चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:28 IST2025-07-01T16:28:29+5:302025-07-01T16:28:39+5:30

Chaturmas 2025 Date: यंदा चातुर्मासाची सुरुवात आणि सांगता कधी होत आहे? चातुर्मासाचे महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या...

chaturmas 2025 know about date series of fasts and festivals and importance of chaturmas kaal | चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

Chaturmas 2025 Date: मराठी वर्षातील सर्वांत महत्त्वाचा आणि अत्याधिक महात्म्य असलेला काळ म्हणजे चातुर्मास. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या काळात चतुर्मास असतो. आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो. तर कार्तिक शुद्ध एकादशीला विष्णुप्रबोधोत्सव या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते. सन २०२५ मध्ये चातुर्मास कधी सुरू होतो? चातुर्मास काळात कोणकोणते सण-उत्सव, व्रते प्रामुख्याने साजरी केली जातात? जाणून घेऊया...

रविवार, ०६ जुलै २०२५ रोजी आषाढी देवशयनी एकादशी आहे. या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होत आहे. तर रविवार, ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी विष्णुप्रबोधोत्सव आहे. या दिवशी चातुर्मासाची सांगता होणार आहे. विशेष म्हणजे चातुर्मासाची सुरुवात आणि सांगता रविवारीच होत आहे. भारतीय संस्कृती ही वैविध्याने नटलेली पाहायला मिळते. मराठी महिन्यात येणाऱ्या सण-उत्सवांना धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व तर आहेच, शिवाय शास्त्रीयदृष्ट्याही फार महत्त्व आहे. चातुर्मासात अनेक सण-उत्सव, व्रत-वैकल्ये साजरी केली जातात. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते, अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याणकारी असतात, असा समज आहे. चातुर्मासात विवाहमुहूर्त नसतात. तसेच अनेक ठिकाणी चातुर्मासाच्या प्रारंभी काही ना काही संकल्प करून तो सिद्धीस नेण्याचा प्रयत्न केला जातो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

चातुर्मासात येणारी काही व्रत-वैकल्ये अन् सण-उत्सव

चातुर्मासातील पहिला पूर्ण महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला काही नाही महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. तसेच नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. तसेच याच महिन्यात जिवती पूजन केले जाते. यानंतर येणाऱ्या भाद्रपद महिन्यात हरतालिका पूजन करून मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षात पितरांचे स्मरण केले जाते. हा पंधरा दिवसांचा कालावधी पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो.

नवरात्र, दीपावली अन् चातुर्मास सांगता

अनेक हजार वर्षांपूर्वी मराठी नववर्ष हे अश्विन महिन्यापासून सुरू व्हायचे, अशी मान्यता आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालावधीत नवरात्र साजरे केले जाते. अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणून साजरी केली जाते. यानंतर दीपोत्सव साजरा केला जातो आणि कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. 

 

Web Title: chaturmas 2025 know about date series of fasts and festivals and importance of chaturmas kaal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.