शुभ बोल नाऱ्या... असे आपण दुसऱ्यांना सांगतो आणि स्वतः मात्र???

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 03:13 PM2021-06-17T15:13:09+5:302021-06-17T15:13:09+5:30

वाईट गोष्टींचे उच्चारण तर नकोच, पण वाईट गोष्टींचा विचारही नको. 

Be positive in every state of mind!!! | शुभ बोल नाऱ्या... असे आपण दुसऱ्यांना सांगतो आणि स्वतः मात्र???

शुभ बोल नाऱ्या... असे आपण दुसऱ्यांना सांगतो आणि स्वतः मात्र???

googlenewsNext

दिवसेंदिवस वाढती स्पर्धा, महागाई, बेरोजगारी,गुन्हेगारी अशा वातावरणात आपल्या मनावरदेखील नैराश्याचे मळभ आले नाही तर नवल? कधी कधी आपणही या नैराश्याच्या गर्तेत अडकतो आणि व्यर्थ बडबड करू लागतो. नैराश्याच्या भरात नकारात्मक विचार उगाळत बसतो. परंतु जे विचार आपण पेरतो, तेच विचार भविष्यात उगवून आपल्या समोर येतात. म्हणून बोलायचे असेल तर चांगलेच बोला. वाईट विचारांना मनातही थारा नको. 

हिंदी चित्रपटातला अभिनय डोळ्यासमोर आणा. एखादा नायक जेव्हा निर्वाणीची भाषा बोलतो, तेव्हा नायिका त्याचा शब्द मध्यातून तोडत वाईट बोलू नको असे नजरेनेच सांगते. दिसायला रोमँटिक वाटणारा हा सिन वास्तवाची जाणीव करून देणारा आहे. 

मोकळ्या निसर्गात जा. विशेषतः इको पॉईंटला! तिथे मोठ्याने हाक मारली असता, तो आवाज प्रतिध्वनी होऊन आपल्यालाच ऐकू येतो. त्याचप्रमाणे आपण जे जे काही बोलतो, ते हा निसर्ग शोषून घेतो आणि आपण जाणते अजाणते पणी बोललेल्या गोष्टी आपल्या समोर आणून ठेवतो. म्हणून वाईट गोष्टींचे उच्चारण तर नकोच, पण वाईट गोष्टींचा विचारही नको. 

तुम्ही जेव्हा म्हणता, आज थकल्यासारखे वाटत आहे, झोप येतेय, कामाचा कंटाळा आला आहे, खूप उदास वाटत आहेत. हे नकारार्थी विचार मनाद्वारे शोषले जाऊन मेंदूवर परिणाम करतात आणि देहाला तशा सूचना देतात, त्यामुळे आपण जसा विचार करतो, तसे आपल्याला जाणवू लागते. वास्तविक तसे नसते. ती तात्कालिक घटना असते. जी मनावर परिणाम करते आणि त्याचा संबंध आपण कृतीशी जोडतो. 

निसर्ग अनंत करांनी आपल्याला हवे ते द्यायला बसलेला आहे. त्याच्याकडून पहिली गोष्ट घ्यायची, ती म्हणजे सकारात्मकता! पानगळतिच्या मौसमातही निसर्ग कधीच उदास दिसत नाही. हेही दिवस जातील असा संदेश देत तो काही काळात नवे रूप धारण करतो. निसर्गाला हे शक्य आहे तर आपल्याला का नाही? त्यासाठी आधी स्वतःला वाईट गोष्टी बोलण्यापासून, विचार करण्यापासून आणि कृती करण्यापासून रोखल्या पाहिजेत. 

दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करण्यासाठी 'मी आनंदी आहे', 'मी समाधानी आहे', 'मी स्वतःला सिद्ध करू शकतो', 'मी लढू शकतो', 'मी सुखात राहू शकतो', 'मी दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो' ही साधी सोपी आणि काहीशी कृत्रिम वाटणारी विधाने तुमच्या मनावर आणि देहावर प्रचंड सकारात्मक परिणाम करतात. सुरुवातीला त्यात तथ्य वाटणार नाही. पण हळू हळू सरावाने या वाक्यांची ताकद तुमच्याही लक्षात येईल. रागाच्या, नैराश्याच्या, विरहाच्या क्षणी दीर्घ श्वास घ्या आणि आत्मविश्वासाने स्वतःला सांगा, 'या परिस्थितीवर मात करूनही मी पुढे जाईन' मग परिणाम बघा. तुमचे झुकलेले खांदे आपोआप ताठ होतील आणि नैराश्याची जागा आत्मविश्वास घेईल. 

या जगात अशक्य काहीही नाही. त्यासाठी फक्त दुसर्यांऐवजी स्वतःला सांगायला सुरुवात करा...'शुभ बोल नाऱ्या...!'

Web Title: Be positive in every state of mind!!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.