Diwali 2021 : नरकासुराने मृत्यूपूर्वी श्रीकृष्णाजवळ कोणता वर मागितला होता? सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 11:25 AM2021-11-02T11:25:37+5:302021-11-02T12:15:18+5:30

Diwali 2021 : नरकासुराच्या वधाची रोचक कथा आणि नरक चतुर्दशी साजरी कशी करावी याची सविस्तर माहिती!

Diwali 2021: Which promise Narakasura asked Lord Krishna before his death? Read more! | Diwali 2021 : नरकासुराने मृत्यूपूर्वी श्रीकृष्णाजवळ कोणता वर मागितला होता? सविस्तर वाचा!

Diwali 2021 : नरकासुराने मृत्यूपूर्वी श्रीकृष्णाजवळ कोणता वर मागितला होता? सविस्तर वाचा!

googlenewsNext

अश्विन वद्य चतुर्दशीस 'नरक चतुर्दशी' म्हणतात. सर्वांना पीडणाऱ्या नरकासुराचा भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी संहार केला. म्हणून या तिथीला `नरक चतुर्दशी' हे नाव पडले. मरताना नरकासुराने भगवंताकडे वर मागितला की, `माझा हा मृत्यूदिन सर्वत्र दिवे लावून साजरा व्हावा आणि या दिवशी जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये!' कृष्णाने त्याला `तथास्तु' म्हटले. तेव्हापासून श्रीकृष्णाचा विजयोत्सव आणि नरकासुराचा वध दिवे लावून साजरा केला जातो. 

या दिवशी सूर्योदयापूर्वी मंगलस्नान व दीप लावून आनंदोत्सव साजरा केला जाऊ लागला. तसेच नरकासुराच्या नि:पाताचे प्रतीक म्हणून कारिटाचे फळ चिरडतात आणि त्याचा रस जिभेला लावतात. नरकासुराची शेणमातीची प्रतिमा करून त्यावर घरादारातील कचरा टाकून जणू काही दुष्ट प्रवृत्तीचा निषेध करतात. 

या दिवशी घरातील देवांनादेखील पंचामृतस्नान व अभिषेक करून अत्तर लावून उष्णोदकाने स्नान घालतात आणि देवपूजाही सूर्योदयाच्या आत करतात. गोड पक्वान्नाचा नैवेद्य दाखवतात. पणत्याही पहाटेच लावतात. सर्वत्र सुख समृद्धी यावी म्हणून अंगणात दोन, तुळशीपुढे एक, पाण्याजवळ एक, देवाजवळ एक पणत्या लावतात. या दिवशी केरसुणी आणि मीठाचीही पूजा केली जाते. कारण हे दोन्ही लक्ष्मीचे अंश मानले जातात. जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी! म्हणून दिवाळीआधी साफसफाई करून घर लख्ख करतात आणि लक्ष्मीपूजा करून लक्ष्मीला प्रसन्न करून घेतात. 

या दिवशी अमावस्या असल्याने पितृतर्पणही केले जाते. एक दिवा पितरांसाठी लावला जातो. दुपारच्या जेवणाचे वेळी कावळ्याला, गायीला, कुत्र्याला नैवेद्य अर्पण केला जातो. 

नरक चतुर्दशीला नवे कपडे घालून आप्त स्वकीयांची गाठभेट घेतली जाते. फराळाला बोलावले जाते. पाहुणचार केला जातो. अलीकडे दिवाळी पहाट या निमित्ताने सुरेल गाण्यांची मैफल रंगते. फटाके, आतषबाजी, रंग रांगोळ्या, मिठाई, आनंद आणि थंडीची चाहूल या वातावरणामुळे दिवाळीची रंगत आणखीनच चढत जाते. 

असा हा दिवाळीचा रंग, गंध, स्पर्श अनुभवूया आणि आपल्या आतील आणि बाहेरील नरकासूराच्या दुष्ट प्रवृत्तीला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करूया. जेणेकरून प्रत्येक दिवस आनंदाचा, मांगल्याचा आणि चैतन्याचा साजरा करता येईल. नाही का?

Web Title: Diwali 2021: Which promise Narakasura asked Lord Krishna before his death? Read more!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.