Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 10:26 IST2025-07-23T09:39:51+5:302025-07-23T10:26:04+5:30

Deep Amavasya 2025 Puja Vidhi: २४ जुलै रोजी घरातले दिवे उजळून, त्यांची पूजा करून येणार्‍या श्रावणाचे स्वागत करायचे आहे, तर पूजा विधिवतच झाली पाहिजे ना? सविस्तर वाचा.

Deep Amavasya 2025: Light lamps on Deep Amavasya and perform 'this' scriptural worship and aarti! | Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या

Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या

>> मकरंद करंदीकर 

२४ जुलै  रोजी दीप अमावास्या (Deep Amavasya 2025) आहे. दिवे उजळून, त्यांची पूजा करून आपण दिव्यांची आवस साजरी करणार आहोत. त्यासाठी जाणून घेऊया शास्त्रोक्त पूजा विधी!

दीप अमावस्या पूजा विधी: दीप अमावास्येच्या  दिवशी घरातील दिवे घासून पुसून ते एका पाटावर मांडावेत. घरात खूपच दिवे असतील तर नेहेमीच्या पूजेतील, कुटुंबात वंशपरंपरागत असलेले, असे काही महत्वाचे दिवे पूजेसाठी ठेवावेत. शक्यतो प्रत्येक दिव्याखाली छोटी ताटली ठेवावी म्हणजे ओघळणारे तेल त्यात जमा होते. पाटाखाली छोटीसी तरी रांगोळी काढावी. पाट नसल्यास केळीच्या पानावर  दिव्यांची स्थापना करावी. त्यांना हळदीकुंकू, फुले वाहून नैवेद्य दाखवावा. नैवेद्यासाठी दूधसाखर, दुधगूळ, लाह्या बत्तासे, पेढे, फळे असे काहीही चालते. उदबत्ती व निरांजन लावून ओवाळावे ( पूजा करावी ). 

Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...

दिव्यांसाठी जोड वात : दिव्यांमध्ये वाती या कापसाच्या असाव्यात आणि शक्यतो जोड वात लावावी. जीवा-शिवाच्या एकरूपतेचे, अद्वैताचे प्रतीक म्हणून, जोडा सलामत राहावा म्हणून अशी याची कारणे सांगितली जातात. परंतु शास्त्रीय कारण असे की दोन वातींमुळे केशाकर्षण ( कॅपिलरी ऍक्शन ) योग्य प्रकारे होऊन, ज्योतीला तेलाचा अखंड पुरवठा होतो आणि दिवा नीट तेवत राहतो. अशा प्रकारे दीपपूजा झाल्यावर दिव्याची पौराणिक कहाणी वाचावी. 

दिव्याला नैवेद्य : दिव्यांचे तोंड / मुख म्हणजे त्याच्या वाती!  हे तोंड  गोड करण्यासाठी या वाती खडीसाखरेच्या खड्याने पुढे सरकवतात आणि नंतर त्या उजळतात (पेटवितात). कांही जण प्रत्येक वातीच्या मुखाशी, साखरेचे ४ / ५ दाणे ठेवतात. या दिवशी अनेक समाजात, प्रदेशनिहाय काही खास पक्वान्न करण्याची एक  छान खाद्य संस्कृती महाराष्ट्रात आहे. विविध घरांमध्ये परंपरेनुसार खीर पुरण, उकडीचे मोदक, उकडीचे  दिवे कणकेचे गोड दिवे, मुरड कानवले, दिंड पुरण इत्यादी पक्वान्ने केली जातात. अशा खास पक्वान्नांचा नैवेद्य दाखवतात. मुले म्हणजे वंशाचे दिवे ! ( मुलगे आणि मुली देखील) म्हणून काहीं ठिकाणी मुलांचे औक्षण केले जाते, त्यांना ओवाळले जाते.

Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...

सायंकालीन पूजा :  सायंकाळी सर्व दिवे उजळून ( पेटवून ) आरती करावी. आरतीपुरते घरातील विजेचे लहानमोठे सर्वच्या सर्व  दिवे चालू ठेवावेत. बाहेर काळोख, पाऊस, थंड हवा आणि घरात उजळलेले सर्व प्रकारचे सर्व दिवे पाहून खूप प्रसन्न वाटते. या सर्व गोष्टी करतांना तुमची एखादी चूक झाल्यास फार काही बिघडत नाही. देवाला तुमची मनोभावे केलेली भक्ती हवी असते. तुमची चूक झाली तर तो तुम्हाला ठोकून काढीत नाही. त्यामुळे सण आनंदाने आणि श्रद्धेने साजरा करावा, दडपणाने, भीतीने करू नये.  तसेच सोबत दिलेली दिव्यांची नावे घ्यावीत!. 

Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!

दिव्यांची/ निरंजनाची आरती : प्रत्येक पूजेमध्ये आपण देवासमोर निरांजन ओवाळून आरती करतो. परंतु दीप अमावस्या हा सण दिव्यांचा, म्हणून या दिवशी दिव्यांची आरती म्हणून पूजेची सांगता करावी. 

पंचप्राणांचे निरांजन करुनी, पंचतत्त्वे वाती परिपूर्ण भरुनी।
मोहममतेचे समूळ भिजवोनि, अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोनि ।
जय देव जय देव जय निरांजना, निरांजन ओवाळू तुझिया समचरणा ।।१।।

ज्वाला ना काजळी, ना दिवस ना राती,  सदोदित प्रकाश भक्तीने प्राप्ती।
पूर्णानंदे धालो बोलो मी किती, उजळो हे शिवराम भावे ओवाळिती ।
जय देव जय देव जय निरांजना, निरांजन ओवाळू तुझिया समचरणा ।।२।।.

Web Title: Deep Amavasya 2025: Light lamps on Deep Amavasya and perform 'this' scriptural worship and aarti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.