चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:57 IST2025-11-17T14:56:51+5:302025-11-17T14:57:44+5:30
Chanakya Niti: आपल्या यशाकडे, प्रगतीकडे बघून त्रास देणारे अनेक हितशत्रू असतात, त्यांच्याशी लढा कसा द्यावा याबाबत आचार्यांनी दिलेले उपाय कामी येतील.

चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील महान रणनीतीकार आणि विचारवंत मानले जातात. त्यांची चाणक्य नीती केवळ राजकारण आणि प्रशासनासाठीच नव्हे, तर दैनंदिन जीवनातील संबंध आणि शत्रू-प्रबंधनासाठी आजही तितकीच उपयुक्त आहे. शत्रूला कसे नियंत्रित करावे आणि परिस्थितीनुसार कोणती योग्य रणनीती वापरावी, याबद्दल चाणक्यांनी दिलेली काही अमूल्य शिकवण खालीलप्रमाणे आहे:
१. शत्रूला मुळापासून नष्ट करा
चाणक्यांच्या विचारांमागील सार एका लहानशा कथेतून स्पष्ट होते. लहानपणी त्यांच्या पायात कुश (तीक्ष्ण गवत) टोचल्यावर त्यांनी ते फक्त पायाखाली दाबले नाही, तर त्याला मुळासकट नष्ट करण्यासाठी त्याच्या मुळांवर घाव करणे गरजेचे असते. शत्रूला केवळ तात्पुरते दाबून ठेवणे किंवा कमकुवत करणे पुरेसे नाही. जोपर्यंत शत्रू पूर्णपणे नामशेष होत नाही, तोपर्यंत तो पुन्हा उठून नुकसान करू शकतो. शत्रूवर असा उपाय करावा ज्यामुळे तो भविष्यात कधीही तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. म्हणजेच शत्रूला जसे तुमचे वीक पॉईंट्स माहीत असतात, त्याप्रमाणे तुम्हालाही त्याचे वर्म ओळखून त्यावर घाव घालता आला पाहिजे. हा घाव शारीरिक नाही बौद्धिक लढा देऊन घालायचा आहे हे ध्यानात ठेवा.
२. शत्रूला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवा
चाणक्य एका प्रसिद्ध श्लोकात (सुकुले योजयेत् कन्यां...) सांगतात की, शत्रूला नेहमी अशा कामांमध्ये अडकवून ठेवावे, ज्यामुळे तो मानसिक आणि भावनिकदृष्ट्या कमजोर होईल.
तुमच्याशी थेट लढण्याऐवजी, शत्रू स्वतःच्याच समस्यांमध्ये अडकून राहील, ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल आणि तुमचा वेळ व ऊर्जा वाचेल.
३. शत्रूच्या ताकदीनुसार रणनीती बदला
प्रत्येक शत्रूशी समान पद्धतीने वागणे योग्य नाही, असे चाणक्य सांगतात. शत्रूचा स्वभाव आणि त्याची ताकद पाहूनच नीती निश्चित करावी लागते.
शक्तिशाली शत्रू (बलिनम्): जर शत्रू तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली असेल, तर त्याच्याशी विनम्र व्यवहार ठेवावा. यामुळे संघर्ष टळतो आणि परिस्थिती अनुकूल राहते.
दुष्ट शत्रू (दुर्जनम्): जर शत्रू दुष्ट असेल आणि तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत असेल, तर त्याच्याशी कठोरपणे (प्रतिलोमेन) वागणे आवश्यक आहे. जशास तसे वागल्याशिवाय अनेकांना अद्दल घडत नाही. शत्रूच्याही बाबतीत तेच केले पाहिजे.
चाणक्य नीतीचे आधुनिक महत्त्व
चाणक्य नीती शिकवते की शत्रूवर बुद्धीने केलेला वार हा नेहमीच ताकदीने केलेल्या वाऱ्यापेक्षा अधिक शक्तिशाली असतो. योग्य वेळी योग्य रणनीतीचा वापर करणे आणि शत्रूला मुळापासून समजून घेणे, हे यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. वैयक्तिक जीवन असो किंवा व्यावसायिक धोरणे, चाणक्यांचे हे नियम आजही प्रासंगिक आहेत.