Deep Amavasya 2025: आज दिवसभरात १० मिनिटं तरी दीपपूजन कराच; पूर्ण वर्ष प्रकाशमान होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 10:50 IST2025-07-24T10:49:12+5:302025-07-24T10:50:09+5:30
Deep Amavasya 2025 Puja Vidhi: आजच्या झगमगाटीच्या काळात दीप पूजेचे काय महत्त्व आहे, ते या लेखातून समजून घेऊ आणि दीप पूजन करू.

Deep Amavasya 2025: आज दिवसभरात १० मिनिटं तरी दीपपूजन कराच; पूर्ण वर्ष प्रकाशमान होईल!
>> अस्मिता दीक्षित
आषाढ कृष्ण चतुर्दशीला आपण दिव्यांची अमावस्या (Deep Amavasya 2025) म्हणून संबोधतो आणि त्यादिवशी दीप पूजनही करतो. दीप हे मांगल्याचे प्रतिक आहे, म्हणूनच शुभ प्रसंगात ओवाळताना आपण निरांजनाचा उपयोग करतो. आषाढ अमावास्येनंतर अनेकविध सणांनी नटलेला साजरा श्रावण (Shravan 2025) सुरु होतो. त्याच्या स्वागताची ही तयारी!
Deep Amavasya 2025: गुरुपुष्यामृत योग, पण त्याच दिवशी अमावास्या; सोनेखरेदी करावी की टाळावी?
भारतीय संस्कृतीला परंपरेचा इतिहास लाभला आहे. प्रत्येक सणामागे काहीतरी विशिष्ट उद्देश आहे आणि त्याचा मानवी जीवनाशी थेट संबंध आहे ,तो समजून आपण सण साजरे केले तर त्याचा आनंद आपल्याला खऱ्या अर्थाने उपभोगता येईल.
शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥
हा श्लोक आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जातो, संध्याकाळी तिन्हीसांजा झाली की आई देवाजवळ दिवा लावत असे. तिच्यासोबत आपण शुभं करोति, मनाचे श्लोक, परवचा म्हणत असू. मग घरातील सर्व मोठ्या माणसांना नमस्कार ओघाने आलाच. संस्कार लहानपणीच करायचे असतात, कारण त्याची पाळेमुळे मनात खोलवर रुजतात आणि अखेरपर्यंत लक्षात राहतात.
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला तुमच्यावरही होऊ शकते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतकथा आणि लाभ!
श्रावण सुरु होतो त्यावेळी घरात अनेक पूजा, व्रते होतात, सकारात्मकता निर्माण होते आणि म्हणूनच ह्या सर्वाचा श्रीगणेशा आपण आषाढ अमावास्येला दीप पूजा करूनच करतो. त्या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे, नुसतेच दिवे नाही तर आपले मनसुद्धा घासून पुसून स्वच्छ करायचे. मनातील वाईट विचार, द्वेष ह्या सर्व गोष्टीना तिलांजली द्यायची आणि शुद्ध ,सात्विक मनाने दीपपूजन करायचे.
आपल्याला जी उर्जा, समाधान, सकारात्मक आनंदलहरी निरांजन किंवा समयीच्या ज्योतीमुळे मिळतील त्या टूबलाईटच्या प्रकाशातून मिळणार नाहीत. कारण तुपाच्या निरांजनातील ज्योत सात्विकतेचे प्रतिक आहे. देवासमोर निरांजन लावून ध्यानधारणा केली तर मनास निश्चित शांतता लाभतेच. निरांजनाच्या ज्योतीकडे एकटक पाहत राहिले तर एकाग्रता वाढते असेही ऐकिवात आहे.
तर असे हे दीपपूजन का करायचे ? तर अंधाराकडून प्रकाशाकडे आणि निराशेकडून सकारात्मकतेकडे नेणारा हा दीप आणि म्हणूनच त्याचे पूजन करायचे. श्रावणापासून एक उत्साहाचे, आनंदाचे पर्व सुरु होते त्याचा श्रीगणेश ह्या दिपपूजनाने करायचा. घराची साफसफाई करून नीटनेटके करावे, संध्याकाळी दिवे लागणीस एका पाटाभोवती छानशी रांगोळी काढून पाटावर घरातील लहान मोठे सर्व प्रकारचे दिवे, निरांजने ,समई घासूनपुसून ठेवावेत. सर्व दिव्यांना हळदकुंकू, अक्षता, फुले वाहून दीपप्रज्वलन करावे. गोडाचा नेवैद्य दाखवावा आणि आपल्या जीवनात शांतता, स्थैर्य,समृद्धी येण्यासाठी मनापासून प्रार्थना करावी. ह्या दिव्यांच्या प्रकाशात आमचे जीवन उजळून निघावे, मनातील दुष्ट, वाईट विचारांचा विनाश व्हावा आणि जीवन प्रकाशमान व्हावे ह्यासाठी मनोभावे नमस्कार करावा. काही ठिकाणी उकडलेल्या कणकेचे गोडाचे दिवे तसेच मातीचेही दिवे करण्याची प्रथा आहे.
विधात्यानेही विचारपूर्वक सृष्टीची रचना केली आहे. दिवस आणि त्यामागून येणारी रात्र. दिवसा सूर्यकिरणे आपल्याला मिळतात म्हणून सर्व जीवसृष्टी टिकून आहे. तेव्हा प्रकाशाचे अनन्यसाधारण महत्व आपल्याला विसरून कसे बरे चालेल. आम्हाला ऑफिस मधून यायला उशीर होतो, वेळ नसतो असे अजिबात म्हणायचे नाही ,एक दिवस TV, whatsapp थोडावेळ नाही पाहिले तर जगबुडी नाही होणार, पण आपल्या परंपरा जपत छान दीपपूजन केले तर आपले संपूर्ण कुटुंब पुढील वर्षात प्रगती नक्कीच करेल, प्रत्येकाचे जीवन प्रकाशमय होवून उजळून निघेल, करून पहा.
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
मंडळी , श्रावण सुरु झाला की अनेक व्रत वैकल्ये, सणवार येतात आणि ह्यात अभक्ष भक्षण म्हणजेच नॉनव्हेज खाण्यास मज्जाव आहे, कारण ह्या सर्व खाण्याने तामसी वृत्ती वाढते आणि तामसी वृत्ती परमार्थास अनुकूल नाही, ह्या गोष्टीत सात्विकता नसल्यामुळे हे ४ महिने तामसी भोजन वर्ज्य करावे, हे ह्यामागील शास्त्रीय कारण आहे. गेल्या काही वर्षात आपल्या सणांचा मुख्य उद्देश गायब होऊन त्याला एक वेगळेच हिडीस स्वरूप येवू लागले आहे, हे नव्याने सांगायला नको. सणांचा मुख्य उद्देश परमेश्वराचे पूजन करून, त्याच्यात विलीन होणे हा असला तरी हल्ली मात्र सण किंवा कुठलीही पूजा म्हणजे अंगविक्षेप करून देवासमोर घाणेरड्या गाण्यांवर नाचणे इतकाच उरला आहे .
आता हेच पहा, अनेक वर्षापासून चालत आलेल्या आणि आपल्या सात्विक प्रकाशाने डोळ्यास नेत्रसुख देणाऱ्या ह्या दिप पूजनास सुद्धा “गटारी अमावस्या“ म्हंटले जाऊ लागले आहे. आपल्या रूढी परंपरांचा एकीकडे ह्रास होत चालला आहे, तर दुसरीकडे विटंबना आणि त्यात आपल्यासारखी सुशिक्षित माणसे अग्रभागी आहेत हे सांगतानाही खेद होतो. शिक्षणाने आपण प्रगल्भ होतो मग आपणच सोशल मिडीयावर, whatsapp वरती हौशीने “उद्या गटारीचा प्रोग्राम काय ?" असे विचारले तर कसे होईल ? काही वर्षाने आषाढी अमावस्या –दीपपूजन हे शब्द विस्मृतीत जावून “ गटारी अमावस्या “ हाच शब्द प्रचलित होईल की काय अशी भीती वाटते. आपल्या परंपरा, सण साजरे करताना आपली सद्विवेक बुद्धी जागृत असेल तर आणि तरच त्याची उद्दिष्टे सफल होतील. नाहीतर पुढे येणारा काळ आणि येणाऱ्या पिढ्यामध्ये सात्विकता कणभरही उरणार नाही. आपणच आपल्या आयुष्यातील ह्या तेजाला वंचित होवू त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा एक सामाजिक बांधिलकी म्हणून नक्कीच विचार व्हावा, स्वतःला पटले तर इतरांनाही पटवून द्यावे. अन्यथा आपण आपल्या मुलाबाळांना कसला वारसा देणार आहोत? ह्याचा क्षणभर विचार करायची वेळ आत्ताच आहे, मग ती निघून गेली तर आपल्या ओंजळीतून सद्भावना, विवेक सर्वच निघून जाईल .
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
मंडळी सारांश असा की आपणही २१ व्या शतकात आहोत, सर्वसाधारण माणसे आहोत, आपल्यालाही भावभावना आहेतच, पण आधुनिकतेच्या नावाखाली आपल्या सणांना जे हिडीस स्वरूप येते आहे त्याला रोखणे आपल्याच हातात आहे. आजकालचे कॉर्पोरेट युग आहे, आजकालची मुले म्हणतील आम्ही घरीच १० नंतर येतो मग कधी करणार हे सर्व ,ठीक आहे आल्यावर घरातल्यांनी केलेल्या पुजेचा मान ठेवून नमस्कार तर नक्कीच करता येईल! तसेही जो देव आपल्याला अनंत हाताने भरभरून देत असतो त्याच्यासमोर एक क्षण उभे राहून दीपपूजन करण्यास एक मिनिट सुद्धा नसेल तर आपल्यासारखे अभागी आपणच. नक्कीच विचार करा. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, ह्या उक्तीला धरून आपण आपल्यापासूनच सुरवात करुया आणि साजरा करुया "दीपोत्सव"
आपल्या सर्वाच्या आयुष्यात हा दीपोत्सव समाधान, आनंद आणि सात्विकता प्रदान करुदे आणि आपल्या सर्वांचे आयुष्य प्रकाशमय होऊदे हीच प्रार्थना.
संपर्क : 8104639230