ताट उचलून उजव्या हाताने आतील अन्नाचे पाच घास दाखवून आणखी एक सहावा घास दाखविताना लहान मुलास आई ताटातील भात प्रेमाने भरवते, तसा भरवावा. घास भरवताना म्हणावे...

पाचही बोटे वरील प्रकारे त्या त्या अंगुली एकत्र घेऊन ग्रासमुद्रा करावी. नैवेद्य दाखवून झाल्यावर एक पळी पाणी ताम्हनात सोडून 'प्राशनार्थे पानीयं समर्पयामि.'  असे म्हणून एका पेल्यात देवाला प्यायला पाणी ठेवायचे. नंतर पुन्हा सगळे ग्रास दाखवावे. शेवटी चार पळ्या पाणी ताम्हनात सोेडावे. पाणी सोडताना, 'अमृतापिधानमसि', `उत्तरापोशनं समर्पयामि', `हस्तप्रक्षालम् समर्पयामि', 'मुखप्रक्षालनं समर्पयामि' असे चा मंत्र म्हणावे. अत्तर असल्यास फुलाला लावून `करोद्वर्तनं समर्पयामि' म्हणत ते फूल देवास वहावे. अत्तर नसल्यास `करोद्वनार्थे चंदन समर्पयामि'' म्हणून ते फूल गंध लावून देवास वहावे. 

Gauri Pujan 2025: तुमच्या घरी गौरी गणपती असतील तर नैवेद्याच्या वेळी पडदा लावता ना? कारण...

सरतेशेवटी, देवाला आवाहन करून म्हणावे, 'तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे. इहलोकीची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे. तुझ्या कृपाशिर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसादत्त्व उतरू दे आणि ते अन्न भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे.' असा असतो नैवेद्यविधी. हे सर्व वाचताना जरी वेळ लागत असला, तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणांचा अवधी लागतो. तो वेळ जरूर काढावा. देवाशी क्षणभर संवाद साधावा. आपल्या आप्त-नातलगांना आपण जसा प्रेमळ आग्रह करतो, तसा देवाला करावा आणि त्याच्या आशीर्वादाने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे, याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी. आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला दोन वेळचे पोटभर जेवण मिळो, अशी प्रार्थना करावी. मगच तो प्रसाद ग्रहण करावा. 

Web Title: Gauri Pujan 2025: Before offering offerings to Gaurai, draw a water mandala under the plate and say 'Ha' mantra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.