Diwali 2025 Abhyanga Snan: दिवाळीची पहिली आंघोळ साबणाने की उटण्याने? काय आहे अभ्यंग स्नानाचे महत्त्व? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 16:26 IST2025-10-14T07:00:00+5:302025-10-18T16:26:38+5:30
Diwali 2025 Abhyanga Snan: १७ ऑक्टोबर पासून दिवाळी सुरू होत आहे आणि पहिली आंघोळ २० ऑक्टोबर रोजी असणार आहे, त्यानिमित्त पारंपरिक पद्धत जाणून घ्या.

Diwali 2025 Abhyanga Snan: दिवाळीची पहिली आंघोळ साबणाने की उटण्याने? काय आहे अभ्यंग स्नानाचे महत्त्व? वाचा!
Diwali 2025 Abhyanga Snan: सध्याचे जग हे जाहिरातीचे आहे. केवळ उत्पादनाला नाही तर माणसांनाही स्वत:ची जाहिरात करावी लागत आहे. असो! पण जाहिरातींचा आपल्या मनावर एवढा पगडा असतो की आपण पारंपरिक गोष्टी त्यागून 'जे नवे ते हवे' हे समीकरण मनाशी बांधून मोकळे होतो. त्यासाठी ही माहिती.
दिवाळीत पहिली अंघोळ अर्थात अभ्यंगस्नानासाठी आपण निरनिराळी उटणं तसेच प्रचलित जाहिरातींचे साबण, सुगंधी तेल, सुगंधी अत्तर यांची खरेदी करतो. मात्र शास्त्रानुसार सुगंधी आणि नैसर्गिक उत्पादनांचा वापर असलेले उटणे वापरणे हितावह ठरते. याज्ञीकी करणारे पेणचे सागर सुहास दाबके यासंदर्भात माहिती देतात -
बाजारात मिळणाऱ्या उटण्याला पर्याय फार तर सुगंधी तेलाचा. मात्र त्याऐवजी रासायनिक प्रक्रिया केलेले सुगंधी तेल अजिबात वापरू नये. कारण त्यामध्ये पॅराफीन अर्थात क्रूड ऑइल असते. त्यापेक्षा साधं खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल घ्या आणि त्यात भीमसेनी कापूर, घवला काचरी, वाळा, गुलाब पाकळ्या वगैरे घालून ते उकळून शरीराला अभ्यंग करा. किंवा नुसतं तीळ तेल लावलं तरी चालेल. अंगावर मुरलेलं तेल काढण्यासाठी नारळाच्या दुधात कालवलेलं उटणं लावून शरीर घासा.
उटणे लावून झाल्यावर साबण का टाळावा? तर, शास्त्रात तिलामलककल्क असा उल्लेख आहे. म्हणजे काळे तीळ आणि आवळा एकत्र वाटून त्याचा जो लगदा होतो त्याने अंगाला चांगले मर्दन करावे. दिवाळीच्या सुमारास थंडी सुरू होते. अशा वेळी त्वचा रुक्ष पडते. म्हणून काळे तीळ, आवळा, तिळाचे किंवा नारळाचे तेल, दूध यांचा पर्याय सुचवला आहे. कारण हे नैसर्गिक घटक त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहेत.'

यानिमित्ताने अभ्यंग स्नानामागील पौराणिक कथाही जाणून घेऊ -
नरकचतुर्दशी या दिवशी पहाटे भगवान कृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. हा एक राजा होता आणि त्याने स्त्रियांना बंदी करून आपल्या कैदेत ठेवले होते. त्याच्या वधानंतर कृष्णाने या स्त्रियांची सुटका केली. नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कुणी या दिवशी सकाळी मंगलस्नान करेल त्याला नरकाची बाधा होऊ नये. कृष्णाने त्याला वर दिला. त्यानुसार नरकात जाण्यापासून मानवाला वाचविणारे पवित्र आणि मंगल स्नान या दिवशी पहाटे करण्याची पद्धती प्रचलित आहे.
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
अभ्यंग स्नानाचे फायदे :
शरीराची कांती तजेलदार व्हावी, स्नायू बलवान आणि पुष्ट व्हावेत यासाठी हे स्नान केले जाते. आरोग्याची काळजी हा याचा प्रमुख हेतू मानला जातो. अभ्यंगस्नान हे केवळ दिवाळीच्या दिवशी करू नये तर त्या दिवसापासून सुरुवात करून ते वर्षभर रोज करावे असे आयुर्वेदाचे अभ्यासक सांगतात.
गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!