Garbh Sanskar: बाळ सुखरूप जन्माला यावे, यासाठी गर्भ संस्कारात 'या' स्तोत्राचा समावेश करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 13:18 IST2024-12-03T13:17:53+5:302024-12-03T13:18:56+5:30

Garbha Sanskar: बाळ सुखरूप जन्माला यावे ही प्रत्येक आईची इच्छा असते, त्यासाठी या उपासनेची जोड लाभदायी ठरेल.

Garbh Sanskar: Include 'this' Stotra in Garbh Sanskar for a healthy baby! | Garbh Sanskar: बाळ सुखरूप जन्माला यावे, यासाठी गर्भ संस्कारात 'या' स्तोत्राचा समावेश करा!

Garbh Sanskar: बाळ सुखरूप जन्माला यावे, यासाठी गर्भ संस्कारात 'या' स्तोत्राचा समावेश करा!

गर्भारपणात सगळे आईची काळजी घेतात, पण आईला काळजी असते ती बाळाची! बाळ सुखरूप जन्माला यावे म्हणून ती देवाकडे प्रार्थना करते, आवश्यक ती सगळी काळजी घेते. याच उपचाराला जोड देता येते उपासनेची! रामरक्षा स्तोत्रामध्ये असे ११ श्लोक आहेत, जे आपल्या नखशिखांत देहाचे रक्षण करतात. म्हणून त्याला रामरक्षा कवच असे म्हणतात. बाळ सुखरूप जन्माला यावे, यासाठी गर्भ संस्कार करताना रोज या स्तोत्राचे पठण, श्रवण करायला हवे. जाणून घेऊया महत्त्व!

एके दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर कैलासावर गप्पा मारत बसले होते. त्यावेळेस माता पार्वतीने शिवशंकरांना विचारले, 'संपूर्ण मानवजातीच्या संरक्षणासाठी साधा सोपा मंत्र नाही का?'
भगवान शिवशंकर म्हणाले, 'आहे ना, तो मंत्र म्हणजे बुधकौशिक ऋषींनी लिहिलेले रामरक्षा कवच स्तोत्र! हे केवळ स्तोत्र नाही, तर आपल्या प्रत्येक अंगाचा उल्लेख करून त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी बुधकौशिक ऋषींनी श्रीरामावर सोपवली आहे. त्यातील मुख्य ११ श्लोक लक्षात घेतले, तर रामरक्षा हे कवच स्तोत्र कसे आहे, हे तुम्हालाही लक्षात येईल.' 

प्रख्यात निवेदिका धनश्री लेले सुंदर वर्णन करतात...

शिरो में राघवं पातु भालं दशरथात्मज: 

रघुकुळात जन्मलेल्या राघवा माझ्या डोक्याचे रक्षण कर. अजातशत्रू असलेल्या अयोध्या नगरीचा राजा दशरथ यांचा सुपूत्र होण्याचे भाग्य आपल्या भाळी घेऊन जन्माला आलेल्या राघवा माझ्या भालप्रदेशाचे अर्थात कपाळाचे रक्षण कर.

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रिय: श्रुती ।

आईच्या वात्सल्यभरल्या दृष्टीतून बाळाचे संगोपन होत असते, अशा माता कौसल्येच्या दृष्टीत सामावलेल्या राघवा माझ्या डोळ्यांचे रक्षण कर. विश्वामित्र ऋषी ज्या राघवाचा पराक्रम ऐकून त्याला धर्मकार्यार्थ घेऊन गेले, त्या राघवा माझ्या कानांचे रक्षण कर.

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल: ।

यज्ञ हे वैदिक हिंदू धर्माचे नाक आहे, ते ज्याने राखले, त्या राघवा माझ्या नाकाचे रक्षण कर. सौमित्रेचा पूत्र लक्ष्मण याच्या मुखाच ज्याचे नाव सदैव असे, अशा राघवा माझ्या मुखाचे रक्षण कर. 

जिव्हां विद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दित: 

विद्यासंपन्न व्यक्तीच्या जिभेवर वावरणाऱ्या राघवा, माझ्या जीभेचे रक्षण कर. रामाच्या वनवासाची वार्ता ऐकून ज्याने आक्रोश करत आपला आवाज गमावला, त्या भरताच्या प्रिय राघवा माझ्या कंठाचे रक्षण कर.

स्कन्धौ दिव्यायुध: पातु भुजौ भग्नेशकार्मुक:।

ज्याने आपल्या खांद्यावर दिव्य आयुधे धारण केली आहेत, त्या राघवा माझ्याही खांद्यांचे रक्षण कर. ज्याने केवळ शिवधनुष्यच नाही, तर परशुरामांचे विष्णूधनुष्यही भंग करून दाखवले, त्या राघवा माझ्या दोन्ही बाहुंचे रक्षण कर.

करौ सीतापति: पातु हृदयं जामदग्न्यजित ।

वज्राप्रमाणे कठीण देहधारी राघवाने नाजुक सुकोमल सीतेचे हात पाणीग्रहण करताना हाती घेतले, त्या राघवा आमच्याही हाताचे रक्षण कर. पृथ्वीवरून क्षत्रियांचा नि:पात करणाऱ्या परशुरामांचेही हृदय ज्याने जिंकून घेतले, त्या राघवा माझ्याही हृदयाचे रक्षण कर.

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रय: ।

नाशिकचे पंचवटी हे स्थान अयोध्या आणि श्रीलंका यांचा भौगोलिक मध्य असल्याचे आढळते, तिथे खर नावाच्या राक्षसाचा ज्याने वध केला, त्या राघवा माझ्या शरीराच्या मध्यभागाचे रक्षण कर. तसेच श्रीरामाच्या कृपेने जांबुवंताने हनुमानाला त्याच्या शक्तीचा परिचय करून नाभीस्थानी असलेले मणिपूर चक्र जागृत केले, त्या राघवा माझे मणिपूर चक्र कार्यन्वित कर आणि मलाही माझ्या सामर्थ्याची जाणीव होऊ दे.

सुग्रीवेश: कटी पातु सक्थिनी हनुत्मप्रभु: ।

आपले राज्य परत मिळाल्यावर संसारात रमलेल्या सुग्रीवाला सीताशोध मोहिमेची जाणीव करून देताना रामाने कटिबद्ध व्हायला सांगितले, त्या राघवा माझ्याही कटीप्रदेशाचे रक्षण कर. हनुमंताला उड्डाण घेण्यासाठी रामकृपेने जांघांमध्ये शक्ती देणाऱ्या राघवा माझ्याही जांघांचे रक्षण कर.

ऊरू रघूत्तम: पातु रक्ष:कुलविनाशकृत ।

राक्षसकुळाचा नाश करून रघुकुळाचा उद्धार करणाऱ्या राघवा माझ्या दोन्ही मांड्यांचे, पायाचे रक्षण कर.

जानुनी सेतकृत्पातु जंघे दशमुखान्तक: ।

ज्या अथांग सागरावर केवळ रामाचे नाव श्रद्धेने लिहून दगडाचा सेतू उभारला गेला, त्या राघवा माझ्या शरीराचा सेतू अर्थात शरीराचा वरचा आणि खालचा भाग ज्या गुडघ्यांनी जोडला गेला आहे, त्याचे रक्षण कर. रावणाला मारण्यासाठी एवढ्या दूरवर चालत आलेल्या राघवा, माझ्याही पोटऱ्यांमध्ये शक्ती दे.

पादौ विभीषणश्रीद: पातु रामोेखिलं वपु: ।

बिभीषणाला लंकेचे स्वामीत्त्व, राजलक्ष्मी देणाऱ्या राघवा माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण कर आणि सर्वांना आनंद देणाऱ्या राघवा माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण कर.

हे श्लोक म्हणजे सम्पूर्ण शरीराचे संरक्षण कवच आहे. ते रोज श्रद्धेने म्हटले, तर राम आपली रक्षा नक्कीच करतो. 

Web Title: Garbh Sanskar: Include 'this' Stotra in Garbh Sanskar for a healthy baby!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.