Sant Eknath Maharaj Shashti 2026: महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. सगळ्याच संतांची शिकवण कालातीत आहे. इतकी वर्षे लोटूनही संतांनी समाजाला केलेला उपदेश आजच्या काळातही किती तंतोतंत लागू पडतो, याची प्रचिती येत असते. मराठी वर्षातील शेवटचा फाल्गुन महिना. या फाल्गुन महिन्यातील वद्य षष्ठीला संत एकनाथ महाराजांनी समाधी घेतली. त्यामुळे ही फाल्गुन वद्य षष्ठी तिथी एकनाथ षष्ठी म्हणून ओळखली जाते. यंदा, सोमवार, ०९ मार्च २०२५ रोजी फाल्गुन वद्य संत एकनाथ षष्ठी आहे. काही मान्यतांनुसार, संत एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वर माऊलींचे कार्यावतार म्हटले जाते.
शांतिब्रह्म सद्गुरु श्रीसंत एकनाथ महाराजांच्या चरित्रात या फाल्गुन वद्य षष्ठी तिथीला खूप महत्त्व आहे. हिला "पंचपर्वा षष्ठी" म्हणतात. संत एकनाथांचे सद्गुरु श्री जनार्दन स्वामींची जन्मतिथी, त्यांना भगवान श्रीदत्तप्रभूंकडून अनुग्रह व त्यांचे महानिर्वाण या तिन्ही गोष्टी याच तिथीला झालेल्या आहेत. शिवाय नाथ महाराजांची व श्री जनार्दन स्वामींची प्रथम भेट व त्यांना कृपानुग्रह याच तिथीला लाभला. म्हणूनच त्यांनी हीच पवित्र तिथी निवडून गोदावरीमध्ये जलसमाधी घेतली. असा दुर्मिळ योग पाहायला मिळत नाही.
ज्ञानियाचा एका, नामयाचा तुका
नाथ महाराज म्हणजे साक्षात् परमशांतीच! त्यांना भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचेच कार्यावतार म्हणतात, असे मानले जाते. म्हणून "ज्ञानियाचा एका, नामयाचा तुका" अशी म्हण संप्रदायात प्रचलित आहे. "नारायण विधी अत्रिनाथ, दत्त जनार्दन एकनाथ।" अशी त्यांची श्रीगुरुपरंपरा होय. त्यांना भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी स्वमुखाने 'ज्ञानदेव' हा चतुराक्षरी महामंत्र प्रदान केलेला होता. श्रीदत्त संप्रदाय व वारकरी संप्रदायाचा सुंदर समन्वय त्यांच्याठायी झालेला होता. अर्थात हे दोन्ही संप्रदाय मुळात एकाच भागवत संप्रदायाचे विभाग आहेत. श्रीसंत नाथ महाराजांचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे श्रीज्ञानेश्वरीची प्रतिशुद्धी हे होय. ज्ञानेश्वरीच्या संहितेत कालौघात घुसलेले व घुसवलेले अपपाठ शोधून काढून त्यांनीच प्रथम प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरीची तयार केली. हे त्यांचे आपल्यावरील फार मोठे ऋण आहे. श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या मुख्य मंदिरासमोरील कृष्णामाईचा घाट स्वत: श्रीसंत नाथ महाराजांनीच बांधलेला आहे.
भावार्थ रामायण, एकनाथी भागवत इत्यादी सर्व ग्रंथ मिळून एकूण लाखभर ओव्या व चार हजार पेक्षा जास्त अभंग, भारुडे, आरत्या असे प्रचंड वाङ्मय त्यांनी सहज लीलेने प्रकट केलेले आहे. त्यांचे अवघे चरित्र अत्यंत आदर्श असून नित्य स्मरणीय, चिंतनीय व अनुकरणीय आहे. साक्षात् भगवान पंढरीनाथ त्यांच्या घरी 'श्रीखंड्या' च्या रूपाने सेवा करीत होते, यातच सगळे आले. श्रीसंत तुकाराम महाराज शांतिब्रह्म श्री नाथ महाराजांची स्तुती करताना म्हणतात की,
शरण शरण एकनाथा ।पायीं माथा ठेविला ॥१॥
नका पाहूं गुणदोष ।झालों दास पायांचा ॥२॥
उपेक्षितां मज ।तरी लाज कवणासी ॥३॥
तुका म्हणे भागवत ।केलें श्रुत सकळां ॥४॥
Web Summary : Sant Eknath Maharaj, who took Samadhi on Falgun Vadya Shashti, is considered the incarnation of Dnyaneshwar. He purified Dnyaneshwari, composed numerous works, and exemplified devotion, with Lord Pandharinath serving him. Tukaram Maharaj praises Eknath's greatness.
Web Summary : संत एकनाथ महाराज, जिन्होंने फाल्गुन वद्य षष्ठी पर समाधि ली, ज्ञानेश्वर के अवतार माने जाते हैं। उन्होंने ज्ञानेश्वरी को शुद्ध किया, कई रचनाएँ कीं, और भक्ति का उदाहरण दिया, भगवान पंढरीनाथ ने उनकी सेवा की। तुकाराम महाराज एकनाथ की महानता की स्तुति करते हैं।