जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 15:47 IST2025-11-26T15:45:17+5:302025-11-26T15:47:39+5:30
Ayodhya Ram Mandir Income: अयोध्येतील राम मंदिरात देशांतर्गत आणि परदेशातील भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.

जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
Ayodhya Ram Mandir Income: शतकानुशतके असलेले घाव व वेदना आता भरून निघाल्या आहेत. अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या ५०० वर्षापूर्वी केलेल्या संकल्पाची पूर्तता झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. राम मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकविल्यानंतर मोदी यांनी हे वक्तव्य केले. या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त हा समारंभ आयोजिण्यात आला होता. यातच अयोध्येतील राम मंदिराने देशातील सर्वांत श्रीमंत मंदिराच्या यादीत स्थान पटवल्याचे म्हटले आहे.
राम मंदिराच्या शिखरावर फडकाविण्यात आलेला ध्वज पॅराशूट ग्रेड कापडाचा बनलेला असून, जाड नायलॉनच्या दोरीने १६१ फूट उंच शिखरावर तो फडकविण्यात आला आहे. या ध्वजावर सूर्यवंशाचे प्रतीक सूर्य, ओमचिन्ह व कोविदार वृक्षाची प्रतिके आहेत. कोविदार वृक्षाला रामराज्याचा राज्यवृक्ष मानले जाते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत आले होते. मंदिराची भव्यता, धार्मिक महत्त्व आणि भाविकांची वाढती संख्या यामुळे ते केवळ श्रद्धेचे केंद्र बनले नाही तर उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेतही महत्त्वपूर्ण योगदान देणारे बनले आहे. राम मंदिराने केवळ येणाऱ्या भाविकांच्या संख्येचे नाही, तर मिळालेल्या दानातही राम मंदिर नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत.
सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई?
काही रिपोर्टनुसार, गेल्या वर्षभरात राम मंदिराला सुमारे ₹७०० कोटी दान-देणग्या मिळाल्या आहेत. देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मंदिरांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती वेंकटेश्वर मंदिर आणि केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिर अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. राम मंदिरातील भाविकांची वाढती संख्या, सुविधांचा विस्तार आणि मंदिर पूर्णपणे पुन्हा सुरू झाल्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर एक प्रमुख धार्मिक आणि आर्थिक केंद्र बनले आहे.
दरम्यान, राम मंदिरामुळे अयोध्येच्या स्थानिक अर्थव्यवस्थेलाही एक नवीन चालना मिळाली आहे. शहरातील हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि होमस्टेची मागणी अभूतपूर्व वाढली आहे, सुमारे १,१०० नोंदणीकृत होमस्टे आता सरासरी मासिक २ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवतात, असे म्हटले जात आहे. सुधारित रेल्वे, रस्ते आणि हवाई संपर्कामुळे धार्मिक पर्यटनाला आणखी चालना मिळाली आहे. वंदे भारत एक्सप्रेससह नवीन ट्रेन सुरू झाल्यामुळे आणि अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यान्वित झाल्यामुळे देशांतर्गत आणि परदेशातील प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.