Dasbodh Jayanti: समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या ग्रंथराज दासबोधाची जयंती

By देवेश फडके | Published: February 20, 2021 06:58 PM2021-02-20T18:58:34+5:302021-02-20T18:59:05+5:30

सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य यांचा परिपाठ समर्थ रामदास स्वामी यांनी समाजाला घालून दिला. समर्थ रामदासांच्या रचनांमधील सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे दासबोध. माघ शुद्ध नवमी या दिवशी दासबोध ग्रंथाची रचना रामदास स्वामींनी केली. (Dasbodh Jayanti)

dasbodh jayanti samarth ramdas swami created dasbodh on magha shuddha navami | Dasbodh Jayanti: समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या ग्रंथराज दासबोधाची जयंती

Dasbodh Jayanti: समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या ग्रंथराज दासबोधाची जयंती

googlenewsNext

जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।। रामाची आणि हनुमंताची उपासना करणाऱ्या रामदास स्वामी यांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांची शिकवण पक्की करणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करत महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य यांचा परिपाठ समर्थ रामदास स्वामी यांनी समाजाला घालून दिला. समर्थ रामदासांच्या रचनांमधील सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे दासबोध. (Dasbodh Jayanti) यंदाच्या वर्षी रविवार, २१ फेब्रुवारी २०२१ रोजी माघ शुद्ध नवमी आहे. माघ शुद्ध नवमी या दिवशी दासबोध ग्रंथाची रचना रामदास स्वामींनी केली. 

समर्थ रामदास स्वामी यांनी १७ व्या शतकात रचलेला दासबोध कालातीत असून, आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो. दासबोधाच्या माध्यमातून रामदास स्वामींनी नेटका उपदेश समाजाला केला आहे. सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगत आरोग्याचा गुरुमंत्र देत मनावर ताबा मिळवल्यास अनेक गोष्टी सुलभ होतात, याचे ब्रह्मज्ञान रामदासांनी समाजाला दिले. समर्थ रामदासांनी आपल्या कार्याने महाराष्ट्रधर्म वाढविला. सर्वसामान्य जनतेत भक्तिमार्गातून शक्तीच्या उपासनेचा, संघटित होण्याचा मूलमंत्र दिला. मारुतीच्या उपासनेतून त्या काळातील समाजाला शरीरस्वास्थ्याचा मार्गही दाखविला.

देवांचे जुने फोटो, मूर्ती यांचे यथायोग्य विसर्जन करण्याची शास्त्रीय पद्धत कोणती जाणून घ्या!

दासबोधाचा जन्म

समर्थ रामदास स्वामींचा 'दासबोध' हा ग्रंथ म्हणजे विविध विषयांवरील तत्त्वचिंतनांचे मराठी भाषेतील साहित्याचे अमोल लेणे आहे. रामदास स्वामी यांनी आपले पट्टशिष्य कल्याण स्वामी यांच्याकरवी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. दासबोधाला ग्रंथराजाची उपमा दिली जाते. माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबीड अरण्यात शिवथरघळ येथे दासबोध ग्रंधाची निर्मिती करण्यात आली.

दासबोधाची रचना

दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक दशकात १० समास आहेत. दासबोध ग्रंथाची अनेक ठिकाणी आजही पारायणे केली जातात. समर्थांनी दोन वेळा दासबोधाची निर्मिती केली, असे सांगितले जाते. पहिला दासबोध ग्रंथ २१ समासाचा होता आणि नंतरचा दासबोध २०० समासी असल्याचे म्हटले जाते. जुन्या आणि नंतरच्या दासबोधाचे एकत्रिकरण केले गेले. त्यावर संपादकीय संस्कार करून अनेक प्रकाशकांनी दासबोधांच्या आवृत्त्या प्रकाशित केल्या. रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती-पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. 

दासबोधाची वैशिष्ट्ये

गुरु-शिष्य संवाद असे दासबोध ग्रंधाचे स्वरुप असून, हा ग्रंथ कोणता, त्याचे नाव काय, या ग्रंथात प्रामुख्याने काय सांगितलेले आहे, या ग्रंथामुळे काय मिळेल, अशी माहिती देणाऱ्या ओव्या दासबोध ग्रंथाच्या प्रारंभी येतात. मूर्खांची लक्षणे, नवविधा भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे. दासबोधातून रामदासांनी निश्चयात्मक आणि विवेकपूर्ण लिखाण केले आहे. केवळ दशकांच्या नावावरून समर्थांनी मानवी जीवनाचा आणि मानवी मनाचा किती सखोल अभ्यास केला आहे, याची प्रचिती येते. मनाचे श्लोक रचणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचा उल्लेख केवळ ग्रंथराज असाच करता येईल.

Web Title: dasbodh jayanti samarth ramdas swami created dasbodh on magha shuddha navami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.