Dahi Handi 2022: दोन वर्षांनंतर दहीहंडीचा पुन्हा जल्लोष; ढाक्कू माकुम्म करायला गोविंदाही सज्ज; पण...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 17:31 IST2022-08-18T17:30:46+5:302022-08-18T17:31:32+5:30
Janmashtami 2022: गेली दोन वर्षं उत्सवावर आणि जन जीवनावर कोरोनाचे विरजण पडले होते, मात्र पुन्हा उत्सवाची धामधूम सुरु झाली आहे; यात सर्वांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी!

Dahi Handi 2022: दोन वर्षांनंतर दहीहंडीचा पुन्हा जल्लोष; ढाक्कू माकुम्म करायला गोविंदाही सज्ज; पण...!
शीर्षकात उत्सवाच्या जल्लोषाचा उल्लेख केला आणि पण या शब्दाने ब्रेक लावला म्हणून काळजी करू नका. हा पण चांगल्यासाठी वापरला आहे. मात्र या पण लावल्याने अनेकदा उलट घडते. सगळे काही छान आहे पण... असे म्हणत वाक्य तोडले जाते तेव्हा नकारात्मक बाजू समोर येणार हे ऐकण्यासाठी मनाची तयारी ठेवावी लागते. परंतु इथे पण वापरला आहे तो महत्त्वाच्या जबाबदारीची आठवण करून देण्यासाठी!
दही हंडी हा उत्सव एकतेचा संदेश देणारा सण आहे. अलीकडच्या काळात या उत्सवाचे स्वरूप व्यापक बनले आहे. दही हंडीमध्ये सहभागी होणारे बालगोपाल आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला जमलेली गर्दी उत्सवमय झालेली असते. ही बाब एकार्थी आनंदाची आहेच, पण उत्सवादरम्यान बॉलिवूडच्या उत्तेजक गाण्यांवर नाच, मद्यपान केलेल्या मंडळींची झिंग आणि लाखो रुपयांच्या किमतीचे बक्षीस मिळण्यावरून गोविंदा पथकांमध्ये होणारी हमरी तुमरी, उंचच उंच थर लावण्याच्या नादात झालेले अपघात, मृत्यू यामुळे उत्सवाच्या मूळ हेतूला गालबोट लागते. बीभत्स स्वरूप प्राप्त होते. कर्णकर्कश स्पीकर मुळे कधी एकदा तो दही काला उत्सव संपतो याची स्थानिक वाट बघत बसतात आणि अशी परिस्थिती निर्माण होणे हे दुर्दैवी आहे.
श्रीकृष्णने सर्व स्तरातल्या, सर्व वयोगटातल्या सवंगड्यांना सोबत घेऊन दह्या दुधाची चोरी केली आणि कंसाच्या दुष्ट वागणुकीला आळा घातला. त्याच्या घरात दह्या दुधाचे डेरे होते. त्याला कसलीही कमतरता नव्हती. तरीसुद्धा श्रीमंत घरात वाढलेला कृष्ण सवंगड्यांच्या हक्कासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि गोकुळ वासियांमध्ये कंसाची दहशत कमी करण्यासाठी मानवी मनोरे रचतो. संघटन केल्याशिवाय अशा कामांना यश मिळत नाही हे दाखवून देतो आणि आनंदाचे नवनीत स्वतः खातो आणि मित्रांना खिलवतो. ही निरागसता आणि सच्चा भाव आजच्या उत्सवातही अभिप्रेत आहे. जेणेकरून संस्कृतीचे मांगल्य टिकून राहील.
हा 'पण' आपल्याला पूर्ण करायचा आहे तोही संस्कृती रक्षक बनून. त्यामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल आणि ढाक्कू माकुम्म करायला आबाल वृद्धही आनंदाने पुढे सरसावतील!