Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 14:24 IST2025-12-19T14:23:23+5:302025-12-19T14:24:10+5:30
Shirdi Sai Baba Donation News: देश-विदेशातील लाखो भाविकांची साईबाबांवर अढळ श्रद्धा आहे. भाविकांकडून साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण केले जाते.

Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
Sai Baba Shirdi News: शिर्डीचे साईबाबा हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. दररोज हजारो भक्त साईबाबांच्या चरणी लीन होतात. साईबाबांच्या कृपावर्षावाचा अनेकांना अनुभव आला आहे. साईबाबा मंदिरात भाविकांची रेलचेल सुरूच असते. या मंदिरात मोठ्या प्रमाणावर दानही दिले जाते. अलीकडेच एका भाविकाने लाखो रुपये खर्चून एका खिडकीला सोन्याचा मुलामा दिला आहे. त्यामुळे या सोन्याच्या खिडकीतून आता साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे. सर्व भाविकांना याचा लाभ होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साईबाबा संस्थानाला देश-विदेशातील साईभक्त मोठ्या श्रद्धेने विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. मार्गशीर्ष गुरुवारी एका भाविकाने साईबाबांच्या चरणी मोठे दान दिले आहे. दुबई येथे स्थायिक झालेल्या एका साईभक्ताने मंदिराच्या खिडकीला अर्थात ज्या खिडकीतून साईबाबांचे मुख दर्शन होते, त्याठिकाणी असलेल्या खिडकीला आकर्षक अशी सोन्याचा मुलामा असलेली फ्रेम बनवून त्यावर ‘श्रद्धा सबुरी’ ही सुवर्णअक्षरे देणगी स्वरूपात दिली आहे.
शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर आता ‘सुवर्ण मंदिर’
आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर आता ‘सुवर्ण मंदिर’ म्हणून जगाच्या नकाशावर झळकू लागले आहे. साई मंदिराच्या उत्तर बाजूस असलेल्या खिडकीस चारही बाजूंनी आकर्षक नक्षीकाम व सोन्याचा मुलामा असलेली सुंदर फ्रेम दुबईतील भाविकाने अर्पण केली आहे. या खिडकीतून साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीचे दर्शन होत असल्याने दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी मुख दर्शनासाठी येतात. या ठिकाणी फ्रेमवर करण्यात आलेले सुवर्ण नक्षीकाम भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या फ्रेमची किंमत ५५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
नाव गोपनीय ठेवण्याची विनंती मान्य
भाविकांनी दिलेल्या या दानातून साईबाबांच्या मंदिरात प्रत्येक वस्तू सोन्याची झाल्याचे म्हटले जात आहे. या कामाच्या प्रारंभी विधिवत पूजा करण्यात आली. साईभक्ताच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. संबंधित साई भक्ताचा साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. दुसरीकडे, आणखी एका भाविकाने साईबाबांच्या चरणी २०० ग्रॅम वजनाचा आकर्षक व सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट भक्तिभावाने अर्पण केला. या कलात्मक सुवर्ण मुकुटाची किंमत अंदाजे २० लाख १६ हजार रुपये आहे. सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करून तो साईबाबा संस्थानच्या ताब्यात दिला. दोन दिवसांपूर्वी अहमदाबाद येथील एका भाविकाने साईबाबांच्या चरणी १०२.४५० ग्रॅम वजनाची सोन्याची गणेश मूर्ती अर्पण केली. या मूर्तीची किंमत १२ लाख ३९ हजार रुपये आहे.
साई मंदिरात कोणकोणत्या वस्तू सोन्याच्या आहेत?
साईबाबांच्या चरणी भाविकांनी सोनेरी सिंहासन, सोनेरी समाधी, सोनेरी गाभारा, सोनेरी श्रद्धा सबुरी अक्षरे, सोनेरी हिरेजडित अनेक मुकुट, सोनेरी पादुका, द्वारकामाई मंदिरात दोन ठिकाणी सोनेरी पादुका, गुरुस्थान मंदिरात सोनेरी पादुका, बाबांच्या फोटोची सुवर्ण फ्रेम, पादुकांचे सुवर्ण स्टँड, आरतीच्या वेळी पूजा साहित्य तथा सोनेरी ताट, ताटातील वाटी, तांब्या हे सुद्धा सोन्याचेच, घंटी सोन्याची, उदबत्ती स्टैंड सोन्याचे आणि मंदिराचा कळसही सोन्याचा तर बाबांचा रथ आणि सोन्याची पालखीही दान केली आहे.