Bhalachandra Sankashti Chaturthi March 2026: मराठी वर्षाची सांगता होत आहे. १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा असून, श्री शालिवाहन शके १९४८ प्रारंभ होणार आहे. यंदाच्या संवत्सराचे नाव पराभव संवत्सर आहे. तत्पूर्वी, फाल्गुन महिन्यात शेवटची संकष्ट चतुर्थी व्रताचरण आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षात संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. फाल्गुन महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची सोपी पद्धत, चंद्रोदय झाल्यावर नेमके काय करावे, चंद्रदोय वेळ जाणून घेऊया....
गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! गणपती हाच सृष्टीचा निर्माण कर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे, असे सांगितले जाते. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. विघ्नहर्ता, सुखकर्ता गणपती बाप्पाची कृपा लाभावी, यासाठी विविध उपासना केल्या जातात. यामध्ये चतुर्थी व्रताचरण विशेष शुभ फलदायी मानले गेले आहे.
गणपती बाप्पाचे आभार माना, कृतज्ञता व्यक्त करा
कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण, पूजनाने केली जाते. जे कार्य हाती घेतलेले आहे, ते निर्विघ्नपणे पार पडावे, अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी, यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. मराठी वर्षातील ही शेवटची फाल्गुन संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आवर्जून व्रत करावे आणि वर्षभरात बाप्पाने आपल्यावर केलेल्या कृपेसाठी कृतज्ञता व्यक्त करावी, असे सांगितले जात आहे.
संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणालाही करता येते
संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणालाही करता येते. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. गेली हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात अगदी निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. शुक्रवार, ०६ मार्च २०२६ रोजी फाल्गुन संकष्ट चतुर्थी आहे.
फाल्गुन संकष्ट चतुर्थीचा व्रत पूजा विधी
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे.
संकष्ट चतुर्थी व्रतात चंद्रोदय झाल्यावर काय करावे?
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. संकष्टीच्या दिवशी गणेशाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते. अगदी काहीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते.
संकष्ट चतुर्थीला ‘या’ गोष्टी आवर्जून कराच
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला एक दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी. शक्य असेल तर २१ दुर्वांची जोडी अर्पण करावी. असे केल्यास बाप्पा प्रसन्न होतो. सुख-समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात, असे म्हटले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले अवश्य वाहावीत. असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन शुभाशिर्वाद देतो, असे म्हटले जाते.
फाल्गुन संकष्ट चतुर्थी मार्च २०२६ विविध शहरांतील चंद्रोदय वेळ (Sankashti Chaturthi March 2026 Moon Rise Time)
| शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
| मुंबई | रात्रौ ०९ वाजून १९ मिनिटे |
| ठाणे | रात्रौ ०९ वाजून १८ मिनिटे |
| पुणे | रात्रौ ०९ वाजून १४ मिनिटे |
| रत्नागिरी | रात्रौ ०९ वाजून १५ मिनिटे |
| कोल्हापूर | रात्रौ ०९ वाजून ११ मिनिटे |
| सातारा | रात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे |
| नाशिक | रात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे |
| अहिल्यानगर | रात्रौ ०९ वाजून ११ मिनिटे |
| धुळे | रात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे |
| जळगाव | रात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे |
| वर्धा | रात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे |
| यवतमाळ | रात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे |
| बीड | रात्रौ ०९ वाजून ०७ मिनिटे |
| सांगली | रात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे |
| सावंतवाडी | रात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे |
| सोलापूर | रात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे |
| नागपूर | रात्रौ ०८ वाजून ५५ मिनिटे |
| अमरावती | रात्रौ ०९ वाजून ०० मिनिटे |
| अकोला | रात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे |
| छत्रपती संभाजीनगर | रात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे |
| भुसावळ | रात्रौ ०९ वाजता ०९ मिनिटे |
| परभणी | रात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे |
| नांदेड | रात्रौ ०९ वाजून ०० मिनिटे |
| धाराशीव | रात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे |
| भंडारा | रात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे |
| चंद्रपूर | रात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे |
| बुलढाणा | रात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे |
| मालवण | रात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे |
| पणजी | रात्रौ ०९ वाजून ११ मिनिटे |
| बेळगाव | रात्रौ ०९ वाजून ०९ मिनिटे |
| इंदौर | रात्रौ ०९ वाजून १० मिनिटे |
| ग्वाल्हेर | रात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे |
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥
Web Summary : Observe Falgun Sankashti Chaturthi on March 6, 2026, with devotion. Express gratitude to Lord Ganesha. Follow the vrat vidhi, offer Durva, and break your fast after moonrise. Check city-wise moonrise timings.
Web Summary : 6 मार्च, 2026 को फाल्गुन संकष्टी चतुर्थी का व्रत भक्तिपूर्वक करें। भगवान गणेश के प्रति कृतज्ञता व्यक्त करें। व्रत विधि का पालन करें, दुर्वा अर्पित करें और चंद्रोदय के बाद व्रत तोड़ें। शहर के अनुसार चंद्रोदय का समय देखें।