करिअरमधील यशासाठी 'हे' उपाय अवश्य करा आणि फरक बघा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 13:00 IST2021-05-27T13:00:29+5:302021-05-27T13:00:59+5:30
वास्तू दोष दूर करण्यासाठी वास्तू तज्ञांनी दिलेल्या टिप्स वापरून पाहूया आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर करूया.

करिअरमधील यशासाठी 'हे' उपाय अवश्य करा आणि फरक बघा!
कधीकधी बरेच प्रयत्न करूनही करिअरमध्ये यश मिळाले नाही, तर कोणतीही व्यक्ती निराश होते. आत्मविश्वासाच कमी होतो. परंतु, दरवेळी अपयशाला कारणीभूत केवळ आपण असतोच असे नाही, तर बाह्य परिस्थिती देखील कारणीभूत ठरते. तसेच वास्तू दोषाचाही परिणाम होऊ शकतो. बाकी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आपण प्रयत्न करतोच, आता वास्तू दोष दूर करण्यासाठी वास्तू तज्ञांनी दिलेल्या टिप्स वापरून पाहूया आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर करूया.
करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी वास्तु टिप्स
केळीचे झाड लावा:वास्तुशास्त्रानुसार परिश्रम करूनही करिअरमध्ये यश येत नसेल तर घरासमोर केळीचे झाड लावा. त्याची निगा राखा आणि ते झाड वाढवा. अंगण नसेल, तर आपल्या बाल्कनीमध्येही केळीचे रोप लावता येते. त्याची पुरेशी वाढ झाल्यावर ते रोप जवळच्या बागेत रुजवावे. हिंदू धर्मात केळीच्या झाडाला देव वृक्ष म्हणतात. त्याचे अनेक लाभ आहेच, शिवाय असे म्हणतात, की केळीचे झाड जितके जास्त वाढेल तेवढी आपली कारकीर्द वाढेल.
पूर्व दिशेने तोंड करून अभ्यास: पूर्व दिशेने तोंड करून अभ्यास केल्यास करिअरमध्ये यश मिळते. यासाठी लोकांनी अभ्यास करताना किंवा करिअर संबंधी आखणी करताना पूर्व दिशेचा वापर केला पाहिजे. पूर्व दिशा सूर्याची आहे. त्यामुळे या दिशेने सूर्यतेज प्राप्त होते आणि त्याचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर पडू लागतो. यामुळे आत्मविश्वास वाढतो. शास्त्रानुसार पूर्व दिशा गणपती बाप्पाचीसुद्धा आहे. गणपती ही बुद्धीची आणि मांगल्याची देवता आहे. या देवतांच्या आगमनार्थ आणि आशीर्वादार्थ ईशान्येचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. त्यामुळे घरात सकारात्मक उर्जा येते व त्याचा प्रभाव आपल्या कामावर दिसू लागतो.
गडद रंगाचे कपडे टाळा : सध्या करिअर च्या दृष्टीने तुमची वेळ चांगली सुरु नाही, असे जाणवत असल्यास गाडी रुळावर येईपर्यंत गडद कपड्यांचा वापर टाळा. गडद रंगात नकारात्मक छटा असते, तर फिकट किंवा विविध रंगसंगती असलेले कपडे वापरा. त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येईल.
घरातल्या भिंतींचा रंगबदल करा: घराच्या भिंतींवर आल्हाददायक रंगांचा वापर करावा. सध्या संपूर्ण घराला रंग देणे शक्य नसेल तर निदान उत्तर दिशेच्या भिंतीला केशरी रंग द्यावा. तसे केल्याने प्रगती वेगाने होते, असे वास्तू शास्त्राने म्हटले आहे.