‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ मंत्र आपण नेहमी म्हणतो; पण, याचा नेमका अर्थ काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 10:56 IST2025-01-04T10:56:09+5:302025-01-04T10:56:30+5:30
Dattaguru Mantra Meaning: ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, हा महामंत्र मानला गेला असून, त्याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या...

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ मंत्र आपण नेहमी म्हणतो; पण, याचा नेमका अर्थ काय?
Dattaguru Mantra Meaning: भगवान श्रीदत्तप्रभू हे साक्षात् परिपूर्ण परब्रह्म आहेत. जगन्नियंत्या श्रीभगवंतांचे अभिन्न गुरुस्वरूप म्हणजे श्रीदत्तप्रभू. म्हणूनच त्यांना 'जगद्गुरु' म्हणतात. शरणागत वत्सल अशी दत्त महाराजांची ख्याती आहे. श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भूत आहे. श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितीचा निर्देशक आहे. तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे म्हटलेले आहे.
संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे प्रमुख वैशिष्ट्य मानले गेले आहे. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा महामंत्र मानला गेला असून, कोट्यवधी भाविक, भक्तगण असंख्यवेळा या मंत्राचे पठण, जप करत असतात. या महामंत्राचा अर्थ अद्भूत असाच आहे.
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या मंत्राचा नेमका अर्थ काय?
या मंत्रामध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी- त्याचे अनुसंधान. मी देह नाही. मी आहे आत्मा. तो आत्मा म्हणजे शुद्ध अहम्. तो साक्षी आहे. निर्विकार आहे. आनंद, अनंतरूप आहे. पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहम् ला हाक मारली आहे. दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान केले आहे. आपल्या भोवती जे सर्वही विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे. वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहे, परब्रह्मच आहे. परब्रह्मानेच ही अनेक भासणारी रुपे धारण केली आहेत. त्या परब्रह्माला दुसऱ्या दिगंबरा शब्दाने हाक मारली आहे. श्रीपादवल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपादवल्लभांना हाक मारली आहे. श्रीपादवल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहेत. ते भगवंताचेच अवतार आहेत. त्यांना संबोधन केले आहे. चौथ्या दिगंबरा या शब्दाने प्रार्थना केली आहे. माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा. मला लवकर आपल्या जवळ न्या. आपले स्वरुप मला प्राप्त होऊ द्या. मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे. तो भ्रम नाहीसा करा. अहं ब्रम्हास्मि हा अनुभव मला येऊ द्या. आपल्या सारखी दिगंबर स्थिती मलाही द्या. अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा शब्दांत असल्याचे सांगितले जाते.
दत्त म्हणजे ‘आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा.
‘दिगंबर’ म्हणजे अंबररूपी व्याप्त प्रकाशात, म्हणजेच मोक्षात विलीन होईपर्यंत, म्हणजेच गंतरात जाईपर्यंत निरंतर साथ देणारे तत्त्व.
‘श्रीपाद’मधील ‘श्री’ म्हणजे ईश्वराचे अविनाशी तत्त्व.अशा ईश्वररुपी अविनाशी तत्त्वाच्या, म्हणजेच ‘श्री’ तत्त्वाच्या चरणांपर्यंत नेणारे तत्त्व, म्हणजे श्रीपादरूपी दत्ततत्त्व.
‘वल्लभ’ म्हणजे भय निर्माण करणार्या वलयांकित त्रासदायक लहरींपासून ब्रह्मांडाचे रक्षण करून जिवांना अभय देणारे तत्त्व, म्हणजे वल्लभरूपी दत्ततत्त्व.
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।