Chaitra Navratri 2024: नवरात्रीच्या काळात मासिक धर्म आल्यास काय करावे? कामाख्या देवीच्या कथेचा संदर्भ वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 12:28 PM2024-04-13T12:28:27+5:302024-04-13T12:29:09+5:30

Chaitra Navratri 2024: सध्या चैत्र नवरात्र सुरु आहे, घरोघरी कुळधर्म कुलाचार सुरू असतील, अशातच मासिक पाळीच्या दरम्यान काय करावे याबद्दल जाणून घ्या!

Chaitra Navratri 2024: What to do if menstruation occurs during Navratri? Read the context of Kamakhya Devi's story! | Chaitra Navratri 2024: नवरात्रीच्या काळात मासिक धर्म आल्यास काय करावे? कामाख्या देवीच्या कथेचा संदर्भ वाचा!

Chaitra Navratri 2024: नवरात्रीच्या काळात मासिक धर्म आल्यास काय करावे? कामाख्या देवीच्या कथेचा संदर्भ वाचा!

हिंदू धर्मातील नियम व अटी तयार करताना शास्त्रकारांनी स्थळ, काळ, सापेक्ष ठरवून वेळोवेळी त्यात अपेक्षित बदल केले आहेत. या लवचिकतेमुळेच हजारो वर्षं लोटली तरी हिंदू धर्म सुरक्षित राहिला, नव्हे तर वृद्धिंगत झाला. मात्र त्याला नावे ठेवून नवीन पायंडा घालू पाहणाऱ्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. मासिक धर्माच्या नियमांबाबतीत असलेल्या अटी प्रगत काळात महिलांना जाचक वाटत असल्या तरी नीट विचार केल्यावर लक्षात येते की तो जाच नसून ती सोय आहे व होती. जसे की मासिक धर्माच्या काळात विश्रांती घेणे. 

मात्र स्त्रियांचा मूळ स्वभाव पाहता त्या स्वतःसाठी विश्रांती कधीच घेत नाहीत, म्हणून त्यावर धर्माची बंधने घालून त्यांना सक्तीची विश्रांती दिली होती. पूर्वी साधी देव पूजा करायची तरी सोवळं पाळावे लागे. पहाटे लवकर उठून स्नान करणे, देव उजळणे, गंध उगाळणे, हार बनवणे, नैवेद्य दाखवणे आणि त्यानंतर घरकाम करणे. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडणाऱ्या स्त्रियांना विश्रांतीला वेळच मिळत नसे. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या शारीरिक यातना पाहता ही सक्तीची विश्रांती तिला मिळावी म्हणून चार दिवस तिला बाहेर बसवणे अर्थात घराबाहेर नाही तर स्वतंत्र खोलीत, स्पर्शरहित ठेवणे असा नियम होता. मात्र, त्याचा विपर्यास करून काही लोकांनी वाळीत टाकल्यासारखे तिला चार दिवस बहिष्कृत केले. त्यामुळेच की काय, स्त्रियांना तो जाच वाटू लागला आणि मासिक पाळीदरम्यान मंदिर प्रवेश करू अशी बंडखोर वक्तव्य करू लागल्या. 

यात देवाचे किंवा देवळाचे काही नुकसान नाही तर ते आपल्या मनःस्थितीला अनुकूल नाही हे लक्षात घेतले पाहिजे. त्या चार दिवसात होणारी चिडचिड, शारीरिक त्रास, कपडे खराब होण्याची भीती,अशक्तपणा यामुळे मंदिरातील सकारात्मक लहरींमध्ये जाऊनही मन त्या स्थितीशी एकरूप होणार नाही, म्हणून ते चार दिवस झाल्यावर स्नान करून मंदिरात गेल्यास मंदिराचे पावित्र्य टिकते व मनाचेही पावित्र्य वाढते. 

याबाबत धर्म अभ्यासक सुजित भोगले महाभारताचा संदर्भ देत लिहितात : 

रजस्वला अवस्थेतील शक्तीतत्व हे एकांत प्राप्त करण्याचा अधिकार बाळगून आहे ही हिंदू धर्मातील श्रद्धा आहे आणि म्हणूनच सतीची योनी ज्या स्थळी पडली आहे त्या कामाख्या मंदिरात तीन दिवस संपूर्ण मंदिर बंद ठेवण्याची परंपरा आहे. कामाख्या देवीचा प्रसाद म्हणून त्या अवस्थेतील पाझरणारा सिंदूर बंगाल आणि आसाम मधील प्रत्येक हिंदू स्त्री पुरुष आपल्या मस्तकी पूर्ण श्रद्धेने धारण करतात. 

स्त्रीला पाळी येणे हे तिच्यातील जागृत सृजन क्षमतेचे प्रतिक आहे आणि हे प्रतिक वंदनीय, उपास्य आहे. 

आपल्याकडे वयात आलेल्या मुलीला सर्वप्रथम लज्जागौरी चे पूजन करायला लावतात. ती पण आता सृजन करण्यास समर्थ झाली याचा आनंद एक सुंदरसा धार्मिक सोहळा करून साजरा केले जातो. 

मासिक पाळी असलेल्या स्त्रीला संपूर्ण आराम दिला पाहिजे हे आपली संस्कृती सांगते आणि लवकरच या संदर्भातील कायदा सुद्धा होणार आहे. स्त्रीचे स्त्री असणे हे विशेष आहे. ते लज्जास्पद किंवा पुरुषांच्या पेक्षा न्यून नसून पुरुषांना प्रकृतीने हे वरदान नाकारून स्त्रियांना दिले आहे आणि त्या वरदानाचा आदर म्हणून तिला ही तीन दिवसांची प्रेमाची विश्रांती देणे आपल्या संस्कृतीत अत्यंत महत्वाचे आहे. 

ज्यावेळी मध्ययुगीन कालखंड सुरु होता, जेव्हा स्त्रियांना घरात चूल आणि मुल यात अडकवून ठेवले होते त्यावेळी सुद्धा स्त्रियांना तीन चार दिवसांची विश्रांती दिलीच्च जायची... अगदी विधवा स्त्रियांना ज्या काळात केशवपन करून अलवणात अर्थात एकवस्त्रात जगावे लागे त्या कालखंडात सुद्धा ही विश्रांती दिलीच्च जायची... 

महाभारत काळात द्रौपदी रजस्वला अवस्थेत होती, त्याचा उल्लेख एकवस्त्रा असा केला गेला आहे. तरीही तिला भर दरबारात बोलावले गेले हाच तिच्या स्त्रित्वाचा प्रथम अपमान होता. नंतर तिला त्या अवस्थेत दुःशासनाने मांडीवर बस असे मांडीवर थाप मारून आवाहन केले हा तिचा दुसरा अपमान होता कारण रजस्वला अवस्थेतील स्त्रीला पुरुषाने स्पर्श करणे वर्ज्य आहे हा आपल्या संस्कृतीमधील द्वितीय नियम आहे. आणि नंतर तिचे वस्त्र फेडण्याचा प्रयास झाला हा तिसरा अपमान होता. या तीन अपमानांना ज्यांनी मूक संमती दिली त्यांच्या पैकी एकही जण जिवंत रहाणार नाही याची काळजी श्रीकृष्णाने घेतली.

हे संदर्भ पाहता मासिक पाळी असताना दगदग करणे हे स्त्रियांना अनेक आजारांना आमंत्रण देणारे ठरते असे डॉक्टरही कळकळीने सांगत आहेत. या गोष्टींचा आपणही विचार करावा, चिंतन करावे आणि मासिक धर्माकडे सकारात्मकतेने पाहून मनाचे व शरीराचे पावित्र्य जपावे. व नवरात्रीच्या काळात मासिक पाळी असल्यास मानस पूजा करून देव्हाऱ्याचे, शरीराचे आणि आपल्या मनाचे पावित्र्य जपावे हेच इष्ट!

Web Title: Chaitra Navratri 2024: What to do if menstruation occurs during Navratri? Read the context of Kamakhya Devi's story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.