Diwali 2025 Laxmi Devi Idol Rules: आनंदाचा, सुख-समृद्धीचा सण म्हणजे दिवाळी. वसुबारस ते भाऊबीज या कालावधीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या दीपोत्सवात सर्व दिवसांचे महत्त्व वेगळे आहे. दिवाळीत धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाचे दिवस विशेष महत्त्वाचे मानले जातात. दिवाळीत लक्ष्मी पूजनावेळी अनेक जण लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा प्रतिमा आणतात. दिवाळीत होणाऱ्या लक्ष्मी पूजनाला अनन्य साधारण महत्त्व आणि महात्म्य असल्याचे म्हटले जाते.
दिवाळीला करण्यात येणाऱ्या लक्ष्मी पूजनावेळी स्थापन करावयाची लक्ष्मी देवी आणि गणपती बाप्पाची मूर्ती याच दिवशी घरात आणण्याची प्राचीन परंपरा प्रचलित आहे. लक्ष्मीपूजनासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या देवीच्या मूर्तीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात. यामध्ये लक्ष्मी देवीची मूर्ती कशी असावी, कशी नसावी, त्याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात, त्यातून काय लाभ किंवा फायदे मिळू शकतात, याबाबत जाणून घेऊया...
दिवाळी २०२५ मध्ये लक्ष्मी पूजन कधी?
मंगळवार, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन अमावास्येला लक्ष्मी पूजन आहे. सायंकाळी ०५ वाजून ५४ मिनिटांनी अमावास्या समाप्त होत आहे. लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त सायंकाळी ०६ वाजून १० मिनिटे ते रात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे असा आहे. या निमित्ताने अष्टदल कमलावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे व वैभवाचे प्रतीक आहे. संयमपूर्वक धन संपादन केले, तर मनुष्याचे कल्याण होते. यासाठी धनलक्ष्मीची या दिवशी पूजा करायची असते. अश्विन अमावास्येला लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, मांगल्य, प्रकाश आढळेल, तेथे ती निवास करते अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्याची रोषणाई करतात. घरातील कचरा घाण म्हणजे अलक्ष्मी दूर करणारी केरसुणी हिला लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याची चाल काही ठिकाणी आहे.
लक्ष्मी देवीची मूर्ती कशी असावी?
धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनावेळी केवळ लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा तसबीर स्थापन करू नये. लक्ष्मी देवीची नेहमी गणपती बाप्पा किंवा सरस्वती देवीसोबतच पूजा करावी. असे केल्याने व्यक्तीला धन आणि विद्या दोन्हीची प्राप्ती होऊ शकेल. तसेच लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांचे एकत्रितरित्या केलेले पूजन अत्यंत कल्याणकारी ठरू शकते. लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा तसबीर नेहमी हसमुख स्वरुपाची असावी. लक्ष्मी देवीची क्रोध मुद्रा असलेली मूर्ती किंवा तसबीर कधीही घरी आणू नये. असे केल्याने मोठा तोटा तसेच आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
लक्ष्मी देवीची मूर्ती कशी नसावी?
दिवाळीत लक्ष्मी देवीची मूर्ती घरी आणताना काही गोष्टींचे भान ठेवले गेले पाहिजे, असे सांगितले जाते. लक्ष्मी देवीची मूर्ती नेहमी बसलेल्या स्वरुपात असावी. लक्ष्मी देवी उभ्या स्वरुपात असता कामा नये. अन्यथा अधिक नुकसान, तोटा होऊ शकतो. लक्ष्मी देवीची प्रतिमा घरात आणायची असेल, तर लक्ष्मी हातातून धनवर्षा होत असलेल्या स्वरुपाला प्राधान्य द्यावे. मात्र, लक्ष्मी देवीच्या हातातून पडणारी सोन्याची नाणी एखाद्या पात्रात पडतानाची प्रतिमा असावी. लक्ष्मी देवीच्या हातातून पडणारी सोन्याची नाणी जमिनीवर पडताहेत, अशा स्वरुपाची लक्ष्मी देवीची प्रतिमा नसावी. सोन्याची नाणी पडतानाच्या लक्ष्मी देवीच्या प्रतिमेमुळे आपल्याला होणाऱ्या धनलाभाचे प्रमाण वाढू शकते, असे सांगितले जाते.
लक्ष्मी देवीसह गणपती बाप्पा पूजनाला महत्त्व
दिवाळीत धनत्रयोदशीला लक्ष्मी देवीसह गणपती बाप्पा असलेल्या प्रतिमेला प्राधान्य द्यावे. तसेच या प्रकारच्या प्रतिमेत श्रीगणेश लक्ष्मी देवीच्या उजव्या हाताला बसलेले असावेत. लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णूंच्या प्रतिमेत लक्ष्मी देवी श्रीविष्णूंच्या डाव्या बाजूस असावी, याचे भान ठेवावे. सर्वांना सोने-चांदीची मूर्ती घरी आणणे शक्य नसते. अशावेळी पितळ किंवा अष्टधातूची मूर्ती घरी आणावी. असे केल्यास लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद मिळतात. धन-धान्याची कमतरता भासत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
लक्ष्मी देवीची स्थापना करण्याची योग्य दिशा कोणती?
देशभरात बहुतांश ठिकाणी धनत्रयोदशीपासूनच दिवाळीची विविध व्रते, पूजनाला सुरुवात होते. दिवाळीतील सर्वाधिक महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. वास्तुशास्त्रात, कोणत्याही देवतेचे पूजन करताना त्याची योग्य दिशा कोणती असावी, याबाबत सविस्तर विवेचन केल्याचे पाहायला मिळते. दिवाळीत लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवी, सरस्वती आणि गणपती यांची स्थापना केली जाते. पूजनावेळी लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांची मूर्ती किंवा प्रतिमा उत्तर दिशेला स्थापन करावी, असे सांगितले जाते.
दिवाळीत सुख, समृद्धीत वृद्धी यासाठी काय कराल?
दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडुची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जून लावावे. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडावे. दिवाळीतील लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदूराचा वापर करून स्वस्तिक काढावे. स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक चिन्हामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. सुख, समृद्धीत वृद्धी होते, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
Web Summary : Diwali 2025: Follow rules for Lakshmi idol placement for prosperity. Use smiling idols, place with Ganesha/Saraswati in the North. Avoid standing idols for wealth.
Web Summary : दिवाली २०२५: समृद्धि के लिए लक्ष्मी मूर्ति स्थापना के नियमों का पालन करें। मुस्कुराती हुई मूर्तियों का प्रयोग करें, गणेश/सरस्वती के साथ उत्तर में रखें। धन के लिए खड़ी मूर्तियों से बचें।